देशातील सर्वात लांब नदी क्रूझ सेवा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाची सर्वात लांब नदी क्रूझ सेवा उत्तरप्रदेशातील वाराणसी आणि आसामच्या बोगिबीलदरम्यान पुढील वर्षाच्या प्रारंभी सुरु होणार आहे. ही क्रूझ सेवा 4 हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा प्रवास करणार आहे. गंगा, भारत-बांगलादेश प्रोटोकॉल मार्ग (आयबीपीआर) तसेच ब्रह्मपुत्रा नदीतून हा प्रवास होणार आहे. केंद्रीय बंदर, जलपरिवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याची माहिती दिली आहे.
ही पूझ सेवा सुरू झाल्याने आसामचे लोक व्यापार तसेच पर्यटनाशी निगडित उपजीविकेसह मालवाहतुकीला चालना देण्याकरता नदी जलमार्गांचा वापर करू शकणार आहेत. आंतरदेशीय नौवहन, नदी क्रूझ पर्यटनाला चालना देण्याचे आणि ब्रह्मपुत्रा नदीवर टर्मिनल्स उभारण्यासाठी जागा शोधण्याचे काम सरकार करत असल्याचे सोनोवाल म्हणाले.
आसामच्या डिब्रूगढनजीक बोगिबील क्षेत्रात अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ सोनोवाल यांच्या हस्ते झाला आहे. याचबरोबर त्यांनी बोगिबील रिव्हरप्रंट यात्रीघाटाचे देखील उद्घाटन केले. बोगिबील आणि गुइजनच्या जलक्षेत्रात निर्माण होणारे दोन्ही घाट अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नदी टर्मिनलच्या स्वरुपात विकसित केले जाणार आहेत. ब्रह्मपुत्रा नदीतून जाणाऱया जलमार्गालाच राष्ट्रीय जलमार्ग-2 म्हणून ओळखले जाते.
ब्रह्मपुत्रा नदी प्राचीन संस्कृतीची वाहक असण्यासह आमची आर्थिक जीवनरेषा देखील आहे. ब्रिटिश काळापासूनच आसाममधील कच्चे तेल, कोळसा आणि लाकूड यासारखी स्थानिक उत्पादने जगभरात पाठविली जात राहिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 14,500 किलोमीटरपेक्षा अधिक आकाराच्या जलमार्गावर सरकारने लक्ष केंद्रीत केले असून या क्षेत्रात क्रांतिकारक बदल दिसून येत असल्याचे सोनोवाल यांनी म्हटले आहे.