Tarun Bharat

कर्लीजच्या कारवाईमुळे आजूबाजूच्यांचे धाबे दणाणले

कर्लीजवर सलग दुसऱया दिवशी कारवाई

प्रतिनिधी/ म्हापसा

हणजूण येथील प्रसिद्ध असलेल्या कर्लीज या बार ऍण्ड रेस्टॉरंटचे काल बांधकाम तोडण्याचे थांबविलेले काम शनिवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात पुन्हा तोडण्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत राहिलेला भाग तोडण्यात आला. सीआरझेडच्या उल्लंघनप्रकरणी ही कारवाई होत असून आजूबाजूच्यांचे धाबे दणाणले आहेत.

रेस्टॉरंट तोडण्याचे काम शुक्रवारी सायंकाळी  6.30 वा. बंद करण्यात आले होते. शनिवारी दि. 10 रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास तोडण्याचे काम पुन्हा हाती घेण्यात आले. बेकायदा कर्लीज रेस्टॉरंट हणजूण किनाऱयावरील टेकडीवर असल्याने तेथे जेसीबीला जाण्यासाठी पुरेसा मार्ग नाही. त्यामुळे सदर रेस्टॉरंटचे बांधकाम पाडण्याचे काम मनुष्यबळाचा वापर करून केले जात आहे. हातोडी, कुदळ, गॅस कटर व इतर सामुग्रीने बांधकाम पाडले जात आहे.  बांधकाम पूर्णतः जमीनदोस्त करण्यास किमान आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती अतिक्रमण पथकाने दिली.

 कर्लीजमधील चांगले लाकडी साहित्य, सोफा सेट तसेच फायबरचे साहित्य बाजूला करून उर्वरीत साहित्य मोडीत काढले जात आहे. मागच्या बाजूने टेकडीवरील पहिल्या मजल्यावरील बांधकाम हे बऱयापैकी पाडले. या पहिल्या मजल्यावरील नाईट क्लबचा अर्धा भाग व स्टेज पाडण्याचे कामही शनिवारी सुरू होते. याशिवाय दुसऱया मजल्यावरील बांधकामसुद्धा अर्धे मोडण्यात आले. या कर्लीजच्या आवारात मोडलेल्या फर्निचरचा मोठा साठा पडला होता. ते बाजूला करण्याचे काम कर्लीजचे कामगार करताना दिसून आले.

 कर्लीच रेस्टॉरंटचे बांधकाम पाडण्यात येत असून त्यावर देखरेख ठेवण्याकरीता बार्देश उपजिल्हाधिकारी कार्यालयातील पदाधिकारी असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  रविवारी देखील बांधकाम पाडण्याचे काम सुरूच राहणार  असून सर्व्हे क्र. 42/10 वगळून सर्व्हे क्र. 42/9 व 42/11 मधील कर्लीजचे अवैध बांधकाम सध्या पाडले जात आहे. सीआरझेडच्या उल्लंघनप्रकरणी ही कारवाई होत आहे. असे असले तरी या समुद्र किनारी भागात सुमारे 54 बेकायदेशीर बांधकामे आहेत. मात्र ती मोडण्याचा आदेश किनारी विभागीय प्राधीकरणाने अद्याप दिलेला नाही. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असले तरी कर्लीजवर झालेल्या या कारवाईमुळे आजूबाजूच्या इतर शॅक मालकाने तीव्र नाराजी व्यक्त करीत आपले बांधकाम वाचविण्यासाठी गॉडफादरच्या आधारे आटापीटा चालविला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मात्र याकडे न्यायालय कोणती भूमिका घेते याची चिंता सध्या येथील शॅक मालकांना झाली आहे. काशिनाथ शेटय़े यांनी 2016 साली याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याला अनुसरून ही कारवाई झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशल देसाई अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

शिक्षणाचा गंध असलेल्या मंत्र्याला शिक्षण खाते द्यावे

Amit Kulkarni

”टीएमसी आणि आयपॅक मतदारांचा डेटा गोळा करत आहेत”

Abhijeet Khandekar

म्हापसा पालिकेचे कर्मचारी सतावत असल्याचा व्यापाऱयांचा आरोप

Omkar B

कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा 15 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करणार- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Amit Kulkarni

लंडनस्थित डिचोलीतील इसमाचा कोरोनामुळे मृत्यू

Omkar B

कामगार आयोगाच्या कार्यालया समोर कंदबा कर्मचाऱयांचे उपोषण

Amit Kulkarni