दुसऱया तिमाहीत तूट 36.4 अब्ज डॉलर्सवर : जीडीपीच्या 4.4 टक्के प्रमाण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची चालू खात्यातील तूट (करंट अकौंट डेफिसिट) सप्टेंबर तिमाहीत उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जुलै-सप्टेंबरमध्ये (दुसऱया तिमाहीत) भारताची चालू खात्यातील तूट वाढून 36.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक ठरला आहे.
मागील तिमाहीच्या (एप्रिल-जून) तुलनेत चालू खात्यातील तूट जवळपास दुप्पट आहे. मागील तिमाहीत चालू खात्यातील तूट 18.2 अब्ज डॉलर्स इतकी होती. चालू खात्यातील तुटीचा यापूर्वीचा उच्चांक 31.77 अब्ज डॉलर्स होता. 2013 या आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीत हा आकडा नोंद झाला होता. तर 2021-22 या पूर्ण आर्थिक वर्षात देशाची चालू खात्यातील तूट 38.77 अब्ज डॉलर्स राहिली होती.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशाची चालू खात्यातील तूट 54.2 अब्ज डॉलर्स राहिली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील 3.1 अब्ज डॉलर्सच्या चालू खात्यातील तुटीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 15 टक्क्यांनी अधिक आहे. जीडीपीच्या तुलनेत चालू खात्यातील तूट सप्टेंबर तिमाहीत वाढून 4.4 टक्के झाली आहे. हा आकडा यापूर्वी एप्रिल-जून तिमाहीत 2.2 टक्के होता.
मागील आर्थिक वर्षाच्या म्हणजेच 2021-22 च्या दुसऱया तिमाहीत चालू खात्यातील तूट जीडीपीच्या 1.3 टक्के (9.7 अब्ज डॉलर्स) होती. पहिल्या सहामाहीत चालू खात्यातील तूट जीडीपीच्या 3.3 टक्के राहिली.
जुलै-सप्टेंबर तिमाहीत चालू खात्यातील तूट वाढण्याचे प्रमुख कारण व्यापारी तुटीचे अधिक प्रमाण ठरले आहे. व्यापारी तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 63 अब्ज डॉलर्स इतकी राहिली होती. दुसऱया तिमाहीत हा आकडा वाढून 83.5 अब्ज डॉलर्स झाल्याचे आरबीआयकडून म्हटले गेले आहे.