ऑनलाइन वस्तुंना वाढती मागणी : 53 लाख लोकांनी नोंदवली एकाच दिवशी ऑर्डर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सॉफ्ट बँक आणि मेटा यांच्या पाठिंब्यावर कार्य करणारी ई-कॉमर्स स्टार्टअप कंपनी मीशो यांना एकाच दिवशी विक्रमी 53 लाख लोकांनी वस्तुंची ऑर्डर नोंदवून अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. वर्षाच्या पातळीवर पाहता एकाच दिवसामध्ये एवढी मोठी ऑर्डर ही जवळपास पाचपट नोंदली गेली आहे.
पाचपट अधिक नोंदणी
मीशाला महा इंडियन सेव्हिंग सेल जो मागच्या वर्षी 6 जूनला आयोजित केला होता, त्यामध्ये 10 लाख लोकांनी ऑर्डर नोंदविली होती. या तुलनेमध्ये 5 जून 2022 रोजी 53 लाख लोकांनी आपली ऑर्डर नोंदविली असल्याचे दिसून आले. म्हणजेच जवळपास एकाच दिवशी पाचपट संख्येच्या ग्राहकांनी आपल्या वस्तुंकरीता ऑर्डर नोंदवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 53 लाख लोकांचा मिळालेला प्रतिसाद मीशोसाठी सुखावणाराच म्हणता येईल.
75 टक्के टायर टू शहरातील
यामध्ये 75 टक्के विक्रेते हे टायर टू शहरातील होते, असेही दिसून आले आहे. यात भिलाई, गुंटूर, हुबळी, मीरत, कोल्लम, भटिंडा, हल्दवाणी, सोलापूर आणि तिरुनवेली अशा शहरांचा प्रामुख्याने समावेश आहे.
सहभाग घेतलेल्या विक्रेत्यांच्या वस्तूंना सदरच्या विक्री सेल दरम्यान 217 टक्के इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून 20 हजार पीन कोडच्या शहरांना वस्तुंचा पुरवठा करण्यात आला आहे. यात कपडे, मुलांचे कपडे, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तु आणि इतर वस्तुंचा समावेश आहे. यादरम्यान जानेवारी ते मार्च 2022 दरम्यान 1 कोटी 2 लाख लोकांनी मीशो ऍप डाऊनलोड केल्याचेही समोर आले आहे.