ऑनलाईन टीम/तरुण भारत
चालू वर्षातील पहिले चक्रीवादळ असानीने मंगळवारी आंध्रप्रदेशच्या किनारी भागांमध्ये प्रभाव दाखविण्यास सुरुवात केली आहे. वेगवान वाऱ्यांसह पावसाने मंगळवारी आंध्रप्रदेशच्या अनेक शहरांमध्ये हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात रविवारी संध्याकाळी असानी चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र चक्री वादळात झालं. Asani चक्रीवादळामुळे (asani cyclone) आंध्रप्रदेशात (andhra pradesh) अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काकीनाडा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढच्या काही तासांत चक्रीवादळ आंध्रप्रदेश किनारपट्टीच्या जवळ बंगालच्या उपसागरात पोहचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, असानी चक्रीवादळाचा मार्ग बदलला आहे. बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) ‘असानी’ चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असून, सध्या वादळामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
‘असानी’च्या इशाऱ्यांमुळे ओडिशा ते आंध्र प्रदेशपर्यंतची राज्य सरकारे सतर्क आहेत. चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ ‘असनी’ हे विशाखापट्टणमच्या दक्षिण-आग्नेय-पूर्वेला सुमारे ३३० किमी अंतरावर असल्यानं मंगळवारी रात्रीपर्यंत चक्रीवादळ असानी उत्तर-पश्चिमेकडे सरकेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे.
वादळ पूर्व किनारपट्टीजवळ आल्यानंतर वादळ पुन्हा उत्तर-ईशान्य दिशेने वळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हे वादळ पूर्व किनार्याकडे सरकत असून, त्यामुळे बाधित भागात ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून पाऊसही पडताना दिसत आहे.