4 जणांचा मृत्यू ः स्वयंपाक करताना दुर्घटना
पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमध्ये गंगा नदीपात्रात एका बोटीत सिलिंडरचा स्फोट होण्याची दुर्घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण बोटीच्या आत अन्न शिजवत असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक स्फोट झाल्यानंतर बोटीला आग लागली. काही मिनिटातच बोटीला आगीने वेढल्याने कामगारांना आपला जीव वाचवता आला नाही. ही घटना शनिवारी सकाळी मणेर येथील रामपूर पाटील घाटात घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांनी याची माहिती माणेर पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच माणेर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दानापूर अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मणेर पोलीस ठाण्याने मृतांची संख्या चार असल्याची पुष्टी केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. मृताच्या ओळखीबाबत विचारणा केली असता पोलिसांच्या भीतीने याप्रकरणी कोणीही काहीही सांगण्यास नकार दर्शवला.