सातव्या फेरीतही अर्जुन इरिगेसीकडून कार्लसन पराभूत
वृत्तसंस्था /चेन्नई
भारताचा किशोरवयीन बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर डी. गुकेशने ऐमचेस रॅपिड ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यातील नवव्या फेरीत विश्वविजेत्या नॉर्वेच्या मॅग्सन कार्लसनला पराभवाचा धक्का देत खळबळ माजविली. कार्लसनला हरविणारा तो सर्वात युवा खेळाडू बनला आहे. याआधी सातव्या फेरीतही कार्लसनला भारताच्या अर्जुन इरिगेसी पराभूत केले होते.
16 वर्षीय गुकेशने 12 फेऱयानंतर तिसऱया स्थानावर पोहोचला असून पोलंडचा जॅन क्रिस्तोफ डुडा (25) पहिल्या व अझरबैजानचा शॅख्रियार मॅमेद्यारोव्ह 23 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. गुकेशचे 21 गुण झाले आहेत. गुकेशने पांढऱया मोहरांनी खेळताना केलेली 29 वी चाल कार्लसनला अडचणीत आणणारी ठरली. याआधी सातव्या फेरीत 19 वर्षीय इरिगेसीनी कार्लसनला धक्का देत त्याच्यावरील पहिला विजय नोंदवला होता.
ऐमचेस रॅपिड ऑनलाईन स्पर्धा ही मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूरचा एक भाग असून त्यांनी कार्लसनला हरविणारा सर्वात युवा खेळाडू बनल्याबद्दल गुकेशचे कौतुक केले आहे. गुकेश हा 16 वर्षे 4 महिने 20 दिवसांचा असून यापूर्वी भारताच्याच आर. प्रज्ञानंदच्या नावावर हा विक्रम होता. प्रज्ञानंदने गेल्या फेब्रुवारीत एअरथिंग्स मास्टर्स स्पर्धेत कार्लसनला 39 चालीत हरविले होते, त्यावेळी तो 16 वर्षे 6 महिने 10 दिवस वयाचा होता. कार्लसनला हरविणे स्पेशल असले तरी मला त्या डावाचा अभिमान वाटत नाही, अशी प्रतिक्रिया गुकेशने दिली.