डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वर्धापणदिनी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांची घोषणा
कोल्हापूर प्रतिनिधी
डी वाय पाटील गुपच्या विविध शिक्षण संस्थांमधील 58 शाखेतील सर्वधिक गुण (मेरीट) मिळवणाऱया विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’ देण्यात येईल. यातून सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येईल, अशी घोषणा डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली.
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या 17 वा वर्धापनदिनी अध्यक्षस्थानावरून कुलपती डॉ. पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलपती डॉ. पाटील म्हणाले, 17 वर्षात विद्यापीठाने गरुड भरारी घेतली. यात कर्मचाऱयांचे मोठे योगदान आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीप्राप्त डॉक्टर चांगली सेवा देतात. गुपतर्फे अनेक विद्यार्थ्यांना मोफत अथवा सवलतीत शिक्षण दिले जाते. यंदा मेडिकल वगळता 58 शाखांमधील विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतादेवी डी पाटील मेरीट शिष्यवृत्ती’ दिली जाईल. या शिष्यवृत्तीचे निकष ठरवण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना केली जाईल. तसेच डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल परिसरात 18 मजली वैद्यकीय महाविद्यालयाची सुसज्ज इमारत बांधली जाईल. महापालिकेची परवानगी मिळाल्याने या इमारतीचा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. सामाजिक बांधिलकी म्हणून डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे वर्षभर गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.
प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, कोरोनात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने रुग्णांना दिलेली सेवा अत्यंत कौतुकास्पद आहे. शिवाजी विद्यापीठातील अनेक कोरोनाग्रस्त प्राध्यापक आणि कर्मचाऱयांनीही येथे उपचार घेतले. 17 वर्षात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठापर्यंतची वाटचाल अभिमानास्पद आहे. कुलगुरू डॉ. आर के मुदगल यांनी विद्यापीठाच्या कार्याचा आढावा मांडला. कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी स्वागत केले. यावेळी मेघराज काकडे, देवराज पाटील, डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, श्रीधर स्वामी, अरुण पवार, डॉ. अभय जोशी, प्राचार्य जावेद सागर, रुधिर बारदेस्कर, डॉ. आर एस पाटील, सुचित्राराणी राठोड, श्रीलेखा साटम, ऍड. रवी शिरळकर, डॉ. महादेव नरके, दिलीप मोहिते, शिवाजी मोहिते, अण्णासाहेब मोहिते आदी उपस्थित होते.
संशोधनाचे रूपांतर तंत्रज्ञानात होण्याची गरज – डॉ. पी. एस. पाटील
डी. वाय. पाटील विद्यापीठाचे संशोधन, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. सध्या संशोधनाचे तंत्रज्ञानात रूपांतर करण्यासाठीची सर्वांनी एकत्र आले पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील चांगल्या गोष्टी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ एकत्रित करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आर. एम. मोहिते यांना जीवनगौरव
विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक आर. एम. मोहिते यांना प्रदान केला. कुलपती डॉ संजय डी. पाटील यांनी मोहिते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान केला.
उत्कृष्ट कार्याचा गौरव
उत्कृष्ट अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, ‘डॉ. डी. वाय. पाटील बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर’ अवॉर्ड, ‘बेस्ट टीचर’ अवार्ड, सौ. शांतादेवी डी. पाटील आदर्श ग्रंथपाल पुरस्कार, सर्वोत्तम कर्मचारी पुरस्कार, आदर्श सेवक पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.