वेळ आल्यास पुनर्वसनाची मागणी करण्याची तयारी
प्रतिनिधी /वास्को
मोपाच्या आगमनामुळे दाबोळी विमानतळावरील टॅक्सी व्यवसायीकांमध्ये धास्ती वाढू लागलेली आहे. विमानतळावर गोवा माईल्सशी स्पर्धा करण्याची वेळ आलेली असतानाच आंतरराष्ट्रीय हवाई कंपन्या मोपा विमानतळाकडे वळण्याचे संकेत मिळू लागल्याने दाबोळीतील साडे तीनशे अधिकृती टॅक्सी व्यवसायीकांबरोबरच अप्रत्यक्षरीत्या याच विमानतळावर अवलंबून असलेले जवळपास अडीचशे पर्यटक टॅक्सीवालेही चिंतेत सापडलेले आहेत. वेळ आल्यास सरकारकडे पुनर्वसनाची मागणी करण्याची तयारी काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायीकांनी ठेवलेली आहे.
दाबोळीचा विमानतळ सध्या नाजूक वळणावर आलेला आहे. मोपा विमानतळाचे उड्डाण पुढील दोन तीन महिन्यांत होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच दाबोळी विमानतळावरील टॅक्सी व्यवसायीकांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे. ओमान ऍअरलाईन्सने येत्या जानेवारीपासून मोपा विमानतळाचा वापर करणार असल्याचे जाहीर करून टॅक्सी व्यवसायीकांना पहिला दणका दिलेला आहे. त्यामुळे पुढे काय होणार या धास्तीने टॅक्सी व्यवसायीकांची झोप उडालेली आहे. दाबोळी विमानतळावरील हवाई वाहतुक रोडावल्यास दक्षीण गोव्यातील पर्यटन व्यवसायावर परीणाम होण्याची शक्यता खरी असली तरी पहिला झटका या हवाई वाहतुकीवर प्रत्यक्ष अवलंबून असलेल्या टॅक्सी व्यवसायीकांना बसणार आहे. सध्या दाबोळी विमानतळावर नवनवीन काऊन्टरवरून धुसफुस सुरू आहे. काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायीकांसमोर बेकायदा टॅक्सी व्यवसायीकांचीही समस्या आहे. या प्रश्नांवरून विमानतळावर टॅक्सी व्यवसायीकांमध्ये खटके उडत असतात. परंतु मोपाच्या चाहुलीमुळे सर्वच टॅक्सी व्यवसायीकांसमध्ये धोका निर्माण झाल्याचे या टॅक्सी व्यवसायीकांमध्ये बोलले जात आहे.
गोवा माईल्सच्या काऊन्टरवरून अन्याय झाल्याची टॅक्सी व्यवसायीकांची भावना
दाबोळी विमानतळावरील गोवा माईल्सचा बंद पडलेला काऊन्टर पुन्हा सुरू झालेला आहे. वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी युनाटेड टॅक्सीमेन्स युनियनच्या काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायीकांना विश्वासात घेऊन त्यांना भविष्यातील व्यवसाय तंत्राचा विचार करण्याचा सल्ला देऊन त्यांचे मन वळवले असले तरी अद्यापही या साडे तीनशेच्या संख्येने असलेल्या टॅक्सी व्यवसायीकांचे समाधान झालेले नसल्याचे एकंदर चित्र आहे. अन्याय झाल्याची सुप्त भावना काही टॅक्सी व्यवसायीकांनी व्यक्त केली आहे. ऍपवर आधारीत टॅक्सी व्यवसायाला काऊन्टरची गरजी नाही असे त्यांचे म्हणणे आहे. 1985 पासून दाबोळी विमानतळावर काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायीकांचा काऊन्टर असून विमानतळावर या टॅक्सींना स्टॅण्ड आहे. केवळ विमानतळावरून व्यवसाय करण्याचा राज्य सरकारचा अधिकृत परवाना असल्याने परवान्यातील अटीनुसार हे टॅक्सी व्यवसायीक आपला ऍप विकसीत केल्या तरी गोवा माईल्सप्रमाणे टॅक्सी व्यवसाय करू शकणार नाहीत. ते परवान्यातील नियमात बसणार नाही असे या टॅक्सी व्यवसायीकांचे म्हणणे आहे.
मोपा विमानतळ टॅक्सीवाल्यांचा रोजगार हिसकावण्याची भिती
एकेकाळी दाबोळी विमानतळावर काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायीकांचीच अधिकृत मक्तेदारी होती. त्यामुळे पर्यटक टॅक्सी व या टॅक्सी व्यवसायीकांमध्ये बरीच वर्षे वाद उफाळलेला होता. शेवटी मुळ काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व पर्यटक टॅक्सी सरकारच्या मार्गदर्शनाखाली एकाच युनियनखाली एकत्र आणल्या गेल्यानंतर हा वाद मिटला तरी तयार झालेले नवीन पर्यटक टॅक्सीवाले आणि काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायीकांमध्ये आजही वाद सुरू आहेत. या वादावर आणि त्यांच्या व्यवसायीक स्पर्धेवर आता मोपा विमानतळ वरचढ ठरू शकण्याची चिन्हे निर्माण झाल्याने या सर्वानाच सध्या चिंतेने ग्रासलेले आहे. गोवा माईल्सबरोबरच नियोजित गोवा टॅक्सी ऍपचाही धसका या टॅक्सी व्यवसायीकांनी घेतलेला आहे. मोपा विमानतळ तर त्यांचा सर्वच व्यवसाय हिसकावून घेण्याची भिती त्यांना वाटू लागलेली आहे.
विस्थापीत झाल्यास सरकारकडे पुनर्वसनाची मागणी करणार
मोपा विमानतळ खासगी कंपनी चालवणार असल्याने करारानुसार तो चालवला जाईल. अधिक व्यवसाय खेचण्याकडेच त्यांना कल असेल. त्यामुळे दाबोळी विमानतळ कसा चालवला जाईल याचे धोरण सरकारने जाहीर करायला हवे असे स्थानिक टॅक्सी चालकांना वाटते. मोपामुळे टॅक्सी व्यवसाय ढबघाईस आल्यास, ते विस्तास्थापीत झाल्यास, सरकारला सर्व काळय़ा पिवळय़ा टॅक्सी व्यवसायीकांचे पुनर्वसन करणे भाग पडेल. ही मागणी सरकारकडे करण्याची तयारी युनियनने ठेवलेली असल्याचे काही टॅक्सी व्यवसायीकांनी म्हटले आहे. दाबोळीतील टॅक्सी व्यवसायीकांची व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चार्टर पर्यटन हंगामही लांबणीवर पडल्याने चिंता
हल्लीच ओमान एअरलाईन्सने येत्या जानेवारीपासून मोपावरून हवाई वाहतुक करण्याचे जाहीर केल्यापासून पुढे पुढे इतर हवाई कंपन्यांनी असाच निर्णय घेऊ शकतात याची जाणीव झाल्याने आमच्या रोजगाराचे काय असा प्रश्न त्यांना सतावू लागलेला आहे. यंदाच्या चार्टर हवाई हंगामाने यंदापासूनच धक्का दिलेला आहे. काही उड्डाणे रद्द झालेली आहेत तर नोव्हेंम्बर उजाडायला आता तरी अद्याप एकही चार्टर विमान गोव्यात दाबोळीत दाखल झालेले नाही ही पर्यटन क्षेत्राची वेगळी चिंता आहे.
दाबोळीतील टॅक्सी व्यवसायीकांच्या सद्यस्थितीवर राज्य सरकार योग्य तोडगा काढणार
दाबोळी विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस प्रसाद प्रमुगावकर यांच्या मते दाबोळी विमानतळावरील अधिकृत टॅक्सी व्यवसायीकांसमोर सध्या काही व्यवसायीक आव्हाने उभी राहिलेली आहेत हे खरे आहे. दाबोळीवर 350 अधिकृत काळय़ा पिवळय़ा टॅक्सी आहेत. हजारो कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने गोव्यातील टॅक्सी व्यवसायासंबंधी घेतलेल्या प्रत्येक निर्णयांना त्यांनी पाठींबा दिलेला आहे. सबंध गोव्यात टॅक्सी बंद आंदोलन असतानाही व्यवसाय चालू ठेवलेला आहे. सरकारने दिलेल्या परवान्यातील नियमांचे पालन केलेले आहे. दगडही झेललेले आहेत. आता सरकारनेच दाबोळीवरील टॅक्सी व्यवसायीकांच्या हिताचा विचार करावा. आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत योग्य तोच विचार करून टॅक्सी व्यवसायीकांचे हित सांभाळतील असा विश्वास आम्हाला असल्याचे प्रसाद प्रभुगावकर यांनी म्हटले आहे.