ऑनलाईन टीम/तरुण भारत
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीवर शिंदे गटाच्या आमदारांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची (Working Advisory Committee)बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या सदस्याला समाविष्ट करून घेण्याकरता अजय चौधरी (MLA Ajay Chaudhari) यांनी काल, ९ ऑगस्ट रोजी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेची ही मागणी फेटाळली आहे. दरम्यान, या बैठकीत शिंदे गटाकडून दादा भुसे (Dada Bhuse)आणि उदय सामंत (Uday Samant) यांना समाविष्ट करून ठाकरेंना धक्का दिला आहे.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाआधी विधिमंडळाची कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत सर्व पक्षातील एक सदस्य घेतला जातो. त्यासाठी या समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाच्या गटनेत्यांना सचिवांकडून पाठवण्यात आलं होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तसे कोणतेही पत्र मिळाले नाही. त्यामुळे यासंदर्भात शिवसेना गटनेते अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांनी विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र लिहिले. ही कृती नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचे अजय चौधरी यांनी या पत्रात म्हटलं. अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून समितीच्या बैठकीला निमंत्रित करावे तसेच समितीवर सदस्य नियुक्तीसाठी पत्र द्यावे, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली होती.