ओटवणे / प्रतिनिधी –
आंबेगाव शाळा नं.१ येथे शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांनी साकारलेली दहीहंडी यादगार ठरली. या उत्सवात मनोरंजनासह शैक्षणिक उठावातून शाळेला मदत निधीही उभारण्यात आला.
या दहीहंडी उत्सवात शाळेचे विद्यार्थी राधा, कृष्ण, गोपिका, कृष्णाचे सवंगडी, पेंद्या अशा विविध वेशभषेत सहभागी झाले. दहीहंडीचा आनंद लुटताना विद्यार्थ्यांनी विविध मानवी मनोरे साकारत या उत्सवात अधिक रंगत आणली. उल्लेखनिय म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेसाठी शैक्षणिक उठाव उभारला गेला. त्यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने अभिनव ठरला आहे.
शाळेचे उपक्रमशील शिक्षक नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या उपक्रमासाठी शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका अस्मिता मुनननकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सखाराम कुंभार, शाळेच्या शिक्षिका स्नेहा धोंड, स्नेहल जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या दहीहंडी उपक्रमासाठी किमया पुजारे, समिक्षा राणे यांनी नियोजन केले. यावेळी रुपेश जाधव, विठ्ठल नाईक, धनाजी सावंत, अरुणा दळवी आदी पालक उपस्थित होते. या अभिनव उपक्रमाचे कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख म. ल. देसाई यांच्यासह आंबेगाववासियानी कौतुक केले.