ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशभरात आज सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्ठमी साजरी केली जात असून उद्या (१९ ऑगस्ट) दहीहंडीचा थरार रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eeknath Shinde) यांनी दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. तसेच राज्य सरकारच्या खेळाडूंना दिलेल्या ५ टक्के आरक्षणाचा लाभ नोकऱ्यांमध्ये गोविंदांनाही मिळणार आहे. तसेच विधानसभेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. विद्यमान सरकारने काही दिवसांपूर्वीच दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.
राज्याच्या क्रीडा विभागाची बुधवारी (१७ ऑगस्ट) अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्यात ‘दहीहंडी’ या उत्सवाचा खेळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर राज्यात ‘प्रो दहीहंडी’ हा खेळ सुरु होणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी दिली होती.
दरम्यान, पुढील वर्षापासून राज्यात दहीहंडीच्या स्पर्धा भरवण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यानी केली. प्रो गोविंदाप्रमाणे गोंविंदा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला आहे. राज्यात प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. दहीहंडी आता एक दिवस नाही तर ३६५ दिवस खेळली जाणार आहे.
दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांनाही मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.