तरुण भारत

नरदेहाचे सार्थक कसे होते

अवधूत यदुमहाराजांना म्हणाले, मनुष्यदेह हे केवळ सकळ भाग्याचे फळ आहे, हे लक्षात घेऊन मी अढळ असे वैराग्य धारण केले आहे. आत्मसाधन करण्याला देह हे साधन आहे पण तोच विषयभोगामुळे बाधक होतो. त्या वैराग्याच्या बळाने आणि गुरुकृपावचनाच्या साहाय्याने विषयांची आणि इंद्रियांची ताटातूट करून टाकली. अशा प्रकारे अविद्या नाहीशी झाल्यामुळे चिद्प्रकाशाचा पूर्ण लाभ पदरात पडला व तो पडल्यामुळे या देहात असलेली अहंताही निखालस निघून गेली. ज्ञानाचे साधन जो आपला देह, त्याच्याच ठिकाणी जर वैराग्य, तर मग देहासंबंधित असणाऱयांचा स्नेह तरी कसा राहणार? म्हणून मी निःसंग होऊन पृथ्वीवर संचार करीत असतो. माझ्या देहामध्ये अहंता मुळीच नाही. तू विचारलेस, त्याचे उत्तर मी तुला सांगितले. पुरुषाची अहंता जेव्हा नाहीशी होते तेव्हा सुकलेले पान वाऱयाच्या झोक्मयाने चहुकडे भिरभिरत असते त्याप्रमाणे  प्रारब्धयोगानुसार देहाचे चलनवलन होत असते. याकरिता हे वीरा! जोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो वैराग्याने राहतो. हे सर्व सहजसाध्य होत नाही. त्यासाठी सद्गुरु कृपा होणे अत्यंत आवश्यक आहे. मीठ आणि पाणी एकत्र होताच ऐक्मयरूपाने जसे समरसून जाते, त्याप्रमाणे गुरुवाक्मय कानी पडताच वृत्ती विरून जाते पण हे सहजासहजी घडत नाही. गुरुने कानात महावाक्मय सांगितले की मनात आत्मस्वरूपाचा बोध होतो पण तो फार वेळ टिकत नाही.

  बाह्य पदार्थाकडे लक्ष गेले की गुरुपदेश विसरला जातो. म्हणून मी केलेल्या चोवीस गुरुंकडून मिळालेली शिकवण योग्याने सदैव लक्षात ठेवावी. म्हणजे आसनावर बसले की स्वरूपस्थिती व आसन सोडले की संसारस्फूर्ति! अशी योग्याची अवस्था कधी होत नाही. त्याचा देह आसनावर स्थिर असो की कर्मामध्ये वावरत असो, त्याची वृत्ती सर्वकाळ निश्चळ, निर्मळ असते. अवधूत पुढे म्हणाले, घोर कर्मातसुद्धा समाधी मोडू नये हेच साधण्याकरिता मी चोवीस गुरुना विधिपूर्वक वंदन केले. प्रपंच पाहिला की वृत्ती बदलते. असे होऊ नये म्हणून मी बहुगुरु-साधन केले. निजगुरुनी सांगितलेला परमार्थ साधण्यासाठी प्रपंचातीलच अनेक पदार्थांना मी गुरुपद दिले. गुरुनेच जर बोध केला नसता, तर पृथ्वी वगैरेंनी काय बोध दिला असता! निजस्वार्थ साधण्यासाठी मी गुरुंच्या साधनात पडलो. एकाच गुरुकडून पुष्कळ ज्ञान मिळाले, तरी ते उत्तम ठसत नाही गुरुने आत्मज्ञान सांगितल्याबरोबर हृदयात आत्मस्वरूपाचा प्रकाश पडतो पण तो विद्युल्लतेप्रमाणे चंचल असतो, त्याला स्थिरता नसते. ते स्थिर व्हावे म्हणून मी अनेक गुरु करून मनात येणाऱया उलटसुलट विचारांचे खंडन केले. मोक्षगुरु हा एकच असतो पण इतर गुरु त्याचेच ज्ञान दृढतर करण्यास साधनीभूत होतात. आता मी कर्म केले तरी त्याची जाणीव मुळीच रहात नाही. निजबोधाची खूण पटल्यामुळे सदासर्वदा समदृष्टीच होऊन राहिली आहे. जगाशी संबंध ठेवला तरी माझा एकटेपणा मोडत नाही.

Advertisements

 असा ज्ञानाचा प्रभाव अपूर्व आहे. हे यदुराजा, अशी ही सद्?गुरुची कथा परमार्थाचा लाभ व्हावा म्हणून तुला सांगितली. असे म्हणून मोठय़ा आनंदाने अवधूताने राजास आलिंगन दिले. निजबोधाच्या योगाने ते दोघे एकरूप होऊन गेले. अंतरंगाला अंतरंग भिडले. सृष्टी आनंदाने ओसंडून आली. तेणेकरून वाणीला खीळ बसली, उत्तर प्रत्युत्तर करण्याचे ती विसरली. तो हर्ष हृदयात मावेनासा होऊन घामाच्या रूपाने बाहेर पडला आणि आनंदरूपी मेघ डोळय़ांमध्ये भरून येऊन प्रेमाश्रूचा वर्षाव करू लागले. अहंकाराची बेडी तुटली. सर्वांग रोमांचित झाले. देहाचे भान समूळ नाहीसे झाल्यामुळे शरीर थरथर कापू लागले. शंका-कुशंका संपल्यावर मनासह मनोरथ संपले. यदूने सारा जीवभाव गुरुनाथाला अर्पण केला. ते चिन्ह बाहेरही त्याच्या अंगावर दिसू लागले.

             (क्रमशः)

Related Stories

नाराजीचा गालीचा

Patil_p

पीक विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल!

Patil_p

इंद्रप्रस्थीं मास चारी

Patil_p

बळीराजा आक्रमक, सरकार बचावात्मक

Patil_p

वाटेवरचे गाणे…

Patil_p

रामराज्य…

Patil_p
error: Content is protected !!