तरुण भारत

।। अथ श्रीरामकथा ।।

हनुमान लंकेहून परत आल्यावर त्यांच्या तोंडून सर्व वृत्तांत सविस्तर ऐकून अतिशय प्रसन्न झालेले प्रभू श्रीराम वानरसेना घेऊन समुद्रतटावर गेले. लंकेत बिभीषण रावणाला रामाशी वैर न घेण्याबाबत समजावत होता. पण रावण त्याचे काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. उलट क्रोधित होऊन त्याने बिभीषणाचा अपमान करून त्याला लंकेतूनच हद्दपार केले. बिभीषण रामाकडे आला आणि त्याला शरण गेला. रामाने बिभीषणालाच लंकेचा राजा म्हणून घोषित केले. रामाने लंकेला जाण्यासाठी मार्ग देण्यासाठी समुद्राला विनंती केली. ती संमती मिळाल्यावर जांबवंताच्या आदेशानुसार नल आणि नील या बंधुद्वयाने वानरसेनेच्या मदतीने समुद्रावर सेतू (पूल) बांधला.

श्रीरामांनी सेतू तयार झाल्यावर समुद्रतटावर श्रीरामेश्वराची स्थापना करून भगवान शंकराची पूजा केली. त्यानंतर वानरसेना आणि लक्ष्मणासह ते सेतू पार करून पलीकडे लंकेच्या किनाऱयावर पोचले. पूल बांधण्याचा आणि सेनेसहित रामलक्ष्मण लंकेपर्यंत पोचल्याचा वृत्तांत रावणाच्या कानावर गेलाच. तो मनात अतिशय घाबरला. मंदोदरीनेही रामाशी शत्रुत्व पत्करू नये असे समजावूनही रावणाचा अहंकार त्याला गप्प बसू देत नव्हता. म्हणतात ना ‘विनाशकाले विपरीत बुद्धिः।’ विनाश जवळ आला की, बुद्धी उलटाच विचार करू लागते.

Advertisements

इकडे राम वानरसेनेसह जवळच्याच सुबेल पर्वतावर राहू लागले. त्यानंतर रावणाकडे शिष्टाई करण्यासाठी अंगदाला पाठवण्यात आले. हा अंगद म्हणजे किष्किंधा नगरीचा राजा वाली आणि त्याची पत्नी ताराचा पुत्र होय. पंचकन्यांमध्ये या ताराचा समावेश होतो. तर सुग्रीवाचा तो पुतण्या होता. रामाच्या सेनेचा तो प्रमुख योद्धा होता. वालीवधानंतर सुग्रीव किष्किंधेचा राजा झाला आणि अंगद युवराज झाला. रामाचा दूत म्हणून त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली. रावणाच्या दरबारातील कोणताही योद्धा त्याला आव्हान देऊ शकला नाही. हनुमानाइतकेच सामर्थ्य, साहस, बुद्धी, विवेक त्याच्याकडेही होता. फक्त हनुमानाचा रामाठायी असणारा अनन्यशरणभाव आणि स्वभावाचा सरळपणाचा मात्र त्याच्याकडे अभाव होता. म्हणून क्वचित तो विचलित झालेला दिसतो. पण अंगावर घेतलेली जबाबदारी मात्र दृढनिश्चयाने तो पार पाडतो. अशा या अंगदाने रावणाच्या दरबारात जाऊन रामाला शरण येण्यासंबंधी रामाचा संदेश त्याला दिला. पण रावण कुणाचेच काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता! म्हणूनच एक सुभाषितकार म्हणतो… हस्ती चांकुशहस्तेन कशाहस्तेन वाजिनः। श्रुंगी लगुडहस्तेन खड्गहस्तेन दुर्जनः।। हत्ती अंकुशाच्या हाताने, घोडा चाबकाने, शिंग असणारा प्राणी काठीने तर दुर्जन तलवारीच्या हाताने वठणीवर येतो!

Related Stories

बोलविता धनी वेगळाच !

Patil_p

अवधुतांचे पहिले आठ गुरु भाग 2

Patil_p

राजस्थाननंतर महाराष्ट्र?

Patil_p

शांततेच्या दिशेने…

Patil_p

सायबर जगातील ओळख – डिजिटल आयडेंटीटी

Patil_p

लेकरांवर ममतेचा वर्षाव करणारी माता तुळजाभवानी

Patil_p
error: Content is protected !!