तरुण भारत

कोविडच्या दुसऱया लाटेत ईएसआय हॉस्पिटलात 1500 जणांवर उपचार

रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के दुसऱया लाटेत 21 रूग्ण दगावले

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

सरकारने काल कोविडसाठी अधिकृत केलेल्या हॉस्पिटल विमुक्त केली. त्यात मडगावच्या कोविड ईएसआय हॉस्पिटलाचा देखील समावेश आहे. सद्या या हॉस्पिटलात 14 रूग्ण उपचार घेत असून त्यांना डिसचार्ज दिल्यानंतर 1 जुलै पासून पुन्हा एकदा हॉस्पिटल ईएसआय नोंद असलेल्या कर्मचाऱयांसाठी वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती या हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. विश्वजीत फळदेसाई यांनी दिली. 

गोव्यात जेव्हा कोविडची पहिली लाट आली होती, तेव्हा सरकारने एका रात्रीत मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलचे कोविड हॉस्पिटलात रूपांतर केले होते. कोविडच्या पहिल्या लाटेत या हॉस्पिटलाने रूग्णांना चांगली सेवा दिली होती. नंतर रूग्णांची संख्या वाढू लागल्याने तसेच अन्य आजारांची पार्श्वभूमी असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी गोमेकॉचा वापर करण्यात आला. कोविडच्या पहिल्या लाटेत या ठिकाणी डॉक्टर व नर्सेसना बराच अनुभव मिळाला व त्यांचा उपयोग दुसऱया लाटेत अत्यंत प्रभावीरित्या करण्यात आला. त्यामुळेच रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के राहिले.

1500 रूग्णांवर उपचार

कोविडची दुसरी लाट गोव्यात दाखल होताच 18 एप्रिल पासून पुन्हा हे हॉस्पिटल कोविडच्या रूग्णांसाठी वापरण्यास सुरवात झाली. दुसऱया लाटेत जवळपास 1500 रूग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले. त्यात 21 जणांचा बळी गेला. कोविड झाल्याने अनेकांची प्रकृती बरीच नाजूक बनली होती. हॉस्पिटलचे सर्व अतिदक्षता विभाग रूग्णांनी भरले होते. अशावेळी 150 रूग्णांना इतर हॉस्पिटलात  स्थलांतरीत करावे लागले.

दुसऱया लाटेत गोमेकॉतून केवळ चार डॉक्टर या ठिकाणी पाठविण्यात आले होते. इतर सर्व डॉक्टर व नर्सेस या ईएसआय हॉस्पिटलच्याच होत्या. डॉ. एडविन गोम्स हे कोविडच्या पहिल्या लाटेत गोमेकॉतून कोविड ईएसआय हॉस्पिटलात आले होते. पहिल्या लाटेत ते स्वता कोविड पॉझिटिव्ह झाले. हा भाग सोडल्यास त्यांनी सातत्याने या हॉस्पिटलात आपली सेवा दिलीय.

डॉ. एडविन गोम्स यांनी कोविड रूग्णांमधील भीती दूर करतानाच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून रूग्णांची सेवा केली व असंख्य रूग्णांसाठी ते खऱया अर्थाने देवदूत बनले. त्यांच्या हाताखाली काम करणाऱया गोमेकॉच्या तसेच ईएसआय हॉस्पिटलाच्या डॉक्टर व नर्सेसने त्यांना तेव्हढीच पुरक अशी साथ दिली. गोमेकॉतून कोविड ईएसआय हॉस्पिटलात येणारे ते पहिले बिगर ईएसआय डॉक्टर होते ते आज सुद्धा ईएसआय हॉस्पिटलात आपली सेवा देत आहेत.  

250 रूग्णांवर डायलिसिस

कोविडच्या दुसऱया लाटेत ईएसआय हॉस्पिटलात मृतपिंडाच्या आजाराने ग्रासलेल्या जवळपास 250 रूग्णांवर डायलिसिस करण्यात आल्याची माहिती डॉ. विश्वजीत फळदेसाई यांनी दिली.

दुसऱया लाटेत ईएसआय हॉस्पिटलमध्ये कधीच ऑक्सिजन व औषधांची कमतरता भासली नाही. दुसऱया लाटेत गोमेकॉत व मडगावच्या जिल्हा इस्पितळात अनेक रूग्णांचा बळी गेला. मात्र, ईएसआय हॉस्पिटलमध्ये 21 जणांचा बळी गेल्याची नोंद झाली. यातील बहुसंख्य रूग्णांना अन्य आजारांची पार्श्वभूमी होती तसेच अनेक रूग्ण हे शेवटच्या टप्प्यात हॉस्पिटलात उपचारासाठी आले होते. जर वेळीच उपचारासाठी आले असते तर नक्कीच काहीच प्राण वाचले असते.

Related Stories

राजकीय घटस्थापनेची गुरुवारी ‘डेडलाईन’!

Amit Kulkarni

अक्षर ऍडव्हर्टाईजचे मालक रमेश मिशाळ यांचे निधन

Patil_p

वर्षभरात 2103 अपघातांत 198 जणांचा मृत्यू

Patil_p

राजधानीतील अनेक मंदिरांचे निर्जंतुकीकरण

Omkar B

वांते डोंगरकडा सत्तरी येथील रस्त्याचे काम अर्धवट बंद

Patil_p

पालिका कायदा दुरुस्ती वटहुकूम अखेर मागे

Patil_p
error: Content is protected !!