तरुण भारत

गलवान चा संदेश

पुर्व लडाखमधील ‘गलवान’ इथं घडलेल्या, अंगावर अक्षरशः शहारे आणणाऱया त्या घटनेला एक वर्ष नुकतंच पूर्ण झालंय…20 भारतीय सैनिकांनाr चीनच्या दादागिरीचे तीन तेरा वाजविताना तेथील प्रत्येक इंचाचं, आपल्या प्रदेशाचं रक्षण करण्यासाठी जिवाची पर्वा न करता, कुटुंबाचा विचार न करता प्राणाची आहुती दिली…‘ड्रगन’च्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या 40 ते 45 जणांवर देखील गारद होण्याची वेळ आली…त्या अनपेक्षित घटनेमुळं कोटय़वधी भारतीय जनतेला बीजिंगच्या आक्रमक आणि कावेबाज वृत्तीचं, धोकादायक स्वभावाचं दर्शन पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं घडलं. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ‘कम्युनिस्ट’ देशानं सैनिकांच्या अनेक तुकडय़ा अन् विविध खतरनाक शस्त्रास्त्रं, तोफा यांच्यासह एप्रिल नि मे महिन्याच्या (2020) सुरुवातीला पूर्व लडाखला दिलेली धडक अभूतपूर्व अशीच होती…

बीजिंगच्या पावलांचं सखोल, तर्कशुद्ध, सुसंगत, अगदी विचारपूर्वक विश्लेषण केल्यास असं दिसून येईल की, ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ आणि शस्त्रं यांच्या हालचालींचं नियोजन केलं होतं ते शिस्तीनं, काळजीपूर्वकरीत्या, पद्धतशीरपणे. त्याचं वर्णन निर्दोष अन् ‘वेल एक्झिक्युटेड मिलिटरी मनूव्हर’ वा कौशल्यपूर्ण डावपेच, चतुर योजना नि खेळी असं केल्यास ते अगदी शंभर टक्के अचूक ठरेल…चीनचं प्रत्येक पाऊल त्या राष्ट्रानं फार पूर्वी आखलेल्या ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे’शी अथवा ‘एलएसी’शी निःसंशय निगडीत होतं. खेरीज ‘ड्रगन’नं भारतीय सैनिकांचे ‘पेट्रोलिंग’चे पारंपरिक मार्ग बेकायदेशीररीत्या अडविले…

Advertisements

‘पीपल्स लिबरेशन आर्मी’नं भारताला आश्चर्याचा अक्षरशः जबरदस्त धक्का दिला हे आपल्या देशाच्या कट्टर समर्थकांनाही मान्य करावंच लागेल…परंतु भारतीय लष्करानं देखील वेळ न गमावता, ‘फॉर्म्युला वन’ शर्यतीप्रमाणं अतिशय वेगानं आणि कार्यक्षमतेनं हालचाली केल्या अन् चीनला जशास तसं उत्तर दिलं. त्यामुळं ‘पीएलए’ला योजनेनुसार, नवी दिल्लीच्या सीमांना धडक देणं, आपल्या प्रदेशात हवा तसा धुडगूस घालणं जमलं नाही…भारतानं सैनिकांच्या संख्येत प्रचंड वृद्धी केल्यानं विश्वाला दर्शन घडलं ते आपल्या तिखट, जोरदार कर्तृत्वाचं, प्रत्युत्तराचं…बीजिंगनं पूर्व लडाखला आक्रमक पद्धतीनं लष्करी धडक दिली ती जगाला व भारताला चीनच्या आर्थिक, लष्करी, तंत्रज्ञानविषयक ताकदीसंबंधी कळावं म्हणूनच. बीजिंगच्या साऱया घातक योजनांमागं लपला होता तो ‘ड्रगन’ला सामोरं जाणं सोपं नव्हे हे नवी दिल्लीला हे समजावं असाही एक हेतू…

दुसऱया पद्धतीनं सांगायचं झाल्यास असं म्हणणं शक्य आहे की, चीनला विश्वाला संदेश द्यायचाय तो आशियातल्या त्या देशाच्या शक्तीविषयी. बीजिंगच्या मते, त्यांना या खंडात आव्हान देणं कुठल्याही राष्ट्राला शक्य नाहीये. भारतासह प्रत्येक देशानं हे मान्य करायलाच हवं, त्यांना ही बाब कळायलाच हवी…नवी दिल्लीच्या उत्तरेकडील सीमांवर सातत्यानं दादागिरी करणं शी जिनपिंग यांना शक्य झालंय ते दोन्ही राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्यात, शस्त्रास्त्रांच्या क्षमतेत असलेल्या फरकामुळं. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’नं 2020 सालच्या उन्हाळय़ात लडाखमध्ये घुसखोरी केली ती या पार्श्वभूमीवर…

‘कोअर कमांडर’ स्तरावर लष्करी चर्चेच्या अकरा फेऱया झालेल्या असल्या अन् पँगाँग तलावाच्या ठिकाणाहून माघार घेण्यात आलेली असली, तरी अजूनही चीन व भारतामधील वादावर तोडगा निघू शकलेला नाहीये. शुक्रवारी झालेल्या दोन्ही देशांमधील ‘सीमावर्ती व्यवहारांसंबंधी सल्ला आणि समन्वयासाठी’च्या यंत्रणेच्या 22 व्या बैठकीत ‘एलएसी’वरील संघर्षाच्या सर्व ठिकाणांहून पूर्णपणे माघार घेण्याचं लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीनं वरि÷ कमांडरांच्या चर्चेची बारावी फेरी लवकरच घेण्यावर सहमती झालीय…असं असलं, तरी बीजिंगवर कदापि विश्वास ठेवता येणार नाही. ते आपली टेहेळणी क्षमता वाढवत चालले असून त्याअंतर्गत हल्लीच पँगाँग तलावाच्या दक्षिणेकडील ‘कैलास रेंज’च्या नजीक नव्या ‘यूएव्ही’ची (मानवरहित हवाई वाहन) चाचणी घेण्यात आलीय. भारतीय तळांवर नजर ठेवणं हा त्यामागचा उद्देश. त्याखेरीज पूर्व लडाखमध्ये अती उंचावरील लढाईसाठी स्थानिक तिबेटी युवकांचा समावेश असलेल्या नव्या तुकडय़ा तयार करण्याच्या कामाला ‘ड्रगन’ लागल्याचं देखील समोर आलंय…

सध्या प्रश्न निर्माण झालाय तो असा की, भारतानं येऊ घातलेल्या दिवसांत, वर्षांत कोणत्या पद्धतीनं ‘प्रादेशिक अखंडते’चं रक्षण करणं योग्य ठरेल ?…त्याचं उत्तर फारसं कठीण नाहीये…आम्हाला अन्य देशांसह पाया घालावा लागेल तो समतोल, मजबूत ‘युती’चा. नवी दिल्लीला त्यांच्याकडून आधुनिक शस्त्रं, तंत्रज्ञान मिळणं अतिशय आवश्यक. खेरीज भारताला विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांचं जोरदार समर्थन मिळायला हवं. आम्हाला त्या ‘युतीं’च्या साहाय्यानं चीनच्या लडाखमधील राजकीय नि लष्करी बळजबरीला ‘स्ट्रटेजिक’ स्वायत्ततेच्या आधारे आत्मविश्वासानं सामोरं जाणं शक्य होईल…नवी दिल्लीला ‘युती’साठी साहाय्य मिळू शकेल ते राष्ट्रांच्या तीन गटांचं…

पहिल्या गटात समावेश अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, जपान अणि ऑस्ट्रेलियासारख्या जगातील प्रमुख लोकशाही देशांचा…‘क्वॉड’ म्हणजे समतोल युतीचं एक उत्कृष्ट उदाहरण. त्यामुळंच ‘क्वॉड’ संघटनेला आक्रमक चीनची पर्वा न करता ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये सत्तेचं केंद्र बनणं शक्य झालंय, गतीनं विकसित होणं जमलंय…दुसऱया गटात समावेश काठावर बसलेल्या, ‘ड्रगन’ला फारसा विरोध न करणाऱया रशिया अन् व्हिएतनाम या दोन राष्ट्रांचा…तिसऱया गटात बांगलादेशसारख्या शेजारी देशांचा समावेश करणं शक्य आहे…सोपं नसलं, तरी नवी दिल्लीला एक वा दोन गटांचा पाया घालणं फारसं अशक्य नाहीये…आम्हाला समतोल, मजबूत युतीला जन्म देण्याचा अनुभव नाही. शिवाय भारताला ‘समाधान’ देणं युती या संकल्पनेला भूतकाळात कधीही जमलेलं नाहीये. त्यासाठी गरज आहे ती राजकीय ‘स्ट्रटेजिक’ संबंधांपेक्षा गंभीर, गहन भागीदारीची…

मजबूत ‘युती’त समावेश ताकदवान आणि एकमेकांत गुंतलेल्या आर्थिक संबंधांचा अन् विविध देशांमधील जनतेच्या एकमेकांशी असलेल्या अतिशय जिव्हाळय़ाच्या संबंधांचा…त्यासाठी गरज आहे ती भारतानं स्थानिक धोरणांशी तडजोड करण्याची. परंतु नवी दिल्लीनं यापूर्वी अशा बाबींशी मैत्री केलेली नाहीये…खेरीज महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागेल, नवीन विश्वात प्रवेश करावा लागेल तो आपल्या राजनैतिक अधिकाऱयांना सुद्धा. त्यांना दर्शन घडवावं लागेल ते अफलातून मुत्सद्देगिरीचं. नवी दिल्लीत ती क्षमता मात्र निश्चितच आहे…

पूर्व लडाखमधील चिनी दादागिरीला फक्त लष्करी संघर्ष म्हणून पाहणं संपूर्ण चुकीचं…नवी दिल्लीला शर्यतीत बीजिंगला मागं टाकणं बरंच कठीण आणि ही बाब चीनला पुन्हा पुन्हा सिद्ध करायचीय, ओरडून सांगायचीय…उदाहरणार्थ अर्थव्यवस्था आणि विकासदर, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील असामान्य कर्तृत्व अन् वर्चस्व, सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकद नि साक्षरतेचं व जगण्याचं प्रमाण…त्याखेरीज ‘कम्युनिस्ट’ राष्ट्राच्या ‘जीडीपी’नं 2019 साली स्पर्श केला तो तब्बल 14 ट्रिलियन डॉलर्सना, तर भारताला 3 ट्रिलियन डॉलर्सना (2.9 ट्रिलियन डॉलर्स) धडक देणंही जमलेलं नाही. आम्हाला येऊ घातलेल्या वर्षांत हे अंतर कमी करावंच लागेल…चीन भारताच्या उत्तरेकडच्या सीमेला सातत्यानं कुरतडतोय. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीला येत्या किमान 25 वर्षांत दर्शन घडवावं लागेल ते गतिमान, न घटणाऱया आर्थिक विकासदराचं नि 8 टक्क्यांच्या ‘जीडीपी’ वृद्धीला पुन्हा स्पर्श करण्यासाठी लक्ष केंद्रीत करावं लागेल समाधानकारक गुंतवणुकीवर !

– राजू प्रभू ([email protected])

Related Stories

तालिबान अधिक काळ टिकणे अशक्य!

Patil_p

राजनाथ सिंग रशियाच्या दौऱयावर

Patil_p

टाइम्स स्क्वेअरवर शनिवारी फडकणार भारतीय ध्वज

Patil_p

अस्थमाच्या रुग्णांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी

Omkar B

ज्यो बिडेन यांचा भारतातील एनआरसी, सीएए कायद्याला विरोध

datta jadhav

भूकंपाने हादरले अफगाणिस्तान!

Rohan_P
error: Content is protected !!