तरुण भारत

सोमवार गर्दीचा… वाहतूक कोंडीचा!

शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी : लस घेण्यासाठी विद्यार्थ्यांची आरोग्य केंद्रात प्रचंड गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन

कोरोना गेलेला नाही, शिवाय डेल्टा प्लस नावाच्या नवीन विषाणूचा शिरकाव हळूहळू होत आहे. परंतु विकेंड लॉकडाऊन उठताच नागरिकांनी या कशाचेच भान बाळगले नाही. परिणामी सोमवारी सकाळच्या सत्रात शहरातील विविध रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. महाविद्यालये सुरू होण्याबाबत चर्चा सुरू असल्याने तत्पूर्वी लस घ्यावी यासाठी विद्यार्थ्यांनी विविध आरोग्य केंद्रात प्रचंड गर्दी केली.

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारपासून खरेदीला वाव मिळाल्याने बेळगाव शहर परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत जेथे पहावे तेथे केवळ वाहनांच्या रांगाच व त्यांच्या हॉर्नचे आवाज ऐकू येत होते. खरेदीसाठी नागरिक एकाचवेळी बाहेर पडल्याने ही वाहतुकीची प्रचंड कोंडी जागोजागी झाली होती. यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न वाहनचालकांसमोर होता. यामुळे तासनतास वाहने रस्त्यांवर अडकून पडली होती. वाढलेले पेट्रोलचे दर आणि त्यातच या वाहतूक कोंडीमुळे अडकल्याने इंधनाचा अधिकचा खर्च वाहन चालकांना करावा लागला.

धर्मवीर संभाजी चौक, खडेबाजार, समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड, गोंधळी गल्ली, काकतीवेस रोड, गणपत गल्ली, मारूती गल्ली, कलमठ रोड, रविवार पेठ, सीबीटी सर्कल, शनिमंदिर कॉर्नर, पाटीलगल्ली, रामदेव गल्ली, कडोलकर गल्ली, खंजरगल्ली, बसवाण गल्ली या शहराच्या मध्यवर्ती भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे ज्यांना वेळेत पोहोचायचे होते त्यांना मात्र निश्चित स्थळी उशीराने पोहोचावे लागले. चार चाकी वाहने अरूंद गल्ल्यांमध्ये घालण्यात आल्याने कोंडीत वाढ होत होती. यामुळे दुपारपर्यंत या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

दोन दिवसांच्या कडक विकेंड लॉकडाऊनंतर सोमवारी बाजारपेठेत गर्दी होणार हे अपेक्षितच होते. परंतु इतकी विक्रमी गर्दी होईल असे मात्र कोणालाच वाटले नव्हते. पुन्हा तिसरी लाट आणि लॉकडाऊन यांची टांगती तलवार असल्याने नागरिकांना सणांना प्रारंभ होण्यापूर्वी सर्व तयारी करून घेण्याची घाई लागली आहे. खरेदीबरोबरच अनेक तऱहेच्या दुरूस्तीची कामेही खोळंबली होती. त्यामुळे प्रामुख्याने बापट गल्लीत मोबाईलची दुकाने, विद्युत साहित्याची दुकाने येथे अभूतपूर्व गर्दी झाली होती.

रहदारी पोलिसांचे दुर्लक्ष

शहरात एकीकडे प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असताना वाहतूक पोलीस मात्र कोठेही निदर्शनास येत नव्हते. धर्मवीर संभाजी चौक वगळता इतर कोणत्याही ठिकाणी रहदारी पोलीस नसल्याने वाहनचालक मर्जीप्रमाणे वाहने रेटत होते. प्रत्येकजण आपले वाहन पुढे कसे जाईल याचाच विचार करीत असल्याने कोंडीत वाढ होत होती. सोमवारी बाजारात गर्दी होणार हे माहिती असतानाही पोलिसांनी आधिच नियोजन केले असते. तर गर्दीवर ताबा मिळवता आला असता, असे मत नागरिक व्यक्त करीत होते.

उपनगरांमध्येही कोंडीचे वातावरण

सोमवारी केवळ बेळगाव शहरातच नाही तर उपनगरांमध्येही वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. नेहरू नगर, शिवबसव नगर, सदाशिवनगर, श्रीनगर, आझम नगर, शाहूनगर, वडगाव, अनगोळ, उद्यमबाग, शहापूर, टिळकवाडी या उपनगरांमध्ये देखील गल्लो गल्ली वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे या गर्दीपेक्षा घरी बसलेले बरे अशी म्हणण्याची वेळ दुचाकी व चारचाकी वाहन चालकांवर सोमवारी आली.

Related Stories

अनगोळमध्ये पुन्हा डेनेजची समस्या गंभीर

Amit Kulkarni

ज्ञान प्रबोधन शाळेत एनसीसी युनिटचे उद्घाटन

Amit Kulkarni

ऐंशीच्या दशकात घडले तंत्रशुद्ध खो-खोचे प्रदर्शन

Amit Kulkarni

अंगणवाडी सेविकांचे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Patil_p

घरभाडय़ासाठी तगादा लावू नये

Patil_p

निवडणुकीत तरुणाईचा वाढता ‘इंटरेस्ट’

Patil_p
error: Content is protected !!