तरुण भारत

चिलीला नमवून ब्राझील उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ रिओ डे जेनेरिओ

माजी विजेत्या ब्राझीलने येथे सुरू असलेल्या कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात ब्राझीलने चिलीचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यात ब्राझीलला उत्तरार्धात 10 खेळाडूंनिशी खेळ करावा लागला.

Advertisements

या सामन्यात दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच राहिला. दरम्यान खेळाच्या उत्तरार्धात या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल नोंदविला गेला. 46 व्या मिनिटाला बदली खेळाडू लुकास पेक्वेटाने डाव्या बगलेतून मारलेला अचूक फटका चिलीचा गोलरक्षक ब्रॅव्हो थोपवू शकला नाही. यानंतर दोन मिनिटाच्या कालावधीत ब्राझीलचा हुकमी खेळाडू गॅब्रियल जिजसला पंचांनी लालकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. चिलीचा खेळाडू मिनाच्या दिशेने जिजसने हेतूस्पर चेंडू लाथाडल्याने पंचांनी त्याला लालकार्ड दाखविले. ब्राझीलच्या खेळाडूंनी या सामन्यात आपली बचावफळी भक्कम राखण्यावर अधिक लक्ष दिले होते. चिलीकडून काही आक्रमक चाली झाल्या पण ब्राझीलच्या बचावफळीने तसेच गोलरक्षकाने चिलीचे हल्ले थोपविले. या सामन्यात ब्राझील संघातील नेम्मारची अधिक दमछाक झाल्याचे जाणवले.

ब्राझीलच्या खेळाडूंनी पासेस अचूक देण्यावर भर दिला होता. खेळाच्या उत्तरार्धात चिलीच्या व्हर्गेसचा गोल पंचांनी ऑफसाईड ठरविला. 68 व्या मिनिटाला चिलीच्या ब्रेरटोनने ब्राझीलच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली आणि त्याने हेडरद्वारे मारलेला फटका गोलपोस्टच्या दांडीला आदळून बाहेर गेल्याने चिलीला आपले खाते उघडता आले नाही. या सामन्यात चिलीने चांगली कामगिरी केली पण नाशिबाची साथ मिळाली नाही, असे चिलीच्या व्हिडॉलने म्हटले आहे. या पराभवामुळे चिलीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत पेरूने पराग्वेचा पेनल्टीमध्ये 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. 2019 च्या कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पेरू यांच्यात अंतिम फेरीत लढत झाली होती आणि ब्राझीलने पेरूचा 3-1 असा पराभव करून अजिंक्यपद पटकाविले होते. त्या अंतिम सामन्यात ब्राझीलच्या जिजसला पंचांनी लालकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले होते. ब्राझील संघाची कामगिरी समाधानकारक झाल्याचे मत प्रशिक्षक टिटेने व्यक्त केले आहे. आता या स्पर्धेतील अंतिम सामना 10 जुलै रोजी मॅरेकेना स्टेडियमवर खेळविला जाणार आहे.

Related Stories

कुस्तीतील ‘रामा’चा वनवास संपणार कधी ?

Abhijeet Shinde

मेगा लिलावापूर्वी विराट, रोहित, धोनी आयपीएलसाठी ‘रिटेन’

Patil_p

इंग्लंडचे प्रशिक्षक सिल्व्हरवूड कोरोनाबाधित

Patil_p

ऑस्ट्रेलियन संघात 5 पदार्पणवीर

Patil_p

विदेशी क्रिकेटपटूंशिवाय आयपीएल स्पर्धा होवू शकत नाही : वाडिया

Patil_p

आशिया चषक महिला फुटबॉल पात्रता स्पर्धेचा ड्रॉ लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!