तरुण भारत

राज्यातून चौघांना संधी

प्रतिनिधी/ बेंगळूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कर्नाटकातील चार खासदारांना संधी मिळाली आहे. त्यामध्ये राज्यसभेचा एक सदस्य तर लोकसभेच्या तीन सदस्यांचा समावेश आहे. या चौघांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देण्यात आले असून  खातेवाटपही करण्यात आले आहे. खासदार शोभा करंदलाजे यांना कृषी खाते तर राजीव चंद्रशेखर यांना कौशल्यविकास, ईलेक्ट्रॉनिक्स, आयटी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ए. नारायणस्वामी यांना सामाजिक न्याय व सबलिकरण तर भगवंत खुबा यांना पुनउ&पयोगी ऊर्जा, रसायन, खते ही खाती देण्यात आली आहेत.

Advertisements

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी राज्यातून सात ते आठ खासदारांनी आठवडाभरापासून हायकमांडवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न चालविला होता. अखेर चौघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. यापैकी ए. नारायणस्वामी चित्रदुर्ग मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदारपदी निवडून आले आहेत. पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या गळय़ात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडली आहे. तर उडुपी-चिक्कमंगळूरच्या खासदार शोभा करंदलाजे आणि बिदरचे खासदार भगवंत खुबा दोन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. तर राजीव चंद्रशेखर हे 2006 पासून सलग तीन वेळा राज्यसभेवर निवडून आले आहेत. बुधवारी या चौघांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी शोभा करंदलाजे एक आहेत. येडियुराप्पा यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना अपेक्षेप्रमाणे वजनदार खाते देण्यात आले आहे. कृषी राज्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. तर ए. नारायणस्वामी हे मादीग समाजातील प्रभावी नेते असून त्यांनी दक्षिण कर्नाटकात अनुसूचित जमातीच्या भाजप नेत्यांना एकत्रित आणण्याची कामगिरी केली आहे. त्यांना सामाजिक न्याय आणि सबलिकरण खाते देण्यात आले आहे. खातेवाटपाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच रात्री उशिरा नव्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले.  

सदानंदगौडांना राज्यात महत्त्वाचे पद मिळणार?

भाजपचे एकनिष्ठ नेते असणारे केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांनी बुधवारी राजीनामा दिला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्रिपद भूषविल्याचा अनुभव असलेल्या सदानंदगौडांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे. त्यांना भाजप हायकमांड राज्यात महत्त्वाचे पद  देणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते रसायन आणि खत खात्याची जबाबदारी सांभाळत होते.

शोभा करंदलाजे

उडुपी-चिक्कमंगळूरच्या 55 वर्षीय खासदार शोभा करंदलाजे यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांनी मंगळूर विद्यापीठातून मास्टर ऑफ सोशल वर्क्स विषयात पदवी तर म्हैसूर विद्यापीठातून एम. ए. पदवी घेतली आहे. त्यांनी 2004 पासून 2008 पर्यंत त्यांनी कर्नाटक विधानपरिषदेचे सदस्यपद भूषविले आहे. 2008 मध्ये बेंगळूरच्या यशवंतपूर मतदारसंघातून विधानसभेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी ग्रामविकास-पंचायतराज, अन्न-नागरी पुरवठा खात्यांचे मंत्रिपद सांभाळले होते. ऊर्जा खात्याची जबाबदारीही त्यांनी पेलली होती.

 2014 च्या निवडणुकीवेळी शोभा करंदलाजे यांनी विजय संपादन करत पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश केला होता. त्यांनी महिला सबलीकरण समितीत सदस्यपदही भूषविले आहे. संरक्षण मंत्रालयाची स्थायी समिती, भूसंपादन, पुनर्वसन आणि मदत वितरणासंबंधी नेमण्यात आलेल्या संयुक्त समितीतही त्यांनी काम पेले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या दुसऱयांदा निवडून आल्या. केंद्रीय ऊर्जा, महिला सबलीकरण आणि महिला-बालकल्याण समितीत त्या सदस्या आहेत.   भाजपच्या विविध स्तरावरील जबाबदाऱयाही त्यांनी सांभळल्या आहेत. कट्टर हिंदुत्ववादी नेत्या म्हणूनही त्या ओळखल्या जातात. बालपणापासूनच रा. स्व. संघामध्ये त्या सक्रिय आहेत.

ए. नारायणस्वामी

मुळचे बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ातील ए. नारायणस्वामी हे 2019 मध्ये प्रथमच लोकसभेवर निवडून आले होते. त्यांना पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. 64 वर्षीय नारायणस्वामी 1996 मध्ये आनेकल नगरपालिकेवर निवडून आले. आनेकल मतदारसंघातून 1997, 1999, 2004 आणि 2008 च्या निवडणुकांमध्ये ते सलग चारवेळा विधानसभेवर निवडून आले होते. राज्य मंत्रिमंडळात समाजकल्याण खाते सांभाळल्याचा अनुभव त्यांना आहे. भाजपच्या राष्ट्रीय एससी मोर्चाचे मुख्य सचिव आणि राज्य भाजप एससी मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदाऱया पार पाडल्या आहेत. मादीग समाजातील प्रभावी नेते आणि पक्षनिष्ठ, कट्टर हिंदुत्ववादी नेते अशी त्यांची ओळख आहे.

राजीव चंद्रशेखर

ज्येष्ठ पत्रकार, उद्योजक आणि राजकारणी अशी ओळख असणारे राजीव चंद्रशेखर कर्नाटकातून राज्यसभेवर निवडून आले आहेत. मुळचे बेंगळूरमधील असणारे 57 वर्षीय राजीव चंद्रशेखर इलेक्ट्रिकल इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स, ऍडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम विषयातील पदवीधर आहेत. देशातील सर्वात पहिली सेल्युलर कंपनी, बीपीएल मोबाईलचे उत्पादन त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी म्हणजेच 1994 मध्ये सुरू केले होते.

2006 आणि 2014 च्या राज्यसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेवर निवडून आले होते. तर 2018 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सलग तिसऱयांदा राज्यसभेत प्रवेश केला. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. ते केरळ राज्य भाजपचे उपाध्यक्षही आहेत. त्याचप्रमाणे अर्थखात्याच्या संसदीय कमिटीचे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे विविध पदांची जबाबदारी ते सांभाळत आहेत. ज्युपीटर संस्थेमार्फत त्यांनी गुंतवणूक केलेल्या सुवर्ण न्यूज, कन्नडप्रभा, रिपब्लिक टीव्ही या प्रसारमाध्यमांचा समावेश आहे.

2009 मध्ये उत्तर कर्नाटकात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे घरे गमावलेल्यांना आसरा निर्माण करून देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेली आश्रय योजना यशस्वी करण्यात राजीव चंद्रशेखर यांची भूमिका महत्त्वाची होती. सिस्को, इन्फोसिस, विप्रो आदी कंपन्यांना एकत्रित आणून पूरग्रस्तांसाठी 40 हजार घरे बांधून देण्याचे काम राजीव चंद्रशेखर यांनी हाती घेतले होते.

भगवंत खुबा

54 वर्षीय गुरुबसप्पा खुबा हे अभियांत्रिकी पदवीधर असून ते 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून आले आहेत. लोकसभा सदस्यांना संगणक वितरण करणाऱया समितीचे सदस्यपद सांभाळले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा समितीचे ते सदस्यही आहेत. बिदर जिल्हय़ात भाजप पक्षसंघटनेत त्यांचे योगदान अधिक आहे.

Related Stories

‘नीट-पीजी’त ओबीसींना 27 टक्के आरक्षण

Patil_p

देशात पहिले कोरोना टेस्टिंग किट तयार

datta jadhav

कर्नाटकात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन नाही; व्हायरल परिपत्रक खोटे

Abhijeet Shinde

लॉकडाऊनचा निर्णयही नोटाबंदीसारखा अविचाराने

Patil_p

अरुणाचल प्रदेशात जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

पंतप्रधान मोदी करणार अमेरिकेचा दौरा

datta jadhav
error: Content is protected !!