तरुण भारत

स्पेनचा फडशा पाडत इटली अंतिम फेरीत!

पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 फरकाने बाजी, रविवारी रंगणार जेतेपदासाठी लढत

लंडन / वृत्तसंस्था

Advertisements

जॉर्गिन्होच्या निर्णायक गोलमुळे इटलीने स्पेनचा धुव्वा उडवत युरो चषक फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. एक्स्ट्रा टाईममधील 1-1 बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या उपांत्य फेरीत त्यांनी स्पॅनिश ब्रिगेडचा 4-2 अशा फरकाने फडशा पाडत हा पराक्रम गाजवला. वेम्बले स्टेडियमवरील या लढतीला दोन्ही देशांचे समर्थक हजारोंच्या संख्येने हजर होते.

स्पॅनिश संघाने निर्धारित वेळेतील लढतीत बॉल पझेशनच्या आघाडीवर तब्बल 71 टक्के वर्चस्व गाजवले. इटालियन संघासाठी खऱया अर्थाने हा कसोटी घेणारा सामना होता. मात्र, पेनल्टी शूटआऊटमध्ये अचानक सारे चित्रच बदलून गेले. शूटआऊटमध्ये मॅन्युएल लोसाटेलीचा फटका युनि सिमॉनने जरुर रोखला. पण, आंद्रेया बेलोटी, बोनुकी, बर्नार्डेस्की यांनी मात्र गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आणि जॉर्गिन्होने चौथ्या शॉटवर संघाच्या विजयश्रीवर शिक्कामोर्तब करुन दिले. स्पेनतर्फे गेरार्ड व थियागो यांनी गोल केले. मात्र, ओल्मो व मोराटाचा फटका थोपवला गेल्याचा त्यांना फटका बसला.

मोराटाचे अपयश

तीनवेळचे युरो चॅम्पियन्स स्पेनने यापूर्वी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करताना स्वित्झर्लंडचा पेनल्टी शूटआऊटवरच धुव्वा उडवला होता. पण, तो अनुभव येथे स्पेनसाठी कामी आला नसल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले. मोराटाने पेनल्टी गमावली, तेथे इटलीला विजयाची संधी निर्माण झाली आणि मोराटाने केलेली चूक आपल्याकडून होणार नाही, याची काटेकोर काळजी जॉर्गिन्होने घेतल्यानंतर इटालियन ब्रिगेडच्या आनंदाला पारावर राहण्याचे कारणच नव्हते.

मोराटाने संधी गमावणे मात्र स्पेनसाठी मोठा आघात करणारे ठरले. क्लब स्तरावर चेल्सीकडून खेळणाऱया जॉर्गिन्होने या संधीचा पुरेपूर लाभ घेत पेनल्टीवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आणि हाफ लाईनवर उभे ठाकलेल्या इटालियन संघसहकाऱयांनी धावत येत त्याच्यावर गराडाच घातला. इटालियन ब्रिगेडने प्रशिक्षक रॉबर्टो मॅन्सिनी यांनाही उचलून घेतले. इटलीचा संघ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग 33 सामन्यात अपराजित असून युरो चषकात ते चौथ्यांदा फायनलमध्ये खेळणार आहेत.

या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रियाविरुद्ध एक्स्ट्रा टाईमपर्यंत लढावे लागलेल्या इटलीने अन्य सामन्यात अगदी धडाकेबाज विजय साकारले आहेत. येथे स्पेनने बॉल पझेशन व मिडफिल्ड मुव्हमेंटच्या निकषावर वर्चस्व गाजवत त्यांना कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अनुभवी सेंटरबॅक जॉर्जिओ शेलिनी व बोनुकी यांच्या खेळात काही वेळा आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता. सेंटर ऑफ मिडफिल्डमधील मोराटाला चकवत पुढे जावे की आपल्याच खेळाडूंकडे बॅक-पास द्यावा, याबद्दल ते द्विधा स्थितीत होते.

मोराटा सबस्टिटय़ूट म्हणून मैदानावर आल्यानंतर स्पेनचा खेळ आणखी सरस झाला. मात्र, बॉल पझेशनच्या आघाडीवर आणखी वर्चस्व गाजवण्याऐवजी यातून फारसे काही साध्य झाले नव्हते. रेग्युलर टाईम व एक्स्ट्रा टाईममधील या बरोबरीनंतर अखेर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला गेला आणि त्यात इटलीने 4-2 अशी बाजी मारली.

Related Stories

नव्या मल्लांची मुसंडी, हीच कुस्तीची ताकद

Patil_p

भारताच्या नौकानयनपटूंची ऐतिहासिक कामगिरी

Amit Kulkarni

डेव्हिस चषक – रशिया उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध मुंबई इंडियन्सचे पारडे जड

Patil_p

ऑलिपिंकवीर राही साधतेय विभागीय क्रीडा संकुलात लक्ष्य

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा संघ चार्टर विमानाने पाकमध्ये दाखल

Patil_p
error: Content is protected !!