तरुण भारत

राज्यपाल बदलले, मुख्यमंत्रीही बदलणार का?

पक्षाच्या हायकमांडने कर्नाटकात नेतृत्वबदल होणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतरही शिस्तबद्ध पक्षात सुंदोपसुंदी सुरूच आहे. कर्नाटकाचे राज्यपाल वजुभाई वाला हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी थावरचंद गेहलोत यांची नियुक्ती झाली आहे.

कर्नाटकात कोरोना महामारीचा कहर कमी होत चालला आहे. तिसरी लाट ऑगस्टमध्ये येणार की नोव्हेंबरमध्ये याविषयी तज्ञांमध्ये दुमत आहे. तिसरी लाट येण्याआधी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी कर्नाटकाला केंद्राने दरमहा दीड कोटी  लस पुरविण्याची मागणी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्याची आर्थिक स्थिती हळूहळू सावरत चालली आहे. कोरोनाचा कहर ओसरू लागताच राजकीय घडामोडींनीही जोर धरला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कर्नाटकातील चार खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मात्र, सदानंदगौडा यांना राजीनामा द्यावा लागला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कर्नाटकाला झुकते माप देण्यात आले आहे. सध्या नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात कर्नाटकाच्या सहा नेत्यांना स्थान मिळाले आहे.

Advertisements

शोभा करंदलाजे (चिक्कमंगळूर) यांना वक्कलिगा कोटय़ातून, भगवंत खुबा (बिदर) यांना लिंगायत कोटय़ातून, ए. नारायण स्वामी (चित्रदुर्ग) यांना दलित कोटय़ातून मंत्रिपद मिळाले आहे. राज्यसभा सदस्य राजीव चंद्रशेखर हे सलग तीनवेळा राज्यसभेवर नियुक्त होते. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. राजीव चंद्रशेखर हे मूळचे केरळचे असले तरी कर्नाटकातून राज्यसभेवर गेले आहेत. त्यांचीही वर्णी लागली आहे. प्रल्हाद जोशी व निर्मला सीतारामन (कर्नाटक कोटय़ातून राज्यसभेवर नियुक्ती) यांच्यासह आता कर्नाटकाच्या सहा नेत्यांना मंत्रिपद मिळाले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनानंतर लिंगायत कोटय़ातून कुणाला मंत्रिपद मिळणार, असा प्रश्न होता. या कोटय़ातून भगवंत खुबा यांना मंत्रिपद मिळाले. खरेतर ते हैद्राबाद-कर्नाटकाचे. सुरेश अंगडी यांची जागा भरण्यासाठी उत्तर कर्नाटकातील एखाद्या खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळणार, अशी अटकळ होती, ती खोटी ठरली.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. राघवेंद्र यांनाही मंत्रिपद मिळणार होते. कारण मुलाला केंद्रात मंत्रिपद देऊन कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या प्रक्रियेला हात घालण्याचा पक्षाचा विचार होता. मंत्रिपद न मिळाल्यामुळे कदाचित मुख्यमंत्री व त्यांच्या चिरंजीवाला आनंदच झाला असेल. जर बी. वाय. राघवेंद्र यांना मंत्रिपद मिळाले असते तर कर्नाटकात नेतृत्वबदल होणार, या चर्चेला पुन्हा उधाण आले असते. आता मुख्यमंत्री विरोधकही बुचकळय़ात पडले आहेत. कारण येडियुराप्पा यांना राज्यपालपद व मुलाला केंद्रात मंत्रिपद असा सुवर्णमध्य काढून नेतृत्वबदलाचा तिढा कोणालाही न दुखावता पक्षाला सोडवायचा होता. आता भाजप नेतृत्वाच्या मनात कर्नाटकाबद्दल नेमके काय आहे याचे कोडे कोणालाही सोडवता येत नाही. पक्षाचे निरीक्षक अरुण सिंग यांच्या कर्नाटक दौऱयानंतर पक्षांतर्गत बंडखोरी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यात वाढच झाली आहे.

माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध टीकेची झोड उठविली आहे. ‘ऑपरेशन कमळ’च्या गळाला लागून निजदमधून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री एच. विश्वनाथ यांची भेट घेतल्यानंतर बसनगौडा यांनी पुन्हा नेतृत्वबदल होणार, असे ठणकावून सांगितले आहे. आजवर केवळ मुख्यमंत्री व त्यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर टीका करणाऱया बसनगौडा यांनी आता अरुण सिंग यांनाही सोडले नाही. अरुण सिंग यांच्या कर्नाटक दौऱयावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तीन दिवसांच्या दौऱयाला सुरुवात होण्याआधीच अरुण सिंग नवी दिल्ली येथे कर्नाटकात नेतृत्वबदल होणार नाही, असे जाहीर करतात. नेतृत्वबदल होणार नाही, तर तीन दिवस तुम्ही कर्नाटकात कशासाठी आलात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपमधील तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बसनगौडा पाटील केवळ टीका करून स्वस्थ बसले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंबंधी लवकरच पुरावे सादर करू, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळे येडियुराप्पा समर्थक व विरोधक असा संघर्ष अद्याप संपला नाही, तो सुरूच आहे हे दिसून येते.

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना बसनगौडा यांनी महाभारताचे उदाहरण दिले आहे. धर्मयुद्धात शेवटी विजय पांडवांचाच होतो. आमचा वनवास आता संपला आहे. केवळ राज्याभिषेक व्हायचा शिल्लक आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून आपण आपले राजकीय जीवन पणाला लावल्याचेही ते सांगतात. राजकीय जीवन संपले तरी चालेल पण या संघर्षातून आपण माघार घेणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. याचवेळी अर्जुन आणि अभिमन्यूचीही उदाहरणे देत आहेत. आपण अभिमन्यू होणार नाही. या धर्मयुद्धात अर्जुन होणार, असे सांगतानाच कर्नाटकात नेतृत्वबदल होणारच, यावर ते ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांविरुद्ध जाहीर टीका करणाऱया बसनगौडा यांच्या विरोधात वीरशैव लिंगायत संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

अनेक मठाधीशांनी येडियुराप्पा यांना पाठिंबा दर्शविला आहे. मठाधीशांनी आपले मठ सांभाळावेत. दक्षिणा मिळते म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मागे त्यांनी आपली ताकद उभी करू नये, अशी मठाधीशांवर बोचरी टीका करणाऱया बसनगौडा पाटील यांच्या पाठीशीही पंचमसाली मठाधीशांची ताकद आहेच, हे ते विसरत नाहीत ना? सध्या येडियुराप्पा यांचे हात वयोमानानुसार थरथरत आहेत. त्यांच्यात एखाद्या फाईलवर सही करण्याचे बळही उरले नाही. त्यामुळे कर्नाटकात पक्ष आणि सरकार वाचवायचे असेल तर नेतृत्वबदल करा, असे हायकमांडला सांगतानाच आश्चर्यकारक चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येईल, असे सूतोवाच त्यांनी केले आहे.  पक्षाच्या हायकमांडने कर्नाटकात नेतृत्वबदल होणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतरही शिस्तबद्ध पक्षात सुंदोपसुंदी सुरूच आहे. कर्नाटकाचे राज्यपाल वजुभाई वाला हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी थावरचंद गेहलोत यांची नियुक्ती झाली आहे. ते पूर्वी कर्नाटकाचे पक्षप्रभारी होते. लवकरच ते पदभार सांभाळणार आहेत.

Related Stories

कोरोनातील क्रौर्य!

Patil_p

।।अथ श्रीरामकथा।।

Patil_p

गुरु परमात्मा परशु

Patil_p

अपेक्षित निर्णय

Patil_p

चंदेरी धागा

Patil_p

सुखान्त-भाग-3

Patil_p
error: Content is protected !!