तरुण भारत

रुग्ण घरात; निकट सहवासित बाजारात

अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 9 जुलै 2021, सकाळी 9.30

● जिल्ह्यात नव्याने वाढले 1165 रुग्ण ● 11 हजार 53 जणांच्या चाचण्या ● पॉझिटिव्हीटी रेट 10.54 टक्के ● आज आपत्ती प्राधिकरणची बैठक ● जिल्ह्यातील हजाराच्या पुढची वाढ कायम

Advertisements

सातारा / प्रतिनिधी : 

जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या वाढीने दोन दिवसांपासून हजारचा आकडा ओलांडला आहे. कराड तालुक्यातील वेगाने वाढत असलेला आकडा प्रशासनाची डोकेदुखी बनला असून वाढती रूग्णवाढ कमी करण्यासाठी प्रशासनाच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. सातारा तालुक्यातील वाढही कायम आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सातारा, कराड येथे बैठक घेऊन कोरोना रूग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन टेस्टिंग वाढवण्याच्या सुचना दिल्या. मात्र जिल्हाधिकारी साहेबांचे सांगणे हे फक्त शासकीय बैठकीपुरतेच राहतेय. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही हे वास्तव जिल्ह्यातील अनेक गावात आहे.  त्यातच येत्या 15 जुलैपासून कोरोनामुक्त गावात 8 वी ते 12 वी शाळा सुरू होणार असल्याने पालकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे. जिल्ह्यात कराड सोडले तर सातारा, फलटण, वाई, कोरेगांवसह इतर तालुके सावरताना दिसत आहेत.  जिल्ह्याने नुकताच आत्तापर्यंतचा एकूण 2 लाखांच्यावर आकडा पार केला असून रूग्णवाढ पुन्हा हजारावर गेली आहे. त्यामुळे प्रशासनापुढे नेमके काय करायचे? हा प्रश्न उभा आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 1165 रूग्ण वाढले आहेत. 

कराड सोडून इतर तालुके सावरत आहेत

जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीने हजारचा आकडा पार केला असून त्यामधे सर्वात जास्त रूग्णवाढ कराड तालुक्यात होत आहे. कराड शहर, मलकापूर शहरातील रूग्णसंख्या काहीप्रमाणात आटोक्यात असली तरी ग्रामिण भागाला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. सातारा तालुक्यातही अशीच परिस्थिती असून फलटण, कोरेगांव, माण, खटाव, पाटण, वाई, महाबळेश्वर हे तालुके आता सावरले आहेत. या तालुक्यांमधील मृत्यूसंख्याही कमी होत आहे. मात्र कराड अजून सावरलेले नाही.  ग्रामिण भागातील लोक कराड शहराच्या बाजारपेठेत वावरत असल्याने शहरावरही धोक्याची टांगती तलवार कायम आहे. प्रशासनाने बैठका घेत आकडेवारी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी कराड तालुक्यात याला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. 

जिल्हाधिकारी सांगाताहेत…ऐकतंय कोण?

जिल्ह्यासह कराड तालुक्यातील कोरोना रूग्णवाढ कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंग सातत्याने सुचना देत आहेत. कराडला झालेल्या बैठकीत त्यांनी रूग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन तपासण्या वाढवण्याच्या सुचना केल्या. मात्र अपवादात्मक गावे वगळता कोठेही रूग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेतला जात नाही. कोरोना झालाय हे शेजारच्यालाही कळून दिले जात नाही अशीही काही कुटूंबे आहेत. काही कुटूंबे सामाजिक जबाबदारी ओळखून कुटूंबात रूग्ण सापडल्यावर नियमांचे काटेकोरो पालन करत विलिगीकरणात जात आहेत. मात्र अनेेक रूग्णांचे निकट सहवासित बाजारात, गर्दीत फिरत असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कितीही कळकळीने सुचना केल्या तरी त्याची अमलबजावणी स्थानिक पातळीवर होत नसल्याचे चित्र आहे. 

आज काय निर्णय होतोय?

जिल्ह्यातील निर्बंध  वाढवल्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांच्यात प्रचंड अस्वस्थता असून सातारा, कराडसह इतर शहरात व्यापारी आक्रमक झाले आहेत. फलटण, कोरेगांव, माण, खटाव, वाई, महाबळेश्वर, पाटण तालुक्यात रूग्णवाढ दोन आकड्यांवर आहे. त्यामुळे या भागांना काहीसा दिलासा मिळाला आहे.  एका बाजूला व्यापारी, व्यावसायिकांची अस्वस्थता वाढत असताना दुसरीकडे रूग्णवाढीचा वाढता आकडा प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. त्यामुळे आज शुक्रवारी जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे. 

बुधवारी जिल्हय़ात  एकूण बाधित 1165, एकूण मुक्त 693, एकूण बळी 18

बुधवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने  1134091, एकूण बाधित 201,788, घरी सोडलेले  186513, मृत्यू 4812 उपचारार्थ रुग्ण 10980

Related Stories

सातारा पालिकेच्या विषय समिती निवडीची विशेष सभा पुढील आठवड्यात

datta jadhav

अखेर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची दारे झाली खुली

Patil_p

सातारा सैनिक स्कूल विकासासाठी 300 कोटीची तरतूद

Abhijeet Shinde

लसीकरण होतंय गल्लोगल्ली

datta jadhav

कामावर हजर झालेले चालक-वाहक पुन्हा आंदोलनात

Patil_p

पत्नीच्या निधनाच्या विरहाने पतीचे हि निधन

Patil_p
error: Content is protected !!