तरुण भारत

सोनसडय़ावरील कचरा प्रक्रिया खासगी यंत्रणेकडे सोपविण्याचा निर्णय

मडगाव पालिका मंडळाच्या बैठकीत ठराव : वर्षभरासाठी कंत्राट देणार, बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्यासंदर्भात निर्णय नाही

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

सोनसडा येथील कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी वर्षभर खासगी यंत्रणेकडे दैनंदिन गोळा होणाऱया ओल्या कचऱयावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी देण्याचा निर्णय शुक्रवारी पार पडलेल्या मडगाव पालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी निविदा मागविण्यात येणार असून निविदेकरिता अर्ज करणाऱया कंत्राटदाराला या कामासाठी काय खर्च येईल त्याची बोली लावावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने काही दिवसांपूर्वी सोनसडा कचरा यार्डातील शेडमध्ये भरून पडलेल्या कचऱयावर तसेच दैनंदिन गोळा होणाऱया कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी खासगी यंत्रणा वा कंत्राटदार नियुक्त करण्यास सूचित केले होते. त्यास अनुसरून वरील ठराव घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी नंतर पत्रकारांशी बोलतांना दिली. या बैठकीसाठी कार्यक्रमपत्रिकेवर 36 विषय होते. त्यामुळे ही बैठक लांबणार याची कल्पना असल्याने ती सकाळी 10.30 वा. बोलाविण्यात आली. दुपारच्या जेवणासाठीच्या एक तास विश्रांतीनंतर पुन्हा बैठक सुरू होऊन सायंकाळी 6 वा. बैठक संपली. पालिकेच्या इतिहासात दोन सत्रांत लांबलेली ही पहिलीच बैठक असावी.

घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने पालिकेकडून 25 टनांचे बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यासंदर्भात ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात आला नाही. जुन्या मासळी मार्केटमध्ये 5 टनांचा एक बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्यात येत असून ऑगस्टमध्ये त्याचे काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित झाल्यानंतर त्य प्रकल्पची कचरा प्रक्रिया पाहून असे अन्य दोन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतर सारासार विचार करून पालिका 25 टनांचे दोन बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्यासंदर्भात निर्णय घेईल अशी माहिती तांत्रिक विभागाच्या अभियंत्याने दिली.

कंत्राटदार नेमला, तरी यंत्रे पालिकेची

सध्या सोनसडय़ावरील पेनचा एक सुटा भाग नादुरुस्त बनला असून तो अन्य राज्यातून मागविण्यात आला आहे. त्याची किंमत 5.75 लाख असून त्यासाठी या बैठकीत आर्थिक मंजुरी घेण्यात आली. पेन नादुरुस्त असल्याने कचरा शेडमध्ये पडून राहणाचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ही मंजुरी आवश्यक होती. पालिकेने दैनंदिन कचरा हाताळणी कंत्राटदार नेमून त्याच्याकडे सोपविली, तरी पेन, पोक्लिन तसेच अन्य यंत्रे पालिकेला पुरवावी लागणार असल्याचे अभियंता विशांत नाईक यांनी स्पष्ट केले. असे केल्याने एखादेवेळी कंत्राटदाराने मध्येच काढता पाय घेतला, तरी उपलब्ध यंत्रसामग्रीच्या आधारे नंतर पालिका आवश्यक काम करू शकणार असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. पालिकेकडे 14 व्या वित्त आयोगाचा सुमारे 18 कोटींचा निधी उपलब्ध असून त्यातून ही निविदा काढली जाणार व सामग्री उभी केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी मंडळाच्या नजरेस आणून दिले.

जेसीबीचे सुटे भाग विकल्याचा आरोप

मडगाव पालिकेने जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी 20 रुपयांवरून तब्बल 100 रु. शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडला असता नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी त्यास आक्षेप घेतला. राज्यातील कोणतीही पालिका 100 रु. शुल्क आकारत नसल्याचे नजरेस आणून देताना ते 50 रु. करावे असे त्यांनी सूचित केले असता तसा निर्णय घेण्यात आला. नवीन जेसीबी खरेदीच्या प्रस्तावाला यावेळी मंजुरी देण्यात आली. मात्र जुना जेसीबी साडेतीन वर्षांनी नादुरुस्त बनल्याने नगरसेवक सदानंद नाईक यांनी प्रश्न उपस्थित केले व जेसीबीचे सुटे भाग तांत्रिक विभागाच्या महाभागांनी विकून टाकल्याचा आरोप केला.

रस्त्याच्या नामकरणास पुन्हा आक्षेप

दरम्यान, फातोर्डातील एका रस्त्याला स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी गोवा फॉरवर्डने मागील मंडळात आणला असता भाजपाने आक्षेप घेतला होता. लहानशा रस्त्याला मोठय़ा नेत्याचे नाव नको असे त्यावेळचे नगरसेवक म्हणाले होते. त्यामुळे प्रस्ताव रखडला होता. यावेळी सदर रस्त्याला फातोर्डा ऍव्हेन्यू असे नाव देण्याचा प्रस्ताव आणला असता भाजपाच्या डॉ. कुडतरकर या नगरसेविकेसह काही नगरसेवकांनी पर्रीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता असे सांगून आक्षेप घेतला. नगराध्यक्ष पेरेरा यांनी सदर विषय मतदानास घातला व त्यास 14 मतांनी मंजुरी मिळविली. 

ऍप सुरू करण्याचा निर्णय

यावेळी जुन्या किरकोळ मासळी मार्केटजवळ बहुमजली पार्किंग प्रकल्प सुधारित निविदा काढून उभारण्यासाठी मंजुरी घेण्यात आली. नगरसेवक सदानंद नाईक यांनी गृहनिर्माण वसाहतीमध्ये रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करणाऱयांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना पत्र लिहिण्याची सूचना केली असता ती मान्य करण्यात आली. घरपोच जन्म आणि मृत्यूचे दाखले तसेच अन्य सुविधा ऑनलाईन मिळवून देण्यासाठी ऍप सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मात्र यासाठी पालिकेला साधनसुविधा उभारण्यासाठी खर्च करावा लागणार नाही याची काळजी घेण्याची सूचना काही नगरसेवकांनी केली. पालिका इमारतीची पूर्वीप्रमाणे रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रंगरंगोटीच्या आधी आवश्यक दुरुस्तीकामे करण्याची सूचना नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी केली.

मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

कदंब बसस्थानकाच्या शेजारील फूड कोर्ट व्यवस्थित करण्यासाठी जागा विकसित करण्याचे ठरविण्यात आले. शहरातील मोक्मयाचा ठिकाणी पोलिसांकडून आलेल्या प्रस्तावानुसार सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कॅमेऱयांवर देखरेख ठेवण्यासाठी अभियंता नियुक्त करण्याची सूचना नगरसेवक सगुण नाईक यांनी केली असता ती मान्य करण्यात आली. नगरसेवक कामिलो बार्रेटो यांनी पालिका कार्यालयातील बंद स्थितीत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याची मागणी केली असता ती मंजूर करण्यात आली.

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर सवाल

भटक्मया कुत्र्यांचे दक्षिण गोवा प्राणी संघटनेकडून योग्य प्रकारे निर्बिजीकरण केले जात नसल्याचे नगरसेवक सदानंद नाईक यांनी नजरेस आणून दिले. त्यांची पडून असलेली बिले फेडण्यासाठी आलेल्या विषयावर ते बोलत होते. त्यांची बिले कोण प्रमाणित करतात, असा सवाल घनश्याम शिरोडकर यांनी केला. महेश आमोणकर यांनी खारेबांद भागात कुत्र्यांची संख्या वाढत चालल्याचा दावा केला. कोविड महामारी सुरू झाल्यापासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण झालेच नसल्याचा दावा बबिता नाईक यांनी केला. सरकारनियुक्त नवीन यंत्रणेचा प्रस्ताव आला आहे. त्यांना पैसे देण्याची आवश्यकता नाही, तर दक्षिण गोवा प्राणी संघटनेला 70 हजार रु. प्रति महिना द्यावे लागतात. त्यामुळे सरकारच्या प्रस्तावावर विचार करा, असे घनश्याम शिरोडकर यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना पैसे फेडून कोणत्याही संघटनेला नियुक्त करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. मडगाव मार्केटमधील विपेत्यांच्या व्यवसायावर कोविडच्या पार्श्वभूमीवर परिणाम झाल्याने त्यांना परवाना शुल्कात सूट देण्याची मागणी नगरसेवक सगुण नाईक यांनी केली. घनश्याम शिरोडकर यांनी या मागणीचे समर्थन करताना 50 टक्के सूट देण्याची सूचना केली.

Related Stories

मला निवडणूक आयोगाची नोटीस अयोग्य : म्हांबरे

Sumit Tambekar

अन् विश्रांतीच्या हातून घडले अपहरणाचे कृत्य

Amit Kulkarni

लुईझिन फालेरो राज्यसभेवर जाण्याची शक्यता

Amit Kulkarni

कला अकादमीत आज ’जागतिक रंगभूमी दिन’

Amit Kulkarni

ज्यादा व्याजाच्या नावाखाली तब्बल 29 लाखांचा गंडा

Amit Kulkarni

ताळगावात शेतकऱयांना मोफत भातकापणी यंत्र

Amit Kulkarni
error: Content is protected !!