तरुण भारत

निवडणुकीसाठी भाजप तयार

प्रतिनिधी/ पणजी

विधानसभा निवडणूक सहा महिन्यांनंतर होणार हे नक्की असले तरी ती उद्यासुद्धा घेण्यात आली तरीही आम्ही तयार आहोत, असे माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. या निवडणुकीत भाजप स्वबळावरच लढणार असून सर्वाधिक जागा मिळवून पुन्हा सत्तास्थानीही राहणार आहोत, असा दावाही त्यांनी केला.

Advertisements

पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून त्याची विशिष्ट कार्यपद्धती आहे. एखाद्याने पत्रकारांसमोर वक्तव्ये करून स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केली म्हणून भाजपात उमेदवारी मिळत नाही. उमेदवारीचा निर्णय सर्वस्वी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर अवलंबून असतो. स्थानिक नेतृत्व केवळ एखाद्याची शिफारस करत असते. अशा या प्रक्रियेची संपूर्ण माहिती असतानाही खुद्द मंत्रीगणसुद्धा स्वघोषणा करून दोन-दोन मतदारसंघांवर दावे करतात याचेच आश्चर्य वाटते, असे तानावडे म्हणाले.

भाजपात एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना उमेदवारी देण्याची पद्धत नाही. आम्ही उमेदवारीची खैरात करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीस अद्याप सहा महिने बाकी आहेत. उमेदवार निवडीसंबंधी पक्षाचे काम सुरू आहे. मात्र उमेदवारी कुणाला देण्यात येईल ते निश्चित झालेले नाही. तो निर्णय राष्ट्रीय स्तरावरच घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

उमेदवारीच्या स्वघोषणा करणे चुकीचे

दरम्यान, स्वतःचीच उमेदवारी निश्चित झालेली नसताना स्वतःसह पत्नी वा कुटुंबातील अन्य सदस्यांनाही उमेदवारी मिळेल अशी वक्तव्ये करणे अत्यंत चुकीचे आहे. वारंवार विनंती करूनही अनेक आजी माजी आमदार तथा खुद्द मंत्रीसुद्धा अशाप्रकारे उमेदवारीवर दावा करून स्वघोषणा करतात याला काय म्हणावे, अशी खंत तानावडे यांनी व्यक्त केली.

जे. पी. नड्डा उद्या गोव्यात

संघटनमंत्री बी. एल. संतोषही येणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष हे 12 आणि 13 जुलै रोजी दोन दिवसांच्या दौऱयावर गोव्यात येणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी माजी खासदार नरेंद्र सावईकर यांचीही उपस्थिती होती. गेले काही दिवस नड्डा हे गोव्यात येणार असल्याच्या विविध बातम्या प्रसिद्ध होत होत्या. मात्र दौऱयाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. ती तारीख आता निश्चित झाली असून 12 रोजी ते गोव्यात दाखल होत आहेत, असे तानावडे यांनी स्पष्ट केले.

या दौऱयाच्या काळात दोन्ही नेते विविध बैठकांमध्ये सहभाग घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यांच्यासोबतही त्यांची बैठक होणार आहे. त्याशिवाय पार्टीची कोअर टीम, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, विविध मोर्चांचे अध्यक्ष, यांच्याशीही स्वतंत्र बैठका होणार आहेत. शेवटी त्या सर्व बैठकांचा आढावा ते पत्रकारांसमोर मांडणार आहेत, अशी माहिती तानावडे यांनी दिली.

आर्लेकर यांचे भाजपकडून अभिनंदन

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून राजेंद्र आर्लेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सदानंद तानावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

भाजपात प्रत्येकाचे केलेले काम, पक्षाप्रति निष्ठा, यांची नेहमीच कदर होते. प्रामाणिकपणे केलेल्या कामाची नोंद घेतली जाते. याची उदाहरणे म्हणजे मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक यांच्यासारखे नेते गोव्यातून केंद्रात उच्चपदी पोहोचले. आता पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला असून राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे तानावडे यांनी सांगितले. आता नव्या पदाची जबाबदारी पेलतानाही ते स्वतःच्या वेगळेपणाचा ठसा उमटवतील, असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला.

Related Stories

उसगांवात पहिल्या दिवशी पूर्ण लॉकडाऊन

Omkar B

बेंदुर्डे येथील घरावर दरड कोसळली

Omkar B

”महिला सबलीकरण हेच ‘आरजी’चे प्रमुख ध्‍येय”

Sumit Tambekar

काजू खरेदी करण्यास डिचोली बागायतदारने दिला नकार

Omkar B

प्राणवायू, कोरोना औषधे, लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहीर करा

Amit Kulkarni

व्यापार परवाना शुल्कावर बैठकीत अंतिम निर्णय झालेला नाही

Patil_p
error: Content is protected !!