तरुण भारत

ऋणाची परतफेड जिल्हय़ाच्या विकासातून

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ग्वाही : वेंगुर्ले न. प. च्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेचे लोकार्पण : सर्वपक्षीय नेते मंडळींची उपस्थिती

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रीपद देऊन माझ्यावर जो विश्वास दर्शविला तो सार्थ ठरवेन. सर्वच पक्षाच्या नेतेमंडळांनी मला शुभेच्छा देऊन जे ऋण व्यक्त केले, त्या ऋणाची परतफेड जिल्हय़ाच्या विकासातून करेन, अशी ग्वाही केंदीय लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले न. प. च्या ‘सागररत्न मत्स्य बाजारपेठ’ लोकार्पणप्रसंगी दिली.

वेंगुर्ले न. प. च्या सुमारे तीन कोटी रुपये निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या अद्ययावत सागररत्न या मत्स्य बाजारपेठेचा लोकार्पण सोहळा रविवारी नारायण राणे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.

यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, गटनेते सुहास गवंडळकर, विरोधी गटनेते प्रकाश डिचोलकर, नगरसेवक प्रशांत आपटे, साक्षी पेडणेकर, शीतल आंगचेकर, शैलेश गावडे, कृतिका कुबल, विधाता सावंत, कृपा गिरप, नागेश गावडे, स्नेहल खोबरेकर, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, पूनम जाधव, आत्माराम सोकटे, जि. प. सदस्य दादा कुबल व मनीष दळवी उपस्थित होते.

           मोदींचा विश्वास सार्थ ठरवेन -राणे

राणे पुढे म्हणाले की, विकासाची दृष्टी असेल, तरच विकास होतो. सिंधुदुर्ग जिल्हय़ात पर्यटनातून आर्थिक समृद्धी यावी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाला. त्यात आता या सागररत्न बाजारपेठेची भर पडली आहे. माशांचाही वास येऊ नये, असे मासळी मार्केट कसे असावे, याचा आदर्श नमुना म्हणजे वेंगुर्ल्याचे हे मासळी मार्केट आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना कोणतीही योजना राबविताना पक्ष, जात, धर्म पाहिला नाही. तसेच कामा मुख्यमंत्र्यांनी करावे. आज जसे मासळी मार्केटच्या लोकार्पणप्रसंगी सर्व पक्षाची नेतेमंडळी एकत्र आली, तसेच एकमताने, एकदिलाने काम केल्यास सिंधुदुर्गचा विकास दूर नाही. केंद्रीय मंत्रिपदाचा वापर मी या जिल्हय़ाच्या विकासासाठी निश्चितच करेन.

          मत्स्य बाजारपेठ मैलाचा दगड ठरेल -फडणवीस

नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. देशातील 80 टक्के उद्योग हे राणेंकडील खात्याकडे आहेत. त्यामुळे त्याचा लाभ या जिल्हय़ाला होईल. एखाद्या प्रगतशील देशातील मार्केट वाटावे, असे हे मार्केट झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ले शहराच्या सौंदर्यात अधिकच भर पडेल. ही बाजारपेठ मैलाचा दगड ठरेल. कोकणातील विकासाला गती देण्याचे काम राणेंकडून होईल. विविध योजनांसाठी मीदेखील माझ्यापरीने मदत करेन, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

         राणेंच्या हातून चांगली सेवा घडो -दीपक केसरकर

नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीस यांची बऱयाच दिवसानंतर ऑनलाईन भेट झाल्याबद्दल केसरकर यांनी दोघांनाही शुभेच्छा व्यक्त केल्या. 2013 मध्ये वेंगुर्ले व सावंतवाडी मासळी मार्केट मंजूर झाले. 2015 मध्ये सावंतवाडीचे मार्केट झाले. मात्र, येथील मासळी मार्केटला विरोध झाल्याने व हा विषय कोर्टात गेल्याने या मार्केटचे काम रेंगाळले. या मार्केटच्या उभारणीत अनेकांचा सहभाग आहे. न. प. च्या सर्व प्रकल्पांना आपण भरघोस निधी दिला आहे. येथे आता ‘सिंधुस्वाध्याय’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प होऊ घातला आहे. त्यासाठी वेंगुर्ले न. प. ने सहकार्य केल्याबद्दल केसरकर यांनी न. प. ला धन्यवाद दिले.

          विकासासाठी एकत्र येऊ- विनायक राऊत

वेंगुर्ल्याच्याच नव्हे, तर जिल्हय़ाच्या विकासासाठी आपण एकत्र येऊ. वेंगुर्ल्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. वेंगुर्ले शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामुळे वेंगुर्ले मार्केटची श्रीमंती कायम राहावी, यासाठी आम्ही सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही खासदार राऊत यांनी दिली.

              आदर्श मासळी मार्केट -नीतेश राणे

या मासळी मार्केटमध्ये आल्यावर असे वाटले की मोठय़ा मॉलमध्ये आलो. सुसज्ज मासळी मार्केट कसे असावे, याचा हा आदर्श नमुना असल्याचे आमदार नीतेश राणे म्हणाले. तर सर्वपक्षीय लोक एखाद्या विकासकामासाठी एकत्र आल्यास काय होऊ शकते, याचे हे मार्केट उदाहरण असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले. कोकणातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी नारायण राणे निश्चितच प्रयत्न करतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेंगुर्ले न. प. साठी भरघोस निधी दिल्याने येथे मच्छीमार्केट, निशाण तलाव उंची वाढविणे, पाण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकणे, गार्डन अशाप्रकारचे प्रकल्प होऊ शकल्याचे माजी आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

मार्केटसाठी सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य-नगराध्यक्ष गिरप

माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्यामुळे आपण राजकारणात आलो. नगराध्यक्ष झालो, असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी प्रास्ताविकात सांगून सागररत्न मासळी मार्केटच्या उभारणीत आलेले अडथळे, कोणी-कोणी कसे सहकार्य केले, याचा आढावा घेतला. पुष्पसेन सावंत, माजी मुख्याधिकारी, स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून व रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून ही इमारत उभी राहिल्याचे सांगितले. दीपक केसरकर यांनीही चांदा ते बांदा या योजनेतून या मच्छीमार्केटच्या कोल्ड स्टोअरेजसाठी निधी दिल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, काँग्रेसचे नगरसेवक विधाता सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.

न. प. तर्फे मान्यवरांचा सत्कार

यावेळी खासदार विनायक राऊत, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, नीतेश राणे, राजन तेली, विलास गावडे, वैभव साबळे यांचा तसेच सागररत्न मासळी मार्केटचे काम अत्यंत कल्पकतेने करणारे आर्किटेक्ट अमित कामत, वेंगुर्ले न. प. चे कायदेशीर सल्लागार ऍड. श्याम गोडकर, ठेकेदार एस. एल. ठाकुर, मासळी मार्केटमध्ये ‘मालवणी डेज’ची आकर्षक म्युरल आर्ट साकारणारे प्रा. सुनील नांदोस्कर, इलेक्ट्रिक कॉन्ट्रक्टर वितिन पांगम, असामान्य बुद्धिमत्ता लाभलेला तुळस येथील नऊवर्षीय विद्यार्थी विजय दिनेश तुळसकर, न. प. चे अभियंता अभिषेक नेमाणे यांचा न. प. तर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                                         खासदारांनी दिल्या राणेंना शुभेच्छा

मागील काही दिवस युतीची चर्चा होती. आज येथील व्यासपीठावरील नेतेमंडळींची उपस्थिती पाहून युतीची स्वप्ने बाळगणारे कार्यकर्ते सुखावले असतील, असे नीतेश राणे म्हणाले. आजच्या या कार्यक्रमात सर्व पक्षीय नेतेमंडळी एकत्र होती. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात कोणीही कोणावरही टीका केली नाही. याउलट दीपक केसरकर, विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या तर खासदार विनायक राऊत यांनी आमदार नीतेश राणे यांचा उल्लेख मित्र म्हणून केला व सुरेश प्रभू यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या मासळी मार्केटचे उद्घाटन नामफलकाचे अनावरण करून नारायण राणे व फडणवीस यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार राऊत, आमदार केसरकर, रवींद्र चव्हाण व आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. स्वागत नगराध्यक्ष गिरप, सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले. तर आभार मुख्याधिकारी डॉ. सोंडगे यांनी मानले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, अभी वेंगुर्लेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ तसेच व सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मच्छीमार उपस्थित होते.

Related Stories

गादी विक्री दुकानात भीषण आग

Patil_p

‘रत्नागिरी 8’ भात बियाण्यांची सहा राज्यांसाठी शिफारस

NIKHIL_N

कोकण किनारपट्टीवर शतकातील सर्वात मोठे चक्रीवादळ धडकणार

Patil_p

चाकरमान्यांच्या अवस्थेला सरकारच जबाबदार

Patil_p

नदीत पोहायला गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू

Patil_p

भक्ती कॅश्यु फॅक्टरीचे मालक विजय चव्हाण यांचे निधन

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!