तरुण भारत

जि.प.अध्यक्षपदासाठी राहूल पाटील आघाडीवर

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ताकद पणाला लावली असताना रविवारी दिवसभरात झालेल्या अनेक राजकीय घडामोडीनंतर पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहूल पाटील यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे विजय बोरगे व ज्येष्ठ सदस्य जयवंतराव शिंपी यांच्यामध्ये चुरस आहे. रविवारी सायंकाळी पन्हाळा येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सर्व सदस्यांच्या मुलाखती घेतल्या. पण त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांची नावे जाहीर केली नसून सोमवारी सकाळी 10 वाजता नावांची घोषणा केली जाणार आहे.

Advertisements

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जि.प. अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल असा दावा केला होता. त्याबाबत त्यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील यांच्याकडे अध्यक्ष पदाची धुरा जाईल असे प्रथमदर्शनी चित्र होते. पण राहूल पाटील यांनाच अध्यक्ष पद द्यावे यासाठी आमदार पी.एन.पाटील यांनीही सुरुवातीपासूनच आग्रही भूमिका घेतली आहे. शनिवारी रात्री पालकमंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पी.एन.पाटील यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत पी.एन.पाटील यांनी राहूल पाटील यांनाच अध्यक्ष करावे अशी आग्रही भूमिका मांडल्याचे समजते. तसेच काँग्रेसच्या वरीष्ठ गोटातून राहूल पाटील  यांना अध्यक्ष करण्याबाबत पालकमंत्री पाटील यांना सांगितले असल्याची काँग्रेस सदस्यांमध्ये दिवसभर चर्चा होती. याशिवाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या राजकारणात पालकमंत्री पाटील, ग्रामविकासमंत्री मुश्रीफ व पी.एन.पाटील यांनी एकत्र येण्याच्या मुद्यावरून मंत्री मुश्रीफ यांनी एक पाऊल मागे घेऊन राहूल पाटील यांना अध्यक्ष पद देण्यास दुजोरा दिला असल्याचे सुत्रांकडून समजते. या सर्व घडमोडींमुळे अध्यक्ष पदासाठी राहूल पाटील यांचे नाव पुन्हा आघाडीवर आले आहे.

पन्हाळा येथे पार पडल्या मुलाखती

 महाविकास आघाडीचे सर्व सदस्य शनिवारी सकाळी पन्हाळा येथे सहलीवर गेले आहेत. त्यामुळे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता आघडीचे सर्व नेते सदस्यांनी मुक्काम केलेल्या खासगी हॉटेलमध्ये पोहोचले. त्या ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील, पी.एन.पाटील यांनी काँग्रेसच्या सदस्यांची मुलाखत घेतली. यावेळी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी अध्यक्ष पदासाठी राहूल पाटील यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिला असल्याचे काही सदस्यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील,  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांची मते आजमावली. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, डॉ.सुजित मिणचेकर, उल्हास पाटील , जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी शिवसेनेच्या सदस्यांची मुलाखत घेतली.  सद्यस्थिती अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्ष दावेदार नसल्यामुळे यावेळी विषय समिती सभापती पदासाठी त्यांची मते जाणून घेतली. स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, सावकार मादनाईक यांनी स्वाभिमानीच्या सदस्यांसोबत चर्चा केली.

नेत्यांची संयुक्त बैठक अन् खलबते

आघाडीतील सर्व सदस्यांच्या पक्ष निहाय झालेल्या मुलाखातीनंतर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, राजेश पाटील, ए.वाय.पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, सेनेचे सर्व माजी आमदार आदी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाबाबत दिर्घकाळ खलबते झाली. पण नावाची घोषणा केली नाही.

ताराराणी विकास आघडीचा राहूल पाटील यांना पाठींबा

 राहूल पाटील यांना अध्यक्ष पदाची संधी दिली तर भाजप आघाडीमध्ये सहभागी असलेल्या ताराराणी आघाडीचे दोन जि.प. सदस्यांचा राहूल पाटील यांना पाठींबा असेल अशी जाहीर घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी केली आहे.

….. तर बिनविरोध निवड

भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांची हॉटेल पंचशील येंथे बैठक पार पडली. माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी भाजप आघाडीचा उमेदवार द्यायचा की नाही, याबाबत सोमवारी सकाळी निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान राहूल पाटील यांना अध्यक्ष पदाची संधी दिल्यास भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध केली जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

घरफाळा आकारणीमध्ये कोटींचा घोटाळा करणाऱ्या दोषींवर गुन्हें दाखल करा

Abhijeet Shinde

शिरोली ग्रामपंचायतीची ‘क’ वर्ग नगरपालिका मागणीसाठी ठराव मंजूर

Sumit Tambekar

रविकांत तुपकरांची ऑन दी स्पॉट मोहीम

Abhijeet Shinde

ध्येयवेड्या प्रसन्नजितची उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : भरदिवसा पाणीपुरवठा सभापतीवर जीवघेणा हल्ला

Abhijeet Shinde

कोल्हापूरात ओमिक्रॉनचे आणखीन तीन रूग्ण

Sumit Tambekar
error: Content is protected !!