तरुण भारत

रविशंकर प्रसाद तामिळनाडूच्या राज्यपालपदी?

अलिकडेच काढून घेण्यात आले केंद्रीय मंत्रिपद

नवी दिल्ली

Advertisements

मोदी मंत्रिमंडळातून हटविण्यात आलेल्या रविशंकर प्रसाद यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. रविशंकर यांना तामिळनाडूचा राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय झाला असून याची औपचारिक घोषणाच शिल्लक असल्याचे बोलले जात आहे.

पण आतापर्यंत पक्षसंघटन किंवा सरकारकडून यासंबंधी काहीच सांगण्यात आलेले नाही. तर प्रसाद यांच्याकडूनही यासंबंधी पुष्टी मिळू शकलेली नाही. तामिळनाडूत सध्या बनवारीलाल पुरोहित राज्यपाल आहेत.

मोदी मंत्रिमंडळातून हटविण्यात आलेले मोठे चेहरे रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेक यांना पक्षात मोठे पद दिले जाणार असल्याचीही चर्चा आहे. अशास्थितीत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची पक्षाच्या महासचिवांसोबत बैठक पार पडली होती. या बैठकीनंतरच प्रसाद यांना तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाणार असल्याची चर्चा आहे.

पुढील वर्षी उत्तरप्रदेशसह 5 राज्यांमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रसाद आणि जावडेकर यांना पक्षात राष्ट्रीय महासचिव किंवा उपाध्यक्ष म्हणून नेमले जाऊ शकते.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलात पक्षाचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांना सामील करण्यात आले आहे. अशा स्थितीत त्यांच्या जगी एखाद्या मजबूत आणि अनुभवी नेत्याला स्थान दिले जाऊ शकते. प्रसाद आणि जावडेकर यांनी यापूर्वीही पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सांभाळलेली आहे. थावरचंद गेहलोत यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर त्वरित कर्नाटकचे राज्यपाल करण्यात आले होते. प्रसाद आणि जावडेकर यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येते.

66 वर्षीय रविशंकर प्रसाद हे पाटणा साहिब येथील खासदार आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी कोळसा, कायदा, न्याय आणि माहिती-प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळलेली आहे. याचबरोबर मोदी सरकारमध्ये कायदा आणि न्यायमंत्री तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान, दूरसंचारमंत्री म्हणून काम पाहिले होते.

तर 70 वर्षीय प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेले आहेत. मोदी मंत्रिमंडळात संसदीय कामकाज मंत्री, मनुष्यबळ विकास मंत्री, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री तसेच माहिती-प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी काम केले होते.

Related Stories

आज पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका

Abhijeet Shinde

अकरावी फेरीही तोडग्याविना

Patil_p

लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही सुरूच राहणार, मोदींचे स्पष्ट संकेत

prashant_c

देशात सलग सहाव्या दिवशी इंधन दरवाढीचा भडका

Abhijeet Shinde

पंतप्रधान-राष्ट्रपतींसाठी ‘एअर इंडिया वन’ दाखल

Patil_p

ओबीसी आरक्षण : छगन भुजबळांच्या भेटीबाबत फडणवीसांनी केला खुलासा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!