तरुण भारत

इटालियन ब्रिगेड ठरले युरो चॅम्पियन्स!

पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत इंग्लंडवर 3-2 फरकाने मात

लंडन / वृत्तसंस्था

Advertisements

पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडचा 3-2 असा धुव्वा उडवत युरो चषक स्पर्धेचे अगदी थाटात विजेतेपद संपादन केले. इटालियन गोलरक्षक जियानलुईगीने बुकायो साकाचा स्पॉट किक आपल्या डावीकडे झेपावत यशस्वीरित्या रोखला आणि इथेच इटलीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. रेग्युलर टाईम व एक्स्ट्रा टाईममध्ये 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर या लढतीत पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला गेला होता.

वेम्बले स्टेडियमवर घरच्या चाहत्यांसमोर खेळताना इंग्लंडला नामी संधी होती. मात्र, इटालियन ब्रिगेडने त्यांचे विजयाचे मनसुबे पुरते धुळीस मिळवले. या पराभवाने इंग्लंडचा 1966 पासून चालत आलेला जेतेपदाचा दुष्काळ देखील कायम राहिला.

या रोमांचक फायनलमधील दुसऱयाच मिनिटाला ल्यूक शॉने इंग्लंडचे खाते उघडून देत एकच खळबळ उडवून दिली. मात्र, दुसऱया सत्रात 67 व्या मिनिटाला लिओनार्डो बोनुक्कीने इटलीला बरोबरी मिळवून देणारा गोल केला. त्यानंतर एक्स्ट्रा टाईमपर्यंत 1-1 ही गोलकोंडी कायम राहिली आणि पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला गेला.

इटलीसाठी वर्ल्डकपमधील अपयशाची भरपाई

4 वर्षांपूर्वी संपन्न झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी इटलीचा संघ चक्क पात्रता देखील मिळवू शकला नव्हता. इटलीने विश्वचषक न खेळण्याची ही 6 दशकातील पहिलीच वेळ होती. मात्र, हीच इटलीची टीम आता युरो जेतेपदासह युरोपमधील सर्वोत्तम ठरली आहे. इंग्लंडचा संघ 55 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेत फायनलमध्ये खेळत होता. मात्र, प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये अपयश पत्करावे लागण्याची परंपरा त्यांच्यासाठी येथेही कायम राहिली. इंग्लंडला यापूर्वी, 1990, 1996, 1998, 2004, 2006 व 2012 मध्ये पेनल्टीत पराभव पचवावे लागले आहेत.

दुसऱया मिनिटालाच आघाडी, तरीही…

युरोपियन स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वात वेगवान गोल नोंदवण्याचा विक्रम ल्यूक शॉने करत इंग्लंडला दुसऱयाच मिनिटाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, अति बचावात्मक धोरणामुळे अंतिमतः ही आघाडी त्यांच्यासाठी फलद्रूप ठरु शकली नाही. इटलीने यापूर्वी 4 विश्वचषक जिंकले आहेत. येथे निर्धारित वेळेत त्यांच्या बचावातील त्रुटी सातत्याने दिसून आल्या. मात्र, इंग्लंडचा संघ याचा योग्य तो लाभ घेऊ शकला नाही. इटलीने बॉल पझेशनच्या आघाडीवर 66 टक्के वर्चस्व गाजवले.  

जेव्हा स्पेशालिस्ट पेनल्टी टेकर्सच अपयशी ठरले…

रेग्युलर टाईम व एक्स्ट्रा टाईममध्ये 1-1 अशी गोलकोंडी कायम राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला गेला. इंग्लंडने यासाठी सँचो व रॅशफोर्ड या स्पेशालिस्ट पेनल्टी टेकर्सना पाचारण केले. साऊथगेट यांनी या उभयतांना एक्स्ट्रा टाईमच्या उत्तरार्धापर्यंत मैदानात आणले नव्हते. ते पेनल्टी स्पेशालिस्ट असल्याने व तुलनेने रिप्रेश असल्याने याचा संघाला लाभ होईल, असा साऊथगेट यांचा होरा होता. मात्र, प्रत्यक्षात या उभयतांसह साकानेही पेनल्टी स्पॉट वाया घालवली आणि इंग्लंडच्या पदरी अपयश आले.

विजेत्या इटली संघाचे रोममध्ये जंगी स्वागत

युरो चषक स्पर्धा जिंकून मायदेशी परतणाऱया विजेत्या इटालियन फुटबॉलपटूंचे रोममध्ये सोमवारी जंगी स्वागत केले गेले. इटलीने 1968 नंतर प्रथमच ही स्पर्धा जिंकली. फायनलमध्ये विजयश्रीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर हा संघ रोममध्ये दाखल झाला, त्यावेळी चाहत्यांनी संघाच्या बसभोवती गराडा घालत विजयाच्या घोषणा दिल्या. इटलीसाठी 2006 नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे पहिलेच दिमाखदार यश ठरले. 2006 मध्ये त्यांनी फिफा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. 2012 मध्ये हा संघ युरो फायनलमध्ये पोहोचला. पण, त्यावेळी स्पेनने त्यांच्यावर मात केली होती.

इटालियन गोलरक्षक जियानलुईगी सर्वोत्तम खेळाडू

इटलीला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा गोलरक्षक जियानलुईगी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला. या 22 वर्षीय गोलरक्षकाने पेनल्टी शूटआऊटमध्ये 2 महत्त्वपूर्ण सेव्हज करत संघाला विजयश्री मिळवून दिली. जियानलुईगीने या स्पर्धेत सर्वाधिक 719 मिनिटे मैदानावर राहिला.  साखळी फेरीत तर त्याने एकही गोल स्वीकारला नव्हता. स्पेनविरुद्ध सेमी फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊट विजयाचा तोच शिल्पकार ठरला होता.

रोनाल्डोला गोल्डन बूट पुरस्कार, पेड्री सर्वोत्तम युवा खेळाडू

पोर्तुगालचा सुपरस्टार खेळाडू रोनाल्डो या स्पर्धेत केवळ चारच सामने खेळला असला तरी गोल्डन बूट पुरस्कार मिळवत त्याने स्पर्धेवर आपली छाप उमटवली. रोनाल्डोने या स्पर्धेत 5 गोल केले. रोनाल्डोप्रमाणेच झेक प्रजासत्ताकच्या पॅट्रिक स्किकने देखील 5 गोल केले. मात्र, असिस्टच्या टायब्रेकरवर रोनाल्डो सरस ठरला.  स्पेनच्या पेड्रीला स्पर्धेतील सर्वोत्तम युवा फुटबॉलपटू पुरस्काराने सन्मानित केले गेले.

Related Stories

जोकोविचने जिंकली कायदेशीर लढाई

Amit Kulkarni

मँचेस्टर सिटीचा गुंडोगन महिन्यातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p

चार सुवर्णपदकासह भारत पदक तक्त्यामध्ये आघाडीवर

Patil_p

जडेजाच्या घोंघावलेल्या वादळात आरसीबी नेस्तनाबूत!

Patil_p

मुरली यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी

Patil_p

भारताला नेमबाजी स्पर्धेत कास्यपदक

Amit Kulkarni
error: Content is protected !!