तरुण भारत

रिकामा डय़ुरा सिलेंडर जोडला अन् 50 रुग्ण झाले अस्वस्थ

कामथे रुग्णालयातील गंभीर प्रकार

प्रतिनिधी/ चिपळूण

Advertisements

कामथे रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱया वितरकाने भरलेला समजून रिकामा डय़ुरा सिलेंडर पाठवला. तो तसाच जोडल्यानंतर रूग्णालयात ऑक्सिजनवर असलेले 50 रूग्ण अस्वस्थ झाल्यानंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली. मात्र वेळीच प्रकार लक्षात आल्यानंतर दुसरा सिलेंडर जोडण्यात आला. या गंभीर प्रकाराबाबत   रूग्णालयाने लोटेतील क्रायो गॅस एजन्सीजला नोटीस पाठवली आहे.

 कामथे उपजिल्हा रूग्णालय कोविड रूग्णालय झाल्यानंतर येथे गेल्या दीड वर्षापासून रूग्णांवर उपचार केले जात आहेत. ऑक्सिजन बेडची संख्या येथे अधिक असल्याने चिपळूण, गुहागरचे असंख्य रूग्ण येथे उपचारासाठी येत असतात. त्यामुळे हे रूग्णालय नेहमीच भरलेले असते. सोमवारीही येथे 50 रूग्ण हे ऑक्सिजन बेडवर होते. मात्र तेथे काही सामाजिक कार्यकर्त्यांमुळे हा गंभीर प्रकार समोर आला आणि रूग्णांचे जीव वाचले.

  लोटे येथील क्रायो गॅस एजन्सीज कामथे रूग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करते. या रूग्णालयाला मिळालेले 4 डय़ुरा सिलेंडर या एजन्सीजकडून भरून आणले जात. या सिलेंडरला इंडीकेटर असल्याने ते भरलेले अथवा रिकामे असल्यास लगेच कळते. मात्र ही एजन्सीज या सिलेंडरऐवजी दुसरेही सिलेंडर पाठवते. सोमवारी जे सिलेंडर पाठवले, त्यावर इंडीकेटर नव्हते. त्यामुळे ते भरलेले की रिकामे आहेत, ते तेथील कर्मचाऱयांना कळू शकले नाही. त्यामुळे सिलेंडर बदलताना नेमका रिकामा सिलेंडर कर्मचाऱयांकडून जोडला गेला. रिकामा सिलेंडर जोडल्यानंतर ऑक्सिजन बेडवर असलेले रूग्ण अस्वस्थ झाले. रूग्ण अचानकपणे अस्वस्थ का झाले, म्हणून डॉक्टरांसह कर्मचारी बुचकळय़ात पडले. त्यामुळे धावाधाव झाली. तत्काळ सिलेंडर तपासणी करण्यात आली. यावेळी सिलेंडर रिकामा जोडला गेल्याचे लक्षात आले. तत्काळ दुसरा सिलेंडर जोडण्यात आला. सुदैवाने हॉस्पिटलमध्ये 10 जम्बो सिलेंडरचा स्टॉक असल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा वितरकाने पाठवलेल्या या रिकाम्या सिलेंडरमुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला असता.

  या गंभीर प्रकाराबाबत मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक राम रेडीज, शहानवाज शाह, सिद्धेश लाड व संदेश मोहिते यांनी रूग्णालयात जाऊन या बाबतची माहिती घेतली. यावेळी लोटेतील क्रायो गॅस एजन्सीने रिकामा सिलेंडर पाठवल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे डॉ. अजय सानप यांच्याकडून सांगण्यात आले. याची गंभीर दखल आम्ही घेतली आहे. संबंधित गॅस एजन्सीजला या बाबतचा पत्रव्यवहारही केला आहे. यापुढे रूग्णालयाच्या मालकीचे सिलेंडरच पाठवायचे. शिवाय ते पाठवताना रिकामे की भरलेले याची तपासणी करणे, हे एजन्सीजचे काम आहे. त्यामधील हलगर्जीपणामुळे मोठा अनर्थ घडू शकतो. आमच्याइतकीच एजन्सीजचीही जबाबदारी आहे. तसेच लोटे ते कामथे अशी सिलेंडर वाहतूक करताना दरड व पुराच्या पाण्याचा धोका संभवतो. यामुळे अत्यावश्यक म्हणून जवळच्या गॅस एजन्सीमधून सिलेंडर भरून मिळण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

सोनेरी केसांची, आढळली अति दुर्मिळ प्रजात माशांची

NIKHIL_N

शेकरुच्या पिल्लाला प्राणीमित्रांकडून जीवदान

NIKHIL_N

कोरोना योध्दय़ा अंशकालीन स्त्री परिचर मानधनापासून वंचित

Patil_p

भाटीमिऱया येथे किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

Patil_p

ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी रत्नागिरीत भव्य ‘जन आक्रोश’ मोर्चा

Abhijeet Shinde

वैभववाडीच्या ग्रामीण भागात ‘वादळी पाऊस’

NIKHIL_N
error: Content is protected !!