तरुण भारत

वंटमुरी घाटात तिहेरी अपघातात दोघे ठार

अपघातात ट्रकचा चेंदामेंदा : कांदा-पीठ रस्त्यावरच विखुरले : आणखी एक ट्रकचालक सुदैवाने बचावला

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

पिठाची पोती वाहतूक करणाऱया ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या तिहेरी अपघातात दोघा ट्रक चालकांचा मृत्यू झाल्याची घटना वंटमुरी घाटामध्ये सोमवारी रात्री 12 च्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकने दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने संकेश्वरहून बेळगावकडे येणाऱया ट्रकला धडक दिली. त्यानंतर थांबलेल्या ट्रकला त्या ट्रकची धडक बसली. या विचित्र अपघातात ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. या अपघातात पिठाची पोती आणि कांदा रस्त्यावर विखुरला होता.

बेळगावकडून संकेश्वरकडे निघालेल्या ट्रक (क्र. एमएच 46 एएफ 3980) चा चालक निरज बलवार उर्फ रामलखन (रा. काडीया, अमिलोदा-उत्तरप्रदेश) याचे नियंत्रण सुटले. तो गुड्स ट्रक दुभाजकाला धडकून दुसऱया बाजूला गेला.

संकेश्वरकडून बेळगावकडे कांदा वाहतूक करणाऱया ट्रकला (क्र. एमएच 12 एमव्ही 4408) धडक दिली. त्यानंतर त्याच बाजूला थांबलेल्या गुड्स कंटेनरला धडक बसली.

यामध्ये निरजचा जागीच मृत्यू झाला तर संकेश्वरकडून बेळगावकडे येणारा ट्रक  चालक राजेंद्र रामभाऊ डोईफोडे (रा. घाटनंदूर, ता. खेज, जि. बीड) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रात्री या घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यातच पाऊस पडत होता. अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी काही जणांच्या मदतीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या तिहेरी अपघातामध्ये रस्त्यावर कांदे विखुरले गेले होते. याचबरोबर पीठही पडले होते. अपघात इतका भीषण होता की दुभाजकाला ट्रकचा भाग आदळल्यामुळे दोन भाग झाले होते. सुदैवानेच यावेळी अधिक वाहने नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

कंटेनरचा चालक मुकेशकुमार पुंजाभाई कांत (रा. पानसुर्डा) हा आपला ट्रक बाजूला लावून चहा पिण्यासाठी धाब्यामध्ये गेला होता. त्यामुळे सुदैवानेच तो या अपघातातून बचावला आहे. 

Related Stories

शिवाजीनगर येथील तरुण बेपत्ता

sachin_m

बेळगुंदी येथे आत्मनिर्भर भारत योजनेचा शुभारंभ

Omkar B

मोरया गुप 1995 संघ विश्वजित ट्रॉफीचा मानकरी

Amit Kulkarni

मराठा जागृती निर्माण संघातर्फे पर्यावरण दिन साजरा

Amit Kulkarni

जि.पं.च्या निधीत कोणाचाही हस्तक्षेप नको

Amit Kulkarni

चापगाव श्री फोंडेश्वर मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!