तरुण भारत

सौरऊर्जेचा ‘पॉवर’फुल प्रयोग

ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन या क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. आजवर मोठमोठे ऊर्जा प्रकल्प या देशातील विजेची गरज भागवत आले आहेत. मात्र, भविष्यात ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील आव्हाने ओळखून सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीवर भर देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहेत. आज फारच कमी प्रमाणात सौरऊर्जेचा वापर केला जातोय. यासाठी येत्या काळात सोलर पार्क उभारून त्यातून स्वस्त वीज मिळविण्याचा प्रयत्न आहे. याची सुरुवात गुजरात राज्याने केली आहे. एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जीतर्फे गुजरातमधील कच्छ येथे 4750 मेगावॅट क्षमतेचा सोलर पार्क बनविला जात आहे. हा देशातील सर्वात मोठा सोलर पार्क आहे. यासाठी कंपनीला केंद्रीय मंत्रालयाने मंजुरीही दिली आहे. या प्रकल्पातून कंपनी व्यावसायिक स्तरावर ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करणार आहे. कच्छ जिल्हय़ात खवडा आणि विघकोट दरम्यानच्या पडीक जमिनीवर हा प्रकल्प साकारत आहे. या भागात सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी याआधीच अनेक कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे. कंपनीची सध्याची अक्षय ऊर्जा निर्मितीची क्षमता 1,400 मेगावॅट आहे. एनटीपीसीचे 2032 पर्यंत 60 गिगावॅट ग्रीन पॉवर निर्मितीचे उद्दिष्ट आहे. सध्या गुजरातमध्ये खासगी कंपन्या 70 प्रकल्पांमधून 66 गिगावॅट पॉवर निर्मिती करतात.   कच्छ येथील सोलर पार्कसाठी राज्य सरकार जमीन उपलब्ध करून देणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

‘एनटीपीसी’ची व्यापकता

Advertisements

एनटीपीसीने गुजरात राज्य तेल आणि प्राकृतिक गॅस निगमच्या सहयोगाने पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याची योजनाही हाती घेतली आहे. अलिकडेच केंद्रशासित प्रदेश लडाख आणि लडाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या सहयोगाने ग्रीन हायड्रोजनची निर्मिती आणि फ्यूएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. एनटीपीसीने आंध्रप्रदेशात सिम्हाद्री थर्मल पॉवर प्लान्टच्या जलाशयावर देशातील सर्वात मोठा 10 मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलर सुरू केला आहे. याशिवाय तेलंगणातील रामागुंडम थर्मल पॉवर प्लान्टवर 100 मेगावॅटच्या फ्लोटिंग सोलर प्रकल्पाचे काम सुरू आहे.

70 हजार हेक्टरवर प्रकल्प

गुजरात कच्छ येथे होणारा हा प्रकल्प तब्बल 70 हजार हेक्टर क्षेत्रात साकारत आहे. म्हणजे एखाद्या शहरापेक्षाही महाविशाल असा हा प्रकल्प होणार आहे. सूर्याच्या उष्णतेवर चालणाऱया या प्रकल्पात पवन ऊर्जाही तयार केली जाणार आहे. दोन्ही मिळून 30 हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पाची असेल. या प्रकल्पात दीड लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे दरवर्षी 5 कोटी टन कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन रोखण्यास मदत होणार आहे. त्याचसोबत 1 लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

गुजरातची झेप…

वीज निर्मितीत गुजरात वेगाने प्रगती करत आहे. शेतकरी बांधवांसाठी शेतकरी सूर्योदय योजनेंतर्गत एक वेगळे नेटवर्क बनविले जात आहे. शेतकऱयांना रात्री शेतात जाऊन पाणी देण्याची गरज भासू नये, यासाठी विशेष वाहिन्या टाकल्या जात आहेत.

गुजरात राज्याने सौरऊर्जेचा विचार करून धोरणे राबविण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात सौरऊर्जेपासून निर्मित विजेचा दर 16 ते 17 रुपये मिळत होता. मात्र, भविष्यातल्या शक्यतांचा विचार करून काम अखंड सुरू ठेवले. त्याच्या परिणामी आज गुजरातच नव्हे, तर अन्य प्रदेशातही ही वीज दोन ते तीन रुपये युनिट या दराने विकली जात आहे. गेल्या सहा वर्षात सौरऊर्जा क्षेत्रातील गुजरातची क्षमता 16 पटीने वाढली आहे.

                                 कच्छची ओळख बदलणार

आज कच्छचे रण प्रगतीसाठी ओळख करू पाहतेय. खावडा येथील सौरऊर्जा प्रकल्प, मांडवी येथे खाऱया पाण्यापासून गोडे पाणी बनविणार डिसेलिनेशन प्रकल्प आणि अंजारमध्ये होणारा सरहद दुग्धालयाचा स्वयंचलित प्रकल्प यामुळे कच्छ प्रगतीच्या मार्गावर जात आहे. एकेकाळी वीज, पाणी, रस्ता, कनेक्टिव्हिटी अशा सर्वच पातळीवर मागास असलेल्या या प्रदेशात प्रगतीचे वारे वाहू लागलेत. एकेकाळी उजाड असलेल्या हा प्रदेश आता पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. कच्छचे श्वेत रण आणि तेथील रणोत्सव पर्यटकांना आकर्षित करत आहे. रण उत्सवाच्या काळात जवळपास 5 लाख पर्यटक येथे भेट देतात.

‘एक सूर्य, एक विश्व, एक ग्रीड’चे स्वप्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सूर्य, एक विश्व, एक ग्रीड ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. सूर्यापासून 24 तास ऊर्जा मिळणे शक्य आहे. कारण जगाच्या एका भागात त्याचा अस्त होतो, तर दुसऱया भागात उदय होतो. म्हणजेच एकाचवेळी तो अस्ताला जात नाही. त्यामुळे आपल्या शेजारील देशांमध्ये उपलब्ध होणाऱया सौरऊर्जेचा वापर करून जगभरात सौरऊर्जा देण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय विद्युत ग्रीडच्या रुपात एक सूर्य, एक विश्व, एक ग्रीडची संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय विद्युत पारेषण ग्रीडशी महाद्विपांमध्ये जनरेटर आणि विद्युत भार जोडले जातील. 8 सप्टेंबर 2020 रोजी एक सूर्य, एक विश्व, एक ग्रीड संकल्पना कार्यान्वित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन, ऊर्जा मंत्रालय आणि इंटनरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे.

सौर शहर उपक्रम

देशातील प्रत्येक राज्यात कमीत कमी एक शहर सौर शहर म्हणून विकसित करण्याची योजना आहे. या शहरातील विजेची गरज अक्षय उर्जा स्रोतातून मुख्यतः सौरऊर्जेतून भागवावी, असा यामागचा उद्देश आहे. अशा शहरातील प्रत्येक घराच्या छतावर सौर पॅनेल बसविले जातील. स्ट्रीटलाईट सौरऊर्जेवर चलतील. तर विजेची अन्य गरज भागविण्यासाठी जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आहे.

सूर्यमित्र प्रशिक्षण

ऊर्जा मंत्रालयाने 2015 मध्ये सूर्यमित्र कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरुवात केली. मार्च 2020 पर्यंत 47 हजार 166 जणांना प्रशिक्षित करण्यात आले. आणि यंदाच्या वर्षी गुरुग्राम येथील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थानला 4,500 जणांना
प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

सौर जल पंपिंग

गुरुग्राम येथील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थानला 2020-21 या वर्षात सौर जल पंपिंग प्रणालीसंदर्भात 900 वरुणमित्रांना प्रशिक्षण देण्यासाठी 30 प्रशिक्षण कार्यक्रमांना मंजुरी दिली. सरकारी संस्था, इंजिनिअरींग कॉलेज, पॉलिटेक्निक यांच्या मदतीने हे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.

सौर पार्क

ऊर्जा मंत्रालय सौर पार्क आणि अल्ट्रा मेगा सौर विद्युत योजना कार्यान्वित करत आहे. या योजनेंतर्गत 2021-22 या वर्षात 40 हजार मेगावॅट क्षमतेच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी कमीत कमी 50 सौर पार्क उभारले जाणार आहेत. सौर पार्कची क्षमता 500 मेगावॅट आणि त्यापेक्षा अधिक असेल. जेथे अकृषिक जमीन उपलब्ध नसेल तेथे छोटे प्रकल्प उभारले जातील. त्यात अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय आणि मिझोराम येथे 20 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प प्रस्तावित आहेत.

सिंगापूरमध्ये सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्रकल्प

सिंगापूरमध्ये रिन्यूएबल एनर्जीला वाव नाही. हायड्रो इलेक्ट्रीसिटी प्रकल्पांसाठी तेथे नद्या नाहीत. तसेच वाऱयांना वेग नसल्याने वाईंड पॉवर प्रकल्प होऊ शकत नाहीत. तसेच भूक्षेत्रही कमी असल्याने फ्लोटिंग सोलर फार्मचा प्रकल्प राबविला जात आहे. 110 एकर क्षेत्रात 1 लाख 22 हजार सोलर पॅनल्स जोडले जाणार आहेत. यातून 60 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. तर 32 किलो टन कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन रोखले जाणार आहे.

– संकलन – राजेश मोंडकर, सावंतवाडी

Related Stories

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सव रद्द

tarunbharat

‘दगडूशेठ गणपती’ ट्रस्टच्या पुढाकाराने प्लाझ्मा चाचणीकरीता 50 हजार रुपयांची मदत

pradnya p

कोरोना योद्ध्यांच्या हस्ते यंदा श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापना

pradnya p

वर्षातील 300 दिवस झोपणारा नवा ‘कुंभकर्ण’

Patil_p

गुगलचे खास डूडल : कोरोना योद्धांचे मानले आभार!

pradnya p

‘दगडूशेठ दत्तमंदिराचा’ पहिला दिवा अनाथांसाठी…

pradnya p
error: Content is protected !!