तरुण भारत

भारताची पहिली तुकडी टोकियोत दाखल

कुरोब सिटीच्या प्रतिनिधींनी केले उत्साही स्वागत 

वृत्तसंस्था/ टोकियो

Advertisements

भारताच्या ऑलिम्पिक क्रीडापटूंच्या पहिल्या तुकडीचे रविवारी टोकियोत आगमन झाले असून विमानतळावर कोव्हिड 19 संबंधित प्रोटोकॉल्स पूर्ण केल्यानंतर सर्व क्रीडापटू ऑलिम्पिक क्रीडाग्राममध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे ते दाखल होण्याआधी रविवारी क्रीडाग्राममध्ये राहत असलेले तीन क्रीडापटू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

शनिवारी रात्री 88 जणांचे पहिले पथक टोकियोकडे रवाना झाले होते. इटली व क्रोएशियामध्ये टेनिंग घेत असलेले नेमबाज व बॉक्सर्सही टोकियोमध्ये पथकात सामील झाले आहेत. भारतातून प्रयाण केलेल्या पथकात तिरंदाज, बॅडमिंटनपटू, टेबलटेनिसपटू, महिला व पुरुष हॉकी संघ, पात्रता मिळविलेले ज्युडोका, जिम्नॅस्ट्स आणि जलतरणपटू यांचा समावेश होता. नवी दिल्लीहून एअर इंडियाच्या चार्टर्ड विमानाने रविवारी सकाळी टोकियोमध्ये हे पथक दाखल झाले, त्यावेळी कुरोब सिटीच्या प्रतिनिधीनी या पथकाचे बॅनरसह स्वागत केले. ‘विमानतळावर सर्वांच्या कोव्हिड 19 चाचण्या घेण्यात आल्या. यासाठी तब्बल सहा तास आम्हाला थांबावे लागले होते. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आम्ही सर्वजण गेम्स व्हिलेजमध्ये दाखल झालो आहोत. आतापर्यंत तरी सर्व सुरळीत पार पडले आहे,’ असे या पथकातील एका सदस्याने सांगितले. दाखल झालेल्या गटात अनेक स्टार खेळाडू असून त्यात वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू, सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर एमसी मेरी कोम, जागतिक अग्रमानांकित बॉक्सर अमित पांघल, जागतिक अग्रमानांकित महिला तिरंदाज दीपिका कुमारी व टेटेपटू मनिका बात्रा यांचा समावेश आहे.

गेम्स व्हिलेजमध्ये राहत असलेल्या क्रीडापटूंपैकी तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले, त्याच दिवशी भारतीय तुकडीचे येथे आगमन झाले आहे. टोकियो शहरात लोकांची गर्दी वाढू लागली असल्याने अशा केसेस मिळणार, याची अपेक्षा केली होती आणि त्याचा मुकाबला करण्याची तयारीही केली असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. भारतीय तुकडीतील सर्व सदस्यांनी मास्क परिधान केले होते तर विमानतळावर कागदपत्रे तपासणीचे काम चालू असताना भारतीय सदस्यांनी फेस शील्डही लावले होते. त्यानंतर ते बसमधून गेम्स व्हिलेजकडे रवाना झाले. शनिवारी दिल्लीत मोठय़ा जल्लोषात भारतीय तुकडीला निरोप देण्यात आला होता. या समारंभाला क्रीडामंत्री अनुराग ठाकुर व क्रीडा मंत्रालयाशी संबंधित निशिथ प्रामाणिक, संदीप प्रधान, तसेच आयओसीचे अध्यक्ष नरेंदर बात्रा, सरचिटणीस राजीव मेहता यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

काही खेळाडू इतर ठिकाणी टेनिंग घेत होते, तेही टोकियोत दाखल झाले आहेत.  या स्पर्धेत भारताचे 119 ऍथलेट्ससह एकूण 228 सदस्यांचे जंबो पथक सहभागी होणार आहे. नेत्रा कुमारन, विष्णू सर्वानन, केसी गणपती, वरुण ठक्कर हे चार नौकानयनपटू युरोपमधील ट्रेनिंगनंतर सर्वप्रथम टोकियोत दाखल झाले आणि गुरुवारपासून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. याशिवाय रोईंग टीमही शहरात दाखल झाली आहे. बजरंग पुनिया व विनेश फोगट यांच्यासह कुस्तीपथक आणि टेनिस स्टार सानिया मिर्झासह उर्वरित टेनिस संघ आणि नीरज चोप्रासह ऍथलेटिक्सचे पथक यांचे आगमन व्हावयाचे आहे.

स्पर्धेशी संबंधित असलेल्या कोरोना बाधितांची संख्या आता 55 झाली असून कोरोना प्रसाराचा धोका टाळण्यासाठी ऑलिम्पिकमधील सर्व क्रीडाप्रकार बंदिस्त स्टेडियममध्ये घेतले जाणार आहेत. टोकियोमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून गेल्या काही दिवसात रोज एक हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीतही स्पर्धा घेण्यात येत असून क्रीडाग्राममधील रहिवाशांना आणि एकंदर जपानमधील जनतेला कोरोनाचा कोणताही धोका होणार नसल्याचा दावा आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी केला आहे.

Related Stories

गुरुपौर्णिमेनिमित्त सचिनची तीन व्यक्तींना मानवंदना

Patil_p

इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय

Patil_p

भारत-ओमान फुटबॉल सामने मार्चमध्ये

Patil_p

दुखापतीमुळे सुशील कुमारची चाचणी स्पर्धेतून माघार

Patil_p

बेदीची रुग्णालयातून सुटका

Patil_p

टी-20 वर्ल्डकप स्पर्धा न्यूझीलंडमध्ये घ्यावी

Patil_p
error: Content is protected !!