तरुण भारत

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अनंत मनोहर यांचे निधन

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावचे ज्येष्ट साहित्यिक व आरपीडी कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक अनंत मनोहर (वय 92) यांचे शनिवारी रात्री साडेदहा वाजता पुणे मुक्कामी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात प्रियदर्शन व आशुतोष हे मुलगे, जाई व ऋता या मुली तसेच सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. प्रा. मनोहर यांच्या निधनाच्या वृत्ताने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

प्रा. अनंत मनोहर मूळचे पेणचे. 1962 मध्ये ते आरपीडी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1962 ते 1988 दरम्यान त्यांनी आरपीडीमध्ये सेवा बजावली. 1988 साली विभागप्रमुख या पदावरून ते निवृत्त झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. प्राधान्याने विद्यार्थ्यांची मराठी भाषा आणि व्याकरण कसे शुद्ध राहील, यावर त्यांचा नेहमीच कटाक्ष राहिला. प्राध्यापक म्हणून सेवा बजावतानाच त्यांचे लेखन अखंड सुरू होते. कथा, कादंबरी, प्रवासवर्णने, ललितलेख, नभोनाटय़, प्रासंगिके, चरित्र अशा विविध प्रकारातून त्यांनी साहित्य लेखन केले. एकूण 68 पुस्तके त्यांच्या नावावर जमा असून त्यापैकी 20 कथासंग्रह, 25 कादंबऱया आहेत. याशिवाय चरित्र लेखन, समीक्षा लेखनासह क्रिकेट या विषयावरही त्यांनी लेखन केले.

विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्यावर त्यांनी पुस्तक लिहिले. सचिन तेंडुलकरच्या पुस्तकाचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. काँटिनेन्टलने 1982 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘राब’ या त्यांच्या प्रादेशिक कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, तसेच म. सा. परिषद पुरस्कार मिळाला. ‘मौज’ प्रकाशित ‘अरण्यकांड’ला सोलापूरचा भैरू रतन दमाणी पुरस्कार मिळाला. कोकण मराठी साहित्य परिषदेचा कादंबरी लेखनाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. 1992 च्या विश्वचषक स्पर्धेचे ऑस्ट्रेलियामधून त्यांनी समालोचनही केले.

‘तरुण भारत’, ‘लोकमान्य ग्रंथालय’, वाङ्मय चर्चा मंडळ यासह अनेक साहित्य संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. निवृत्तीनंतरही कोणीही विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेला असता त्यांना विशेष आनंद होत असे. लेखन आवडल्यानंतर त्या लेखकाला आवर्जून कळविणे, हे त्यांचे वैशिष्टय़ होते. बेळगाववर त्यांचे नितांत प्रेम होते. बेळगाव सोडून जाणे त्यांच्या जीवावर आले होते.

विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अनंत मनोहर सर…

ज्येष्ट लेखक अनंत मनोहर यांच्या निधनाचे वृत्त समजले. आणि सरांच्या अनेक आठवणी मनात फेर धरू लागल्या. मी त्यांचा विद्यार्थी होतोच. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. लेखनाचा विषय कोणताही असो, त्यावर चिंतन, मनन व अभ्यास केल्याशिवाय ते लेखन करीत नसतं. तरुण भारतशी त्यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध राहिला.

तरुण भारतच्या अक्षरयात्रा पुरवणीसाठी त्यांचे लेखन नेहमीच असायचे. परंतु तरुण भारतच्या दिवाळी अंकात त्यांचा लेख प्रथम येत असे. हा मान आम्ही त्यांना आनंदाने दिला होता. तरुण भारतच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अनेकदा त्यांच्या हस्ते झाले. आपले विद्यार्थी वृत्रपत्र आणि पत्रकारिता ही क्षेत्रे गाजवत असल्याचा त्यांना रास्त अभिमान होता. खूप गंभीर विषय मांडतानाच एखादी मिश्किल कोटी करून ते वातावरण हलके-फुलके करीत. एसकेई सोसायटीने त्यांच्या नावाने आरपीडीमध्ये ‘अनंत मनोहर’ पार्क उभे करून त्यांच्या आठवणी चिरंतन केल्या आहेत. ‘तरुण भारत’ आणि ‘लोकमान्य परिवारा’तर्फे मी त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहतो, असे तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक तसेच लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी म्हटले  आहे. अनंत मनोहर यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात तरुण भारत व लोकमान्य परिवार सहभागी आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

शहर परिसर अडकला बॅरिकेड्सच्या विळख्यात

Patil_p

शांती फोमॅकला जर्मनीच्या कंपनीकडून उत्कृष्ट पुरवठादार म्हणून सन्मान

Amit Kulkarni

बी. डब्ल्यू. आचमनी यांच्याकडून लोकमान्य ग्रंथालयास 600 पुस्तके भेट

Patil_p

पुन्हा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाला जिल्हाधिकाऱयांची सक्त ताकीद

Patil_p

लॉकडाऊन काळात एपीएमसीतील कामे पूर्ण करा

Omkar B

माजी विद्यार्थ्यांकडून येळ्ळूर मराठी शाळेत सुसज्ज ग्रंथालय

Amit Kulkarni
error: Content is protected !!