तरुण भारत

कौंटी सिलेक्टविरुद्ध भारताचा सराव सामना आजपासून

केएल राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी, मात्र मयांक अगरवालच्या कामगिरीवर लक्ष

वृत्तसंस्था/ डरहॅम

Advertisements

इंग्लंड दौऱयावर असलेल्या भारतीय संघाचा पहिला तीन दिवसीय सराव सामना कौंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध मंगळवारपासून येथे सुरू होत आहे. कसोटी संघाच्या अंतिम इलेव्हनमध्ये पुन्हा स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱया मयांक अगरवालच्या कामगिरीवर व्यवस्थापनाचे लक्ष असेल तर रिषभ पंतच्या गैरहजेरीत केएल राहुल या सामन्यात यष्टिरक्षण करणार आहे.

या सामन्याला प्रथमश्रेणी सामन्याचा दर्जा देण्यात आला असून धोनीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती, त्यानंतर बऱयाच वर्षानी भारतीय संघाला प्रथमश्रेणी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. प्रत्यक्ष मालिका सुरू होण्याआधी ‘अधिकृत सामना’ खेळावयास मिळणे गरजेचे असल्याचे धोनीने त्यावेळी म्हटले होते. पुढील महिन्यात भारताची कसोटी मालिका सुरू होत असल्याने आपल्या संघाला सराव मिळावा यासाठी प्रथमश्रेणी सामना मिळण्याची इच्छा भारतीय संघव्यवस्थापनाने ईसीबीकडे व्यक्त केली होती.

बीसीसीआयमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित झालेल्या रिषभ पंतने लंडनमधील परिचिताच्या घरी 10 दिवसांचे आयसोलेशन पूर्ण केले असून त्याच्या तब्येतीत सुधारणाही झाली आहे. मात्र डरहॅममधील संघासाठी असलेल्या बायोबबलमध्ये तो अद्याप सामील झालेला नाही. ‘या सराव सामन्यासाठी तो वेळेत दाखल झाला असता तरी त्याला पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी खेळविण्यात आले नसते. त्याला बाधा झाली असली तरी कोणतीच लक्षणे आढळून आली नाहीत.  मात्र नॉटिंगहॅममधील पहिल्या कसोटीआधी त्याला ट्रेनिंगची गरज लागेल,’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले. पहिल्या कसोटीसाठी मात्र पंत व साहा दोघेही उपलब्ध असतील, असेही हा अधिकारी म्हणाला. साहाला सावधगिरी म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते.

आधी जाहीर केल्याप्रमाणे या सामन्यात केएल राहुल यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र सर्वाधिक लक्ष असेल तरे मयांक अगरवालच्या कामगिरीवर. शुभमन गिल जखमी असल्याने पहिल्या कसोटीत रोहित शर्मासमवेत सलामीला मयांक अगरवाल उतरण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया दौऱयात मयांकची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे तेथील पहिल्या दोन कसोटीत खेळू न शकलेल्या रोहित शर्माला त्याच्या जागी घेण्यात आले होते. क्वारन्टाईन नियमावलीमुळे रोहितला पहिल्या कसोटी त्यावेळी हुकल्या होत्या. केएल राहुलने आजवर कसोटीत दोन हजार धावा जमविल्या असून त्यातील खूपशा धावा सलामीला खेळताना केल्या आहेत. असे असले तरी त्याचा मध्यफळीतील फलंदाज म्हणून विचार केला जात आहे. एखाद्या वरिष्ठ फलंदाजाचा (अजिंक्य रहाणे) फॉर्म हरविल्यास राहुलला मध्यफळीत खेळविले जाऊ शकते.

कौंटी सिलेक्ट इलेव्हन संघात अधिकतर युवा खेळाडूंचा भरणा असून फक्त जेम्स ब्रेसी या एकमेव खेळाडूने इंग्लंडतर्फे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे भारताला दुसरा डाव खेळण्याची संधी मिळाल्यास राहुल व मयांक दोघांनाही आजमावून पाहिले जाऊ शकते. पण सामना तीन दिवसांचाच असल्याने ती शक्यता कमीच वाटते. गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आपली क्षमता दाखवून देण्यास उत्सुक असेल तर बुमराह देखील आपल्या खात्यावर काही बळी नोंदवण्यास आतुर आहे. आर. अश्विनने मात्र सरे कौंटीतर्फे खेळत काही बळी मिळविले असल्याने त्याला बऱयापैकी सराव मिळाला आहे. 

Related Stories

मुंबई संघाचा सलग तिसरा पराभव

Patil_p

हा तर विनू मंकड यांचा अपमान!

Patil_p

मेदव्हेदेव, इस्नेर, टायफो चौथ्या फेरीत

Patil_p

ऑस्ट्रेलियन स्पर्धेत शरापोव्हाला वाईल्डकार्ड प्रवेश

Patil_p

सुवर्ण पदक विजेत्यांना सरकारी नोकरी; 6 कोटींची बक्षिसे

datta jadhav

दोन ‘रॉयल्स’ संघ आज पुन्हा आमनेसामने

Patil_p
error: Content is protected !!