तरुण भारत

टोकियोत आणखी तिघे ऍथलिट कोरोनाग्रस्त

अमेरिकन जिम्नॅस्ट कॅरा, लियान, झेकचा बीच व्हॉलीबॉलपटू पेरुसिकचा समावेश

टोकियो / वृत्तसंस्था

Advertisements

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऍथलिट्सभोवती कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोनाचा संसर्ग होणारा झेक प्रजासत्ताकचा व्हॉलीबॉलपटू ओंद्रेझ पेरुसिक हा तिसरा ऍथलिट ठरला. अमेरिकन महिला जिम्नॅस्टिक्स संघातील कॅरा व लियान या राखीव खेळाडूंना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.

यापूर्वी रविवारी दक्षिण आफ्रिकन फुटबॉल संघातील दोघे खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. पेरुसिक हा झेकच्या पथकात कोरोनाचा संसर्ग होणारा दुसरा खेळाडू आहे. टोकियो ऑलिम्पिकशी संबंधित कोरोनाग्रस्तांची संख्या आता 58 वर पोहोचली आहे.

‘सर्व काटेकोर काळजी घेऊनही बीच व्हॉलीबॉलपटू ओंद्रेझ पेरुसिकला कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या तो नियमानुसार आयसोलेट आहे’, असे झेक प्रजासत्ताकच्या ऑलिम्पिक संघाने आपल्या ट्वीटर हँडलवर म्हटले. ‘पेरुसिकची रविवारी चाचणी घेतली गेली होती. त्याच्यात अगदी सौम्य लक्षणेही नव्हती. पण, पीसीआर विश्लेषणात त्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे नमूद आहे’, असे झेकचे पथक प्रमुख मार्टिन डोक्टोर म्हणाले.

पेरुसिक व त्याचा सहकारी डेव्हिड स्वेनर हे दि. 26 जुलै रोजी त्यांचा पहिला सामना खेळणार होते. आता हा सामना लांबणीवर टाकला जावा, अशी विनंती झेक पथक आयोजकांना करणार आहे. यापूर्वी रविवारी दक्षिण आफ्रिकन फुटबॉल संघातील थॅबिसो व कामोहेलो हे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. यंदाची टोकियो ऑलिम्पिक बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय दि. 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होत आहे.

राखीव जिम्नॅस्टही विळख्यात

अमेरिकन जिम्नॅस्ट संघातील राखीव खेळाडू कॅरा इकर व लियान वोंग हे देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले असल्याचे अमेरिकन ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक कमिटीने सोमवारी म्हटले. ऑलिम्पिक चॅम्पियन सिमोन बाईल्स किंवा आणखी कोणी पदकाच्या दावेदारासाठी सुवर्ण जिंकण्याच्या अपेक्षांना यामुळे धक्का बसणार का, याबद्दल मात्र त्यांनी काहीही भाष्य केलेले नाही.

टोकियोत आणीबाणीची परिस्थिती असताना या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ऑलिम्पिकची सुरुवात होईल. मात्र, राजधानीत नव्या रुग्णांची संख्या चिंतेत भर टाकणारी असल्याने सर्व इव्हेंट्स चाहत्यांशिवाय होतील, असा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला. अमेरिकन महिला जिम्नॅस्टचा संघ रविवार दि. 25 रोजी आपल्या पहिल्या इव्हेंटसाठी रिंगमध्ये उतरेल. रविवारी टोकियो मेट्रोपॉलिटन प्रशासननाने 727 नवे रुग्ण सापडले असल्याचे जाहीर केले होते.

अपघाताने तलवारबाजीत आलेली भवानी देवी ऑलिम्पिकसाठी सज्ज!

चेन्नई ः 27 वर्षीय सी ए भवानी देवी ‘अपघातानेच’ तलवारबाजीत आली. वास्तविक, तलवारबाजीत तिला काहीच स्वारस्य नव्हते. मात्र, शालेय स्तरावर करिअर करायचे, त्या 6 क्रीडा प्रकारात, तलवारबाजीशिवाय कोणताच पर्याय नसल्याने तिने नाईलाजाने हा खेळ निवडला आणि याच तलवारबाजीमधून प्रतिनिधीत्व करणारी ती भारताची पहिली ऍथलिट ठरली आहे!

मूळ चेन्नईची असलेल्या भवानी देवीने यंदाच्या ऑलिम्पिकसाठी इटलीमध्ये कसून सराव केला आहे. या सराव सत्राबद्दल ती म्हणते, ‘माझा सराव अतिशय उत्तम झाला आहे. मी माझ्या या पहिल्या ऑलिम्पिकसाठी खडतर परिश्रम घेतले आहेत आणि पूर्ण तयारी देखील केली आहे. इटालियन राष्ट्रीय संघाच्या काही शिबिरात मी सहभागी झाले. तेथे आणखी काही आंतरराष्ट्रीय स्पर्धक समाविष्ट होते. याशिवाय, मी फ्रान्समध्ये देखील सराव केला. ऑलिम्पिक ही अर्थातच खास असते आणि प्रत्येक ऍथलिटसाठी यात यश मिळवणे हे स्वप्न असते. प्रत्येक सामना कठीण असेल. पण, प्रत्येक गोष्ट शक्य आहे, यावर माझा विश्वास आहे’.

कोरोनामुळे सरावाची रुपरेषा व एकूण गेमप्लॅन यावर कसा फरक पडला, या प्रश्नावर तिने स्पर्धेबद्दल बराच गोंधळ होता, असे मान्य केले. मात्र, ज्याप्रमाणे स्पर्धा होईल, त्याप्रमाणे आपली तयारी असावी, यावर मी भर दिला. इटलीहून परतल्यानंतर पूर्ण वेळ सरावावर अधिक भर दिला, याचा तिने उल्लेख केला. गतवर्षी लॉकडाऊन असताना फुटवर्क आणि फिटनेस वर्कआऊटवर भर दिला असल्याचे तिने येथे सांगितले.

भवानी देवीचे टोकियोतील मुख्य प्रतिस्पर्धी

बियान्का पास्कू (जपान), सोफिया पोझियाकोव्हा (रशिया), गॅब्रिएला पेज (कॅनडा), कॅरोलिन क्वेरोली (फ्रान्स), चिका (जपान).

भारतीय ऍथलिट्सच्या सरावाला प्रारंभ

टोकियो ः रविवारी पहिल्या तुकडीतून टोकियोत पोहोचलेल्या भारतीय ऍथलिट्सनी सोमवारपासून प्रत्यक्ष सरावाला सुरुवात केली. तिरंदाज दीपिका कुमारी, अतानू दास, टेबलटेनिसपटू जी. साथियन, अचंता शरथ कमल, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, बी. साई प्रणित व एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायक यांचा यात प्राधान्याने समावेश राहिला.

युमेनोशिमा पार्कवरील सराव सत्रात तिरंदाजीतील जोडपे अतानू दास व त्याची पत्नी दीपिका कुमारी यांनी आपल्या कौशल्यावर अधिक मेहनत घेण्यास श्रीगणेशा केला. पॅडलर्स साथियन व शरथ यांनीही ऑलिम्पिकमधील हव्याहव्याशा सुवर्णपदकाचे ध्येय गाठण्यासाठी नव्याने सुरुवात केली.

जिम्नॅस्ट प्रणती नायकने प्रशिक्षक लक्ष्मण मनोहर शर्मा यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सराव केला. शटलर सिंधू व प्रणित यांनी एकेरीतील प्रशिक्षक पार्क ते सँग यांच्याकडून टीप्स घेतल्या. पुरुष दुहेरीतील चिराग शेट्टी व सात्विकराज रणकिरेड्डी यांनी त्यांचे प्रशिक्षक मॅथियासकडून काही धडे गिरवले. व्ही. सर्वाननसह नौकानयनपटूंनी रविवारपासूनच सरावाला सुरुवात केली आहे. नेत्रा कुमानन, केसी गणपती, वरुण ठक्कर हे मागील आठवडय़ातच टोकियोत पोहोचले असून त्यांचा देखील कसून सराव सुरु आहे.

रोवर्स अरुण लाल जाट व अरविंद सिंग पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कलमधून उतरणार असून ते प्रशिक्षक इस्माईल बेग यांच्या मार्गदर्शनानुसार सी फॉरेस्ट वॉटर वे येथे सराव करत आहेत. 15 सदस्यांच्या नेमबाजी पथकाने देखील एव्हाना सरावाला सुरुवात केली आहे. भारतातून येणाऱया ऍथलिट्सवर प्रारंभी 3 दिवसांचे सक्तीचे क्वारन्टाईन होते. मात्र, नंतर ते मागे घेतले गेले असल्याने भारतीय पथकाला दिलासा लाभला.

विमानतळावर कोव्हिड चाचणीची औपचारिकता यशस्वीरित्या पार केल्यानंतर ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये भारतीय ऍथलिट्सना जिम्नॅशियम व डायनिंग हॉलसारख्या कॉमन एरियामध्ये प्रवेश मिळत गेला. नियोजित कालावधीच्या तुलनेत एक वर्ष उशिराने होणाऱया यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भरीव यश प्राप्त करण्याचे भारतीय पथकाचे लक्ष्य आहे.

बॉक्स  (फोटो-सौरभ चौधरी, जितू राय)

सौरभ सुवर्णजेत्या जिनला नमवू शकेल ः जितू राय

नवी दिल्ली ः आजवरचा वैयक्तिक स्तरावरील सर्वात यशस्वी नेमबाज जिन जाँगला भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरी नमवण्याचा पराक्रम गाजवू शकतो, असे माजी वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यजेता जितू रायचे मत आहे. जिन हा समर ऑलिम्पिक्समधील सर्वात यशस्वी नेमबाज असून त्याने आजवर 6 पदके जिंकली. त्यात 4 सुवर्णपदकांचा समावेश आहे.

जितू रायने यावेळी सौरभ चौधरीशिवाय, यशस्विनी सिंग देस्वाल व मनू भाकर यांच्याकडून देखील विशेष अपेक्षा असल्याचे म्हटले.  ‘सौरभ चौधरीला मी अगदी जवळून पाहिले आहे. केवळ पदके जिंकण्याबद्दल नव्हे तर स्कोअरच्या निकषावर तो अनेक उच्चांक प्रस्थापित करु शकतो. सध्या विश्वविक्रम त्याच्याच खात्यावर आहे, हे विसरुन चालणार नाही. क्वॉलिफिकेशनमध्ये 582-583 गुण संपादन केले तर तो अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता 99 टक्के असेल’, असे जितू राय म्हणाला. यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये जितू रायचा भारतीय नेमबाजी पथकात समावेश राहिला आहे. जितूने त्यावेळी अंतिम फेरी गाठली. पुरुष गट 10 मीटर्स क्वॉलिफिकेशन फेरी पार करणारा तो पहिला भारतीय ठरला. मात्र, 8 स्पर्धकात निर्णायक क्षणी तो अपेक्षापूर्ती करु शकला नव्हता.

Related Stories

विदित गुजराथी जिंकला पण भारताची बरोबरी

Patil_p

#TokyoOlympics: पी.व्ही. सिंधूकडून हाँगकाँगच्या चेंग गँनचा पराभव करत नॉकआऊट’मध्ये प्रवेश

triratna

जेकब्जच्या विजयामुळे अवघे क्रीडा विश्व स्तंभित

Patil_p

इंडोनेशियाच्या तीन बॅडमिंटनपटूंवर आजीवन बंदी

Patil_p

चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये चेल्सीला विजेतेपद

Patil_p

सुनील दावरचा नवा राष्ट्रीय विक्रम

Patil_p
error: Content is protected !!