तरुण भारत

आरोप-प्रत्यारोप, आगामी संघर्षाची नांदी

आमदार केसरकरांच्या पुढच्या खेळीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष : भाजपकडून केसरकर यांना घेरण्याचा प्रयत्न : केसरकर यांनी आरोपांवर प्रथमचे तोंड उघडले

प्रतिनिधी / सावंतवाडी:

Advertisements

‘चांदा ते बांदा’ योजनेतून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सावंतवाडी शहरात केलेल्या पर्यटनाच्या कामावरून आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्ष संजू परब यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शहरात केलेल्या पर्यटनाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी करून तत्कालीन पालकमंत्री म्हणून केसरकर यांना जबाबदार धरले. केसरकर यांच्यावरच परब यांनी  भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी आगीत तेल ओतताना केसरकर यांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. केसरकर यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देत राणे यांनी आरोप मागे घ्यावेत. अन्यथा
पूर्वीप्रमाणे राजकीय संघर्ष अटळ असल्याचा इशारा देत नगराध्यक्ष परब यांनी शिवसेना पक्षप्रवेशासाठी 2 कोटी 70 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला. त्याला परब यांनी उत्तर देताना पर्यटनाच्या कामातील भ्रष्टाचारात सहभाग असल्याने केसरकर सैरभैर झाल्याची टीका केली. एमटीडीसीमार्फत झालेल्या कामावरून सध्या केसरकर आणि परब यांच्यात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. केसरकर यांना निवडणुकीपूर्वी घेरण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. त्यात त्यांना सध्यातरी यश आल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत नगराध्यक्ष परब यांनी केलेल्या आरोपांची दखल केसरकर घेत नव्हते. परंतु पर्यटनाच्या कामावरून नगराध्यक्ष परब यांनी केसरकर यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्याची दखल घेऊन केसरकर हे परब यांचे थेट नाव घेऊन टीका करताना दिसत आहेत. वादग्रस्त निर्णयामुळे गेले वर्षभर अडचणीत सापडलेल्या नगराध्यक्ष परब यांना आता केसरकर यांनी दखल घेतल्याने आरोप करण्यास बळ मिळाले आहे. नगरपालिका निवडणूक जवळ येईल तसे आरोप-प्रत्यारोप अधिक होऊन शहरात राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. भाजपने केसरकर यांना घेरले असले तरी आपल्या चतुर चालीने केसरकर यांनी अनेकांना नामोहरम केल्याचे पाहायला मिळाले होते. आता केसरकर काय चाल करून विरोधकांना चितपट करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. खरेतर भाजप-शिवसेनेच्या काळात गाजावाजा झालेली ‘चांदा ते बांदा’ योजना ठाकरे सरकारने गुंडाळली आहे. परंतु या योजनेतून झालेल्या कामावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने या योजनेचे कवित्व कायम आहे.

                    चांदा ते बांदा रखडली अन्…

भाजप आणि शिवसेनेच्या काळात 2015-16 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेची घोषणा झाली. चंद्रपूर आणि सिंधुदुर्गसाठी नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित आर्थिक विकास करण्याची पथदर्शी योजना चार वर्षासाठी म्हणजे 2016-17 ते 2019-20 साठी होती. योजनेंतर्गन खासगी गुंतवणूकदार बचत गट, उद्योजक यांच्याशी समन्वय साधून विकास करण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. त्या अंतर्गत कृषी, पर्यटन, पशुपालन या क्षेत्राचा विकास करून लोकांचा आर्थिक विकास करण्यात येणार होता. त्यासाठी जिल्हय़ाला पर्यटन, कृषी आदीसाठी 195 कोटी रुपये निधी आला. त्यातील काही निधी खर्च झाला. तर 163 कोटी रुपये निधी अखर्चित राहिला. तोदेखील या काळात विधानसभा निवडणुका आल्याने भविष्यात खर्च करण्यात येणार होता. परंतु तोपर्यंत राज्यात सत्ताबदल होऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने ही योजना गुंडाळून सिंधुरत्न योजना आणली. तेव्हा पालकमंत्री असलेल्या केसरकर यांनी ‘चांदा ते बांदा’ योजना राबविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासकीय पातळीवर अधिकाऱयांनी त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे त्यावेळचे सत्ताधारी (भाजप) आणि विरोधकही या योजनेवरून केसरकर यांच्यावर सातत्याने टीका करत होते. निवडणुकीतही टीका झाली. परंतु केसरकर यांनी निवडणुकीत बाजी मारली. तर ‘चांदा ते बांदा’ योजना गुंडाळली गेली. ‘चांदा ते बांदा’ योजनेतून शहरात शिल्पग्राम, रघुनाथ मार्केट, उद्यानात खेळणी बसविणे, ओपन जिम, हेल्थ पार्क दुरुस्ती अशी साडेतीन कोटीची कामे झाले होती. त्यातील खेळण्यांबाबत सत्ताधारी नगरसेवकांचा आक्षेप होता. खेळणी पाहूनच एमटीडीसीकडून ताब्यात घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली. त्याला विरोधी शिवसेनेनेही पाठिंबा दिला होता. परंतु अचानक नगराध्यक्ष परब यांनी एमटीडीसीमार्फत झालेल्या कामांची पाहणी करून यात सव्वातीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार केसरकर यांना तत्कालीन पालकमंत्री म्हणून जबाबदार धरले. केसरकर यांनी त्याला उत्तर देत परब यांचे आरोप खोडून काढले. परंतु भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शहराबरोबरच जिल्हय़ातील कामांच्या चौकशीची मागणी केली. तर नीतेश राणे यांनी केसरकर यांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. केसरकर यांनी त्याला उत्तर देत पूर्वीप्रमाणे राणेंशी राजकीय संघर्ष अटळ असल्याचे सांगितले. तर नगराध्यक्ष परब यांच्या पक्षप्रवेशासाठीच्या ऑफरचा गौफ्यस्फोट केला. परब यांच्या जमीन व्यवहार प्रकरणांचे त्यांनी सुतावोच करून पैशासाठी भुकेलेला नगराध्यक्ष शहरवासीयांना चालेल काय, असा सवाल केला. त्याला परब यांनीही उत्तर देत दिले. आरोपांमुळे केसरकर सैरभैर झाल्याचा आरोप केला.

                     केसरकर कोणते अस्त्र काढणार?

एकूणच एमटीडीसीने केलेल्या कामावरून केसरकर यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. त्याला यश आले असले तरी केसरकर आतापर्यंत राजकीय चाली रचण्यात माहीर आहेत. त्यांच्याकडे अस्त्रs राखून ठेवलेली असतात. त्यामुळे ते आता विरोधकांना कुठली चाल रचून चितपट करतात, याची उत्सुकता जनतेला आहे. केसरकर यांचा राजकीय इतिहास पाहता नारायण राणे वगळता त्यांनी जिल्हय़ात कुणावरही थेट नाव घेऊन टीका केली नाही. परंतु आतापर्यंत अनेक आरोप करूनही ज्याची दखल घेतली नव्हती, त्या संजू परब यांच्यावर नाव घेऊन केसरकर यांनी टीका करावी, याचे आश्चर्य सध्या राजकीय धुरिणांना वाटते. सध्यातरी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हे असेच सुरू राहिल्यास आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. यानिमित्त राणे कुटुंबियांशी एकनिष्ठ असल्याचा दावा करणारे परब शिवसेनेत येणार होते, असा गौप्यस्फोट करून परब यांना राणेंपासून दूर करण्याची खेळी केसरकर यांनी केली आहे.

                     कामे वादाचे कारण

आता एमटीडीसीच्या शहरातील कामावरून जे आरोप- प्रत्यारोप होत आहेत, त्या कामांबाबत तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आक्षेप घेत तत्कालीन पालकमंत्री केसरकर यांच्याकडे तक्रार केली होती. आकडा फुगवून दाखविल्याचा आक्षेप साळगावकर यांचा होता. केसरकर यांनीही अधिकाऱयांना खडसावले होते. मात्र, हीच कामे आता वादाचे कारण ठरली आहेत. पालिकेने या कामांसाठी ‘नाहरकत दाखला’ एमटीडीसीला दिला होता. परंतु साळगावकर असेपर्यंत हे प्रकल्प ताब्यात घेण्यात आले नव्हते.

                       एमटीडीसीने आरोप फेटाळले

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी कल्पे यांनी या कामात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही असे सांगत शहरात विविध कामे पालिकेने एनओसी दिल्यानंतर करण्यात आली. पालिकेने कामे करूनही ती ताब्यात घेतली नाहीत. त्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला. या काळात कोरोना आला. उद्यानातील खेळण्यासाठी कुशल कामगार आवश्यक आहेत. त्यासाठी ठेकेदार प्रशिक्षण देणार आहे. पालिकेने प्रकल्प ताब्यात घेतल्यास प्रशिक्षण ठेकेदार देईल, असे सांगितले. आता आरोप-प्रत्यारोप होत असताना पालकमंत्री उदय सामंत यांची भूमिकाही महत्वपूर्ण ठरणार आहे.

Related Stories

भूसुरूंग लावून अनधिकृत जेटी उडवण्यास प्रारंभ

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत संविधान दिन उत्साहात

triratna

भुईबावडा वीज सेक्शनचा कारभार कोल्हापुरातून!

NIKHIL_N

ओएनजीसी जहाजावरील चौघे पॉझिटिव्ह

Patil_p

आंबोली घाट मार्गात दरड कोसळण्याची भीती- शिवराम दळवी

Ganeshprasad Gogate

पाडलोसला आढळली वाघसदृश पावले

NIKHIL_N
error: Content is protected !!