तरुण भारत

‘त्यांना’ मृत्यूचे भय सतावत असते

अध्याय दहावा

ईश्वर नाहीच असे समजून स्वतःसाठी सुख मिळवण्याचा स्वकर्तृत्वाने प्रयत्न करावा, असे कर्मवादी सांगतात. खूप कर्मे करावीत व अमाप सुख भोगावे या मताचा ते पुरस्कार करतात पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. माणसाला सुखाबरोबर दुःखही भोगावे लागते किंबहुना जीवनात माणसाला सुखापेक्षा दुःखच जास्त वाटय़ाला येते म्हणून गदिमा म्हणतात, ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे.’ जन्माला यावे आणि सतत सुख भोगावे असे म्हणणारे जीव हा स्वतंत्र असून त्याला वाटेल तसे वागू शकतो असे मानतात. पण प्रत्यक्षात सर्व जीव सुखापेक्षा दुःखच जास्त भोगताना दिसतात. याचाच अर्थ जीव स्वतंत्र नसून परतंत्र आहे. तो कर्म करतो पण फळ मिळवणे त्याच्या हातात नसते. फळ देणारा दुसराच कुणी असल्याने अपेक्षित फळ मिळाले नाही की, दुःख पदरात पडते. असे वारंवार घडत असल्याने गदिमा म्हणतात तसे माणसाच्या आयुष्यात सुखाचा एकच धागा असून दुःखाचे शंभर धागे असतात. ही गोष्ट उद्धवाला समजाऊन देताना भगवंत म्हणतात, उद्धवा, सकाम कर्म करून दुःखी होणाऱयांच्या तुलनेत तुला माझ्या स्मरणात राहून कर्म न करणारे सुखात दिसतील.

Advertisements

त्यांना कर्माचे महत्त्व कळत नाही परंतु माझ्या ठिकाणी श्रद्धा मात्र असते त्यामुळे माझे साधेभोळे भक्त अत्यंत सुखात असतात.

जे निरंतर गोकुळामध्ये माझ्याबरोबर असलेल्या गोपाळांनी कोणते कर्म केले होते? तरी त्यांनी कर्माची होळी करून नित्य नव्या आत्मसुखाचा उपभोग घेतला ना! गोपींच्या जीवाला पुरुषोत्तमाची आवड लागल्यामुळे त्याही माझ्या परमधामाला पोहोचल्या. इतकेच नव्हे, तर गोकुळातील पशु, पक्षी, गाई व सर्प वगैरेसुद्धा माझ्या पदाला येऊन पोचले. पण याज्ञिक लोकांना कर्माभिमानाचा अतिशय ताठा असल्यामुळे ते आपल्याच कर्माने दुःख भोगीत राहतात. जे केवळ कर्मठ असतात ते, कर्माच्या योगानेच जडबुद्धी होतात आणि सर्वज्ञ काय ते आम्हीच असा मूर्खपणाचा दृढ अभिमान धरतात, म्हणूनच त्यांना असह्य दुःख भोगावे लागते. दीपापासून पतंगाला खरोखर मरण येते पण त्याच्यावर झेप घालताना त्याला मोठे सुख वाटते. त्याप्रमाणे कर्मठ केवळ अभिमानानेच सकाम कर्मात सुख आहे असे मानतात. दुःखाचे निरसन होऊन सुखाची प्राप्ती व्हावी, म्हणून कर्माचे आचरण करतात. स्वतःला मोठे ज्ञाते म्हणवितात पण सर्वात मोठय़ा दुःखाचा नाश खरोखर कसा करावा हे त्यांना कळत नाही. कर्मे करूनही ज्या दुःखाचा नाश होत नाही, असे दुःख तरी कोणते असे विचारशील तर एक ना एक दिवस आपण मरणार हे मोठे दुःख या कर्मवाद्यांना छळत असते पण मृत्यू कसा टाळावा हे त्या बिचाऱयांना कळत नाही. कर्मे करकरून बिचारे थकतात तरी मृत्यू काही टळत नाही. मग ते असे म्हणून समाधान करून घेतात की मरणाचे दुःख हे शेवटी यायचेच आहे तर, जिवंत आहोत तोपर्यंत सुख भोगून घ्यावे. पण उद्धवा! अरे मृत्यूची सतत टांगती तलवार डोक्मयावर लोंबकळत असल्याने कर्मठ लोकांना जिवंतपणीही सुखाचा लेश मिळत नाही.

दरवाजात दरोडेखोर उभा असताना खीर गोड लागत नाही त्याप्रमाणे शरीराला मृत्यू येणार आहे हे समजल्यानंतर विषयामध्ये सुख कसे वाटणार? पुढे ऐक, एकदा मरणकाळची व्यथा सुरू झाली की जन, धन, अन्न आणि स्त्री सुख देऊ शकत नाहीत. ती सारी व्यर्थ होऊन जातात. अंतकाळी कनक आणि कांता ही दुःखदायकच ठरतात कारण त्यांच्यावरील प्रेमामुळे त्यांना सोडून प्राण जाता जात नाही. म्हणून सुज्ञ असतात ते विषयांचा त्याग करतात आणि मूर्ख लोकच त्यावर आसक्त होऊन राहतात हे लक्षात ठेव. देहाला अर्ध घटकाही दुःख झाले, तर कोटय़व्यधी विषयसुखे असली तरी ती व्यर्थ होतात. म्हणून विषयसुखाकरिता जे धडपडतात ते वेडे होत. म्हणून उद्धवा अविनाश गोडी निर्विषयातच आहे आणि एकदा या अविनाशी सुखाची चव ज्यांनी चाखलेली असते ना, ते कर्म करून सुख भोगावे या कर्मवाद्यांच्या म्हणण्याकडे ढुंकूनही पहात
नाहीत.

Related Stories

राज्यात एकाच दिवशी 16 पॉझिटिव्ह

Patil_p

गोध्रा जळीतकांड आरोपी 19 वर्षांनंतर ताब्यात

Patil_p

मुलगी अल्पवयीन असली तरी निकाह वैध

Patil_p

कोरोनावर काँग्रेसकडून श्वेतपत्रिका प्रसिद्ध; राहुल गांधी म्हणाले…

pradnya p

कोटा होणार ट्रफिक सिग्नलमुक्त शहर

Patil_p

आजपासून सिनेमागृहे गजबजणार

Patil_p
error: Content is protected !!