तरुण भारत

अंतराळ सफर!

रशिया आणि अमेरिकेच्या अंतराळ मोहिमांद्वारे मानवाने अभ्यासासाठी घेतलेली झेप आणि त्यानंतर पाहिलेले मानवाच्या अवकाश सहलीचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. अर्थात पैसा खर्च करू शकतील अशा लोकांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी उत्सुक असणाऱया खाजगी यान कंपन्यांचे मालक आता आपल्या विमान आणि यानांसह अंतराळात जाऊन येऊ लागले आहेत. पुढच्या वषी हजार, दोन हजार पेक्षा अधिक लोक आपले अवकाश सफरीचे स्वप्न पूर्ण करू शकतील.  अपोलो 11 या चांद्र मोहिमेच्या 52 व्या वर्धापन दिनी अमेरिकेतील अब्जाधीश आणि अमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बेझोस यांनी आपल्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या म्हणजे स्वतःच्या यानातून पहिली साहसी अवकाशवारी पूर्ण केली.  याच आठवडय़ात अवकाश सफर घडवून आणण्यात उत्सुक असणाऱया व्हर्जिन गॅलक्टिक या दुसऱया एका कंपनीचे मालक रिचर्ड ब्रॅन्सन यांनीही अशाच पद्धतीने न्यू मेक्सिको येथून अवकाशात झेप घेतली होती. पुढच्यावषी नागरिकांना अंतराळ सफर घडवून आणण्यासाठी स्पर्धा असणाऱया या दोन प्रमुख कंपन्यांच्या मालकांमध्ये अवकाशात प्रथम जाण्याचीही स्पर्धा झाली. ब्रेझोस यांनी आपला मनसुबा आधी जाहीर केला असताना ब्रॅन्सन यांनी घाईघाईने त्यांच्या आधी अवकाशवारी पूर्ण करून भविष्यातील स्पर्धेची चुणूक दाखवून दिली. या दोन्ही कंपन्यांमार्फत पुढच्या वषी दोन ते तीन लाख डॉलर खर्च करण्याची तयारी असणारे लोक अंतराळ सफरीला पाठवले जातील. जेफ बेझोस यांच्या कंपनीची सहाशे तिकिटे आताच खपली असून रिचर्ड यांच्या कंपनीनेही चारशे उड्डाणे पुढील वषी करण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. यामध्ये एका वेळी चार ते आठ प्रवासी त्यांच्या अग्निबाणयुक्त विमानातून उड्डान करतील. बेझोस यांच्या कॅप्सूल मधून एकावेळी तेवढेच प्रवासी अवकाशात झेपावू शकतील आणि अंतराळात पोहोचून चंद्रावरील किंवा अवकाशातील जीवन काही मिनिटे अनुभवून पुन्हा पृथ्वीवर पोहोचू शकतील. बेझोस आणि रिचर्ड यांच्या बरोबरीनेच इलॉन मस्क यांची एक कंपनी एक लाख पंचवीस हजार डॉलरमध्ये म्हणजे पहिल्या दोघांच्या पेक्षाही कमी दरात लोकांना अवकाशात घेऊन जाण्यास उत्सुक आहे. त्यांची सुध्दा तीनशे तिकिटे आतापर्यंत विक्री झालेले आहेत. अंतराळ क्षेत्रांमध्ये अमेरिका आणि रशियाची स्पर्धा संपूर्ण जगाने अनुभवली आहे. मात्र जगभरातील खासगीकरणाच्या वाऱयाने या क्षेत्रात खाजगी भांडवलदारांना ही उतरण्याची संधी मिळाली आणि नासाच्या मदतीने त्यांनी अवकाश सफर घडवण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून योजना आखल्या. त्या आता प्रत्यक्षात उतरू लागल्या आहेत. जलद बावन्न वर्षांमध्ये झालेली ही आगळीवेगळी प्रगती खाजगीकरणाच्या मदतीने अधिक गतीने पुढे सरसावू लागली आहे. या खाजगी मोहिमांचा परिणाम काय होणार हे भविष्यात स्पष्ट होईलच. मात्र जगभरातील अनेक लोक या सफरीसाठी उत्सुक आहेत. बेजोस यांच्याबरोबर त्यांचा भाऊ आणि इतर दोघेही न्यू शेफर्ड अग्निबाणातून प्रवास करते झाले तेव्हा त्यामध्ये ऑलिव्हर डायमेन हा अवकाशात जाणारा सर्वात तरुण ठरलेला भौतिक शास्त्राचा विद्यार्थीही होता. त्याचा प्रवेश मुळात आश्चर्यकारक होता. एका अज्ञाताने सार्वजनिक लिलावात 28 दशलक्ष डॉलर्सची बोली लावून प्रवासाची इच्छा दर्शवली होती. मात्र ऐनवेळी त्याला वेळ मिळाला नसल्याने त्या जागी हा एक अब्जाधीशाचा मुलगा प्रवास करू शकला. यावरूनच या प्रवासासाठी मोठय़ा प्रमाणावर पैसेवाल्या मंडळींची चढाओढ सुरू असल्याचे दिसून येते. कंपन्यांनी केलेली गुंतवणुकीच्या परताव्यासाठी त्यांना अशा मोहिमा काढाव्या लागणार आहेत. त्यासाठी जितकी स्पर्धा होईल तितका त्यांचा नफा वाढणार आहे. भविष्यात हा प्रवास सर्वसामान्यांनाही परवडेल का? यावरही आता खल सुरू झाला आहे.  भारतात सुद्धा हवाई चप्पल वापरणारे हवाई प्रवास करू शकतात हे सिद्ध झाले. त्यामुळे अशा पद्धतीच्या अवकाशवारीला आपण नाही तर आपल्या पुढच्या पिढीतील कोणी जाऊ शकतील असा आशावाद बाळगण्यास हरकत नसावी. नासा ज्या पद्धतीने तांत्रिक प्रगती करत पुढे गेले आहे त्याच पावलावर पाऊल टाकत भारताच्या इस्रोनेही प्रगती साधलेली आहे. अवकाशात उपग्रह सोडणे जगातील अनेक देशातून परवडत नसताना ते भारतातून पाठवण्याच्या बाबतीत भारतीय संस्था जगाशी स्पर्धा करत आहे. अत्यंत अचूक अशा मोहिमा राबवून अनेक उपग्रह ठरलेल्या वेळांमध्ये प्रक्षेपित करून भारताने या क्षेत्रातही आघाडी घेतलेली आहेच. रशियाच्या मदतीने राकेश शर्मा यांना अवकाशवारीची संधी लाभली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तिथून भारत कसा दिसतो? असा प्रश्न विचारला आणि राकेश शर्मा यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ असे उत्तर दिले. नासाच्या मोहीमांमधून भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांनीही अवकाशात भरारी घेतली. कल्पना चावला यांच्या यानाला दुर्दैवाने अपघात घडला. मात्र आता खाजगी मोहिमांमध्येही भारतीय मुलींचा सहभाग स्पष्टपणे जाणवू लागला आहे. याच वषीच्या डिसेंबर महिन्यात भारताचे मानवरहित गगनयान मोहिमेवर निघणार आहे. त्याच्या यशस्वीते नंतर भारत ही मानवी मोहिमांसाठी सज्ज होऊ शकेल. सध्याच्या  परिस्थितीमध्ये भारत सरकार आणि भारतीय खाजगी कंपन्या यामध्ये फार मोठी घोषणा करू शकणार नाहीत. मात्र गगनयान मोहिमेनंतर भारताला सुयोग्य गुंतवणूकदार मिळण्यात अडचण राहणार नाही अशी अपेक्षा आपण नक्कीच व्यक्त करू शकतो. या स्वप्नांनीच भारताला या क्षेत्रात एक उगवती शक्ती बनवले आहे. बडय़ा राष्ट्रांच्यापेक्षा कमी खर्चात अचूक प्रगती साधणारा देश म्हणून भारताची जी ओळख निर्माण झाली आहे ती ओळख भारताला भविष्यात या स्पर्धेत नक्कीच उतरवेल. नफा-तोटा पत्रक डोळय़ासमोर ठेवून काम करणाऱया कंपन्या अशा संधीच्या शोधात असतात. गगनयान यशस्वीतेनंतर भारतालाही ती संधी मिळावी आणि सर्व भारतीयांचे अवकाश सफरीचे स्वप्न नजीकच्या भविष्यात सत्यात उतरावे याच यानिमित्ताने सदिच्छा!

Related Stories

असाध्य ते साध्य…

Patil_p

एका संशोधनाचा अपमृत्यू (2)

Omkar B

ड्रगमाफियांची पाळेमुळे उखडण्याची गरज

Patil_p

तैसी नव्हेसि तूं रुक्मिणी

Patil_p

ग्राम पंचायत यंत्रणा-खरेच असे घडते काय?

Patil_p

विरोधक पडले तोंडघशी !

Patil_p
error: Content is protected !!