तरुण भारत

ऑलिम्पिक उद्घाटनाचा क्षण दिलासादायी असेल

आयोजन समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांची उत्कट प्रतिक्रिया, बरेच अडथळे पार करत उद्यापासून टोकियोत क्रीडामहोत्सवाला प्रारंभ

टोकियो / वृत्तसंस्था

Advertisements

टोकियो 2020 ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा हा आनंद व दिलासा देणारा असेल, अशी उत्कट प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी दिली. तब्बल वर्षभर उशिराने टोकियोतील ऑलिम्पिकला उद्यापासून (शुक्रवार दि. 23) सुरुवात होत असून त्यापूर्वी सॉफ्टबॉल व फुटबॉलच्या पहिल्या फेरीतील काही सामने बुधवारी संपन्न झाले.

‘आपण सर्वच जण ऑलिम्पिकची प्रदीर्घ कालावधीपासून प्रतीक्षा करत होतो. अगदी ऍथलिट्ससाठी देखील हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. उद्घाटन सोहळय़ापर्यंतचा हा प्रवास अर्थातच खडतर स्वरुपाचा होता’, असे बाक याप्रसंगी म्हणाले. 2032 ऑलिम्पिक यजमानपद मिळवणाऱया ऑस्ट्रेलियन पथकातील काही पदाधिकारी यावेळी बाक यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत हजर होते.

जिल बिडेनही जपानमध्ये येणार

टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या पत्नी जिल बिडेन जपानला भेट देणार आहेत. ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळय़ात त्यांची विशेष उपस्थिती असणार आहे. फर्स्ट लेडी या नात्याने त्यांचा हा पहिलाच वैयक्तिक आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. फर्स्ट लेडी टोकियोतील योकोता एअर फोर्स बेसवर गुरुवारी दुपारी उतरतील आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा व त्यांच्या पत्नी मॅरिको सुगा यांच्यासमवेत डिनर घेतील.

ऑलिम्पिक यजमानपद भूषवणारे टोकियो शहर सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे आणीबाणीत आहे. बुधवारी ऑलिम्पिकला जेमतेम 2 दिवसांचा कालावधी बाकी असताना दिवसभरात टोकियोत 1832 नवे रुग्ण आढळून आले होते. ऑलिम्पिकसाठी चाहत्यांना प्रवेश दिला जाणार नाही, हे आयोजकांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

सॉफ्टबॉल, फुटबॉलच्या पहिल्या फेरीतील सामन्यांना प्रारंभ

फुकुशिमा ः अमेरिकेने ऑलिम्पिक सॉफ्टबॉलचे सुवर्ण पुन्हा पटकावण्याच्या मोहिमेला बुधवारी यशस्वी सुरुवात केली असून पहिल्या फेरीतील लढतीत त्यांनी इटलीचा 2-0 असा पराभव केला. 38 वर्षीय डावखुरी ऍथलिट कॅट ओस्टरमनने या विजयात मोलाचा वाटा उचलला. 2008 ऑलिम्पिक खेळलेले दोनच खेळाडू अमेरिकन महिला संघात यंदाही कायम असून त्यात कॅटचा आवर्जून समावेश होतो.

पहिल्या फेरीतील अन्य सामन्यात यजमान जपानने ऑस्ट्रेलियाचा 8-1 असा धुव्वा उडवला तर कॅनडाने मेक्सिकोचा 4-0 असा फडशा पाडला. यजमान जपानच्या विजयात युकिको युनोने सिंहाचा वाटा उचलला. हा सामना प्रेक्षकांविना पार पडला. टोकियोतील मुख्य ऑलिम्पिक केंद्रापासून 150 मैल अंतरावर या लढतीचे आयोजन केले गेले. 30 हजार प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियमवर या सामन्यासाठी केवळ 50 जण उपस्थित होते.

मार्टाचे दुहेरी गोल, ब्राझीलकडून चीनचा धुव्वा

रिफू ः ब्राझीलने महिला फुटबॉलच्या पहिल्या फेरीतील लढतीत चीनचे आव्हान 5-0 असे संपुष्टात आणले. या लढतीत मार्टाने पाच सलग ऑलिम्पिकमध्ये गोल नोंदवण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला. मार्टाने सलग दोन गोल करत चीनच्या आव्हानातील हवा काढून घेतली. ब्राझील सध्या जागतिक मानांकनात 7 व्या स्थानी विराजमान आहे. देबिन्हा, आंद्रेसा ऍल्वेस व बिर्तिज यांनीही प्रत्येकी 1 गोल केला.

स्वीडनची अमेरिकेवर मात

अन्य एका लढतीत, स्वीडिश महिला संघाने अमेरिकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. अमेरिकन संघ सध्या जागतिक मानांकन यादीत अव्वलस्थानी विराजमान आहे. मात्र, येथे ते आपल्या लौकिकाला साजेसा खेळ साकारु शकले नाहीत. स्वीडनने यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये देखील अमेरिकेला जोरदार धक्का दिला होता. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी धक्का दिल्यामुळेच अमेरिकेचे त्या ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले होते. स्वीडनसाठी टोकियोतील हे सातवे ऑलिम्पिक असून अमेरिकेने या इव्हेंटमध्ये सर्वाधिक 4 सुवर्ण जिंकले आहेत. वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता ऑलिम्पिक सुवर्णही जिंकण्याचे त्यांनी लक्ष्य समोर ठेवले आहे. आता पुढील फेरीत स्वीडनची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर अमेरिकेची लढत न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. साखळी फेरीअखेर प्रत्येक गटातील 2 अव्वल संघ बाद फेरीत पोहोचतील.

भारतीय हॉकी संघ 4 दशकांचा दुष्काळ संपुष्टात आणेल ः प्रशिक्षक रीड

नवी दिल्ली ः टोकियो ऑलिम्पिकच्या माध्यमातून भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमधील 4 दशकांपासून चालत आलेला पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणेल, असा विश्वास संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी व्यक्त केला. भारतीय संघ आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा दि. 24 जुलै रोजी न्यूझीलंडविरुद्ध करेल.

‘मागील 16 महिने खूपच कठीण स्वरुपाचे होते. यामध्ये मनोधैर्य, संयम या सर्वाची कसून पारख झाली. भारतीय खेळाडू खंबीर आहेत. ते ज्या प्रतिकूल स्थितीतून आले आहेत, ते ही प्रेरणादायी आहे’, असे रीड याप्रसंगी म्हणाले.

जागतिक मानांकन यादीत भारतीय हॉकी संघ सध्या चौथ्या स्थानी विराजमान असून भारतीय संघ पोडियम फिनिशसाठी फेवरीट मानला जातो. भारताने हॉकीत पदक जिंकण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले तर यामुळे 4 दशकांपासून चालत आलेला पदकाचा दुष्काळ संपुष्टात येईल. हॉकीत भारताचे शेवटचे पदक 1980 मॉस्को ऑलिम्पिकमधील असून त्यानंतर संघाची पाटी कोरी राहिली आहे. 57 वर्षीय रीड मागील 2 वर्षापासून प्रशिक्षपदाची जबाबदारी सांभाळत आले आहेत.

आणखी दोन खेळाडू कोरोनाच्या विळख्यात

टोकियो ः चिली तायक्वांदोपटू फर्नांडा ऍग्युरे व डच स्केटबोर्डर कॅन्डी जेकब्ज यांना कोरोनाची बाधा झाली असून यामुळे ते यंदाच्या ऑलिम्पिकमधून बाहेर फेकले गेले आहेत. ऍग्युरेचा विमानतळावरच पॉझिटिव्ह अहवाल आला तर जेकब्जच्या चाचणीचे अहवाल गेम्स व्हिलेजमधून पॉझिटिव्ह आले.

ऍग्युरे ही उझ्बेकिस्तानमधून टोकियोत दाखल झाली होती. उझ्बेकमधून निघताना ती निगेटिव्ह होती. मात्र, येथे पोहोचल्यानंतर विमानतळावर घेण्यात आलेल्या चाचणीत तिला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले. ऍग्युरे व जेकब्ज यांच्यापूर्वी ऑलिम्पिक पात्र 5 ऍथलिटना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील तिघे जण ऑलिम्पिक व्हिलेजमध्येच वास्तव्यास होते. बुधवारी ऑलिम्पिकशी संबंधित कोरोनाग्रस्तांची संख्या 75 वर पोहोचली.

उद्घाटन सोहळय़ासाठी ब्रिटनचे फक्त 30 ऍथलिट

टोकियो ः ऑलिम्पिक उद्घाटन सोहळय़ात ब्रिटनचे 376 पैकी फक्त 30 ऍथलिट उपस्थित राहतील, असे वृत्त आहे. कोरोना प्रतिबंधक खबदारी म्हणून ग्रेट ब्रिटनने हा निर्णय घेतला. एरवी या संघाचे किमान 200 ऍथलिट उद्घाटन सोहळय़ात हजर होत आले आहेत. यंदा मात्र प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केवळ 30 ऍथलिटच देशाचे प्रतिनिधीत्व करतील, असे चित्र आहे. उद्घाटन सोहळय़ासाठी ध्वजवाहक कोण असतील, हे देखील ब्रिटनने अद्याप जाहीर केलेले नाही. उद्घाटन सोहळय़ाला केवळ 1 हजार पदाधिकाऱयांची उपस्थिती असणार आहे.

बॉक्स

भारतीय पथकातील फक्त 6 पदाधिकारी हजर राहणार

टोकियो ः शुक्रवारी होणाऱया टोकियो ऑलिम्पिक सोहळय़ात भारतीय पथकातील फक्त 6 पदाधिकारी हजर राहतील, असे भारतीय ऑलिम्पिक पथकाचे उपप्रमुख प्रेम कुमार वर्मा यांनी जाहीर केले. ज्या ऍथलिट्सचे शनिवारीच इव्हेंट आहेत, त्यांना शुक्रवारी होणाऱया उद्घाटन सोहळय़ात भाग घेतल्यास यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. त्यामुळे, ते ही यात सहभागी नसतील, असे वर्मा म्हणाले. नेमबाज, मुष्टियोद्धे, तिरंदाज व पुरुष-हॉकी संघांचे काही सामने उद्घाटन सोहळय़ानंतरच असणार आहेत.

भारतीय पथकात यंदा 127 ऍथलिट समाविष्ट असून पदाधिकारी, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफमधील सदस्यांसह ही संख्या 228 वर पोहोचते. उद्घाटन सोहळय़ात भारतीय पथकात हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग व सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोम हे ध्वजवाहक असणार आहेत.

बॉक्स (21 एसपीओ 16-भारतीय नेमबाज)

भारतीय एअर रायफल संघाला केवळ 20 मिनिटांचा सराव!

टोकियो ऑलिम्पिकला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी बाकी असताना भारताच्या 10 मीटर्स एअर रायफल शूटर्सना टाईम स्लॉट इश्यूमुळे दिवसभरात केवळ 20 मिनिटे सराव करता आला. अपूर्वी चंदेला व इलावेनिलचा यात प्राधान्याने समावेश राहिला. या दोघींचे इव्हेंट शनिवारी होत आहेत. सर्व देशांचे नेमबाज एकाच ठिकाणी सराव करत असल्याने ही अडचण निर्माण झाली असल्याचे भारतीय राष्ट्रीय रायफल फेडरेशनने नमूद केले. पुरुष 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये दीपक कुमार व दिव्यांश सिंग पनवर हे देखील भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

Related Stories

जोकोविच नवव्यांदा ऑस्ट्रेलियात अजिंक्य

Patil_p

निशीकोरी, डिमिट्रोव्ह, सिलीक दुसऱया फेरीत

Patil_p

2011 वर्ल्डकप फायनलला ‘क्लीन चीट’

Patil_p

दीपक पुनियाची पोलंड ओपनमधून माघार

Patil_p

प्रेंच फुटबॉल लीगचे जेतेपद लेयॉन संघाला

Patil_p

आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राही सरनोबतला सुवर्णपदक

triratna
error: Content is protected !!