तरुण भारत

नारायण नाईक यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी वास्कोत एका हल्लेखोराला अटक

प्रतिनिधी / वास्को

सांकवाळ येथील आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या दोघां हल्लेखोरांपैकी खलील फकीर (22) याला गुरूवारी सकाळी मुरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी त्याला खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हय़ाखाली अटक केलेली असून त्याचा साथीदार इस्माईल शेख उर्फ कब्बू मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

Advertisements

सांकवाळ येथील नारायण नाईक यांच्यावर वीस दिवसांपूर्वी सांकवाळ पंचायत इमारतीसमोरच चेहरा झाकून आणि रेनकोट घालून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी लोखंडी सळई आणि पाईपने हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यासोबत असलेल्या एका मित्राने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने नारायण नाईक बचावले. हल्लेखोरांनी नारायण नाईक व त्याच्या मित्राला पिस्तुलाचा धाक दाखवून घटनास्थळावरून दुचाकीवरून पळ काढला होता. मात्र, घटनास्थळावरून पळताना त्यांचा एक मोबाईल त्या ठिकाणी पडला होता. हा फोन पोलिसांच्या हाती लागल्याने या हल्ल्याचे बिंग फुटले होते. या हल्ल्याच्या घटनेचा तपास सध्या गुन्हा अन्वेषण विभाग करीत आहे.

प्रारंभी वेर्णा पोलिसांनी या घटनेचा तपास करताना त्या फोनच्या आधारे झुआरीनगरातील राम गोपाल यादव उर्फ करीय्या याला या प्रकरणी अटक केली होती. तो सापडलेला फोन वास्कोतील कुप्रसिध्द इस्माईल शेख उर्फ कब्बू याचा होता. कब्बू आणि करीय्याचा फोनवर संवाद झाला होता. करीय्याला अटक केल्यानंतर त्याने आपणच या हल्ल्याची सुपारी कब्बू व खलील फकीर याला दिल्याची कबुली दिली होती. त्यामुळे हल्लेखोर कोण हे उघडकीस आले होते. परंतु त्यानंतर शोधाशोध करूनही ते हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यांच्याविरूध्द गुन्हे अन्वेषण विभागाने लुटआऊट नोटीसही जारी केली होती.

खलील फकीर गस्तीवरील पोलिसांच्या तावडीत कब्बूचा साथीदार खलील फकीर हा गुरूवारी सकाळी सहाच्या सुमारास मुरगाव पोलिसांच्या तावडीत सापडला. मुरगाव पोलीस गस्तीवर असताना वास्को सडा मार्गावरील सिने एलमोंत थिएटरजवळ तो आढळून आला. मुरगाव पोलिसांनी त्याला गुन्हा अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिले आहे. गुन्हा करून अटक चुकवण्यासाठी एवढे दिवस भूमीगत राहिलेल्या खलील याला खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हय़ाखाली गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. मात्र, त्याचा मुख्य साथीदार कब्बू पोलिसांच्या हाती लागलेला नाही. खलील वास्कोतच सापडल्याने कब्बूही वास्कोतच कुठे तरी लपलेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. करीय्या याने आपणच नारायण नाईक यांच्यावर हल्ल्यासाठी त्या दोघांना सुपारी दिली होती अशी कबुली दिलेली असली तरी या हल्ल्य़ामागे वेगळाच सुत्रधार असण्याच्या शक्यतेने पोलीस तपास करीत आहेत. दोघांपैकी एका हल्लेखोराला अटक झाल्याने पोलीस तपासात त्याची मदत होणार आहे. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वेष कर्पे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

गोवा आरोग्य सेवेचे सशस्त्रदलाकडून अभिनंदन

Omkar B

वाळपईतील बेकायदेशीर मासेविक्री बंद न केल्यास पालिका इमारतीसमोर मासे विकू

Patil_p

अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला मदत योजनेचा लाभ जनतेने घ्यावा

Patil_p

भाजप राज्य कार्यकारिणीची रविवारी महत्त्वपूर्ण बैठक

Amit Kulkarni

आयआयटी विरोधात पुन्हा एल्गार

Patil_p

फोंडा नगराध्यक्षपदी मगोच्या गीताली तळावलीकर

Amit Kulkarni
error: Content is protected !!