तरुण भारत

वरुणराजा,आवर रे,सावर रे!

मागील वषीपेक्षा यंदा पावसाने केला कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला, रस्ते गेले पाण्याखाली, स्मार्ट सिटीच्या नावाने शिमगा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मागील काही महिन्यांपासून कोरोनामुळे शहरवासीय हैराण झाले होते. कोरोना बाधितांची संख्या कमी होत असतानाच आता जोरदार पावसाला सुरूवात झाली असून, बेळगाव शहर, तालुका, खानापूर शहरासह तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. परिणामी नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पावसाचे पाणी अनेकांच्या घरात घुसल्यामुळे घरातील साहित्य पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी अक्षरशः ‘वरुण राजाकडे आता पुरे कर रे बाबा’, म्हणून हात जोडले. बऱयाचवेळा पाऊस दडी मारतो तेव्हा ‘पाऊस हवासा’ वाटतो. मात्र ‘असा पाऊस नको रे बाबा’, म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. केवळ रात्रीमध्ये 145.4 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. केवळ दहा तासातील ही नोंद विक्रमी आहे.

यंदा कोरोना नियंत्रणासाठी मनपा प्रशासन कार्यरत राहिल्याने नाला स्वच्छता व इतर कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे बेळगाव शहरातील विविध भागात गटारी तुंबल्याचे चित्र पहावयास मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. विशेषतः नाल्यांच्या काठावरील उपनगरांमध्ये पाणी शिरले असून, मराठा कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, नानावाडी, गजानन महाराज नगर, एम. जी. कॉलनी मण्यार लेआऊट टिळकवाडी, चौगुलेवाडी, पारिजात कॉलनी, केशवनगर वडगाव, अन्नपूर्णेश्वरी नगर, बाळकृष्ण नगर, गुड्सशेड रोड, महाद्वार रोड अशा विविध परिसरातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आहे. खबरदारीच्या उपाययोजनाही राबविण्यास सुरूवात झाली आहे. 

प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांचे स्थलांतर

प्रत्येक पावसाळय़ात इंद्रप्रस्थनगरमध्ये पाणी शिरते. या परिसरात मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळय़ाच्या तोंडावर हे काम हाती घेण्यात आले असून अशातच पावसाचा जोर वाढला असल्याने धोका निर्माण झाला आहे. रामेश्वर तीर्थपासून रेल्वे उड्डाणपुलापर्यंत पाणीच पाणी झाले असून, कर्नाटक गृह निर्माण खात्याच्या इमारतीमध्ये तसेच येथील शेकडो घरांमध्ये व काही तळघरांमध्ये पाणी भरले आहे. याठिकाणी खासगी रुग्णालय असून, रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांचे स्थलांतर करण्यासाठी जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी व  अग्निशमन दलाने धाव घेतली आहे. यशोधा हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या दोन महिलांचे शुक्रवारी सकाळी अन्य रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले.

गजानन महाराजनगरमधील रस्त्यावर दीड फूट पाणी

गजानन महाराजनगर, मण्यार लेआऊट, शांती कॉलनी अशा विविध भागात पावसाचे पाणी शिरते. दरवषी ही समस्या निर्माण होते. नाल्याचे बांधकाम झाले नसल्याने पावसाच्या पाण्याचा फटका नागरिकांना बसत होता. पण आता नाल्याचे बांधकाम केल्यानंतरही पाणी गजाननमहाराजमधील रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले.

 येथील घरांमध्ये पाणी शिरले असून, रस्त्यावर दोन फुटाहून अधिक पाणी वाहत होते. त्यामुळे रहिवाशांना घरामध्येच रहावे लागले.  चौगुलेवाडीतदेखील पाणी शिरल्याने येथील रहिवाशांचे कैवल्य योग मंदिरात स्थलांतर करण्यात आले. मराठा कॉलनी, एम. जी. कॉलनी अशा विविध भागात पाणी शिरले असून, संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

कपिलेश्वर कॉलनीसह महाद्वाररोडचे रस्ते पाण्यामुळे बंद

कपिलेश्वर कॉलनीतील प्रत्येक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. तसेच महाद्वाररोड तिन्ही क्रॉसच्या रस्त्यावर पाणी आले आहे. जवळच असलेला नाला पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने गटारीमधल्या पाण्याचा निचरा होत नाही. या परिसराला बॅक वॉटरचा फटका बसला आहे. परिणामी महाद्वाररोड येथे तिसऱया क्रॉसच्या निम्म्या गल्लीपर्यंत पावसाचे पाणी साचून आहे. त्यामुळे महाद्वाररोड कपिलेश्वर कॉलनीतील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस बंद झाला होता.

पुराच्या धास्तीमुळे वाहनांच्या रांगा काँग्रेसरोडवर

  मराठा कॉलनीतील प्रवेशद्वारावर पंचामृत हॉटेल शेजारील रस्त्यावर दीड फूट पाणी आले होते. पावसाचा जोर पाहून मराठा कॉलनी, महात्मा गांधी कॉलनी, स्वामी विवेकानंद कॉलनी अशा विविध भागातील रहिवाशांनी आपल्या दुचाकी व चारचाकी वाहने काँग्रेस रोडवर पार्क केली होती. मागील वषी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले तसेच घरांमध्ये पाणी शिरून वाहने पाण्याखाली गेली होती. येथील असंख्य वाहने नादुरूस्त झाली होती. याची दक्षता घेऊन नागरिकांनी यावेळी खबरदारी म्हणून सर्व वाहने काँग्रेस रोडवर पार्क केली होती. त्यामुळे काँग्रेस रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

खड्डा कुठे अन्…. रस्ता कुठे ?

नानावाडी रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ामधून कसरत करीत वाहनधारकांना ये-जा करावी लागत होती. अशातच गुरुवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्त्यावर दीड फूट पाणी आले होते. नानावाडी रोडशेजारी असलेला नाला तुडूंब भरून रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत होते. त्यामुळे खड्डा कुठे अन् रस्ता कुठे असा प्रश्न वाहनचालकांसमोर निर्माण झाला होता.  एरवी नानावाडी परिसरातील शिवाजी पुतळय़ासमोर पाणी साचते पण यावेळी पावसाच्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने नानावाडी रोड अर्धा किलोमिटर पाण्याखाली गेला होता. ,

मराठा कॉलनीत पाणी शिरण्यास आरओबीचे पूल कारणीभूत

मराठा कॉलनी, नानावाडी, स्वामी विवेकानंद कॉलनी, एम. जी. कॉलनी, फायरिंग रेंज, मंडोळी रोड, टिळकवाडी, अशा विविध परिसरातील पावसाचे पाणी नाल्यामधून वाहत असते. हा नाला केवळ पाच फूट रुंदीचा आणि चार फूट खोल आहे. नानावाडीकडून वाहणारा नाला  गोगटे चौकातील बसवेश्वर उड्डाणपुलाखालून गुड्सशेडरोड मार्गे शास्त्रीनगरमधून वाहतो. नानावाडीपासून काँग्रेस रोडपर्यंत नाल्याचे बांधकाम झाले आहे. पण काँग्रेसरोडपासून रेल्वे उड्डाणपूल आणि रेल्वे मार्गाच्या खाली नाल्याचे बांधकाम करण्यात आले नाही. तसेच रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करताना नाल्याच्या पुलाची रुंदी कमी करण्यात आली आहे. केवळ 5 फूट रुंदी ठेवण्यात आल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. पुलाखाली पाणी साचून त्याचा फटका मराठा कॉलनी परिसराला बसत आहे. त्यामुळे मराठा कॉलनी व नानावाडीत पूर परिस्थिती निर्माण होण्यास उड्डाणपुला खालील नाल्याच्या पुलाची रुंदी कारणीभूत ठरत आहे.

अन् गटार स्वच्छ करण्यासाठी मनपा अधिकाऱयांचे डोळे उघडले

पूर परिस्थिती निवारणासाठी विविध युवक मंडळाचे कार्यकर्ते तसेच महापालिकेचे अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान शुक्रवारी सकाळपासूनच कार्यरत झाले होते. ठिकठिकाणी मदतकार्य करून अडचणीत सापडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत होते. पावसाचे पाणी अडलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात येत होती. शिवाजी कॉलनी परिसरात गटार तुडुंब भरल्याने सांडापाणी रस्त्यावरून वाहत होते. याबाबत सातत्याने तक्रार करूनही मनपाच्या अधिकाऱयांना जाग आली नाहे. पावसाचे पाणी साचल्याने मनपाच्या अधिकाऱयांचे डोळे उघडले आहेत. शुक्रवारी सकाळी  गटारीमध्ये साचलेला कचरा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

बळ्ळारी नाल्याला पुन्हा महापूर

बळ्ळारी नाल्यासाठी अनेकवेळा शेतकऱयांनी आंदोलने केली. बळ्ळारी नाल्यामुळे गेली साठ ते पासष्ट वर्षे तालुक्मयातील शिवाराला मोठा फटका बसत आहे. हा नाला म्हणजे शेतकऱयांना एक शापच ठरला आहे. या नाल्याच्या खोदाईसाठी बऱयाचवेळा निधीची तरतूद करण्यात आली. मात्र कंत्राटदाराच्या चुकीमुळे तो निधी वाया गेला आहे. उन्हाळय़ापूर्वी खोदाई करावी अशी मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा या नाल्याला महापूर आला आणि जवळपास हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली. 

Related Stories

‘जलसंजीवन’ योजना शेतकऱयांना ठरली जीवनदायिनी

Omkar B

लॉगर, अर्जुन स्पोर्ट्स संघ विजयी

Amit Kulkarni

कराटे स्पर्धेत संत मीरा मराठी शाळेचे यश

Amit Kulkarni

बागायत खात्यामार्फत मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण

Omkar B

वाचनालय बचाव समितीची याचिका न्यायालयाने फेटाळली

Patil_p

धारवाड झोन सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा आजपासून

Amit Kulkarni
error: Content is protected !!