तरुण भारत

वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानूला रौप्यपदक

प्रथमच मिळविले ऐतिहासिक यश, मल्लेश्वरीनंतर पदक पटकावणारी भारताची दुसरी महिला

वृत्तसंस्था/ टोकियो

Advertisements

भारताची महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूने ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना दोन दशकानंतर वेटलिफ्टिंगचे पहिले रौप्यपदक भारताल मिळवून दिले. 49 किलो वजन गटात तिने हे यश मिळविले. पाच वर्षापूर्वी तिला या स्पर्धेत अपयश आल्याने अश्रू ढाळत तिने प्लॅटफॉर्म सोडले होते. पण यावेळी त्याची कसर भरून काढत अभिमानास्पद कामगिरी करून स्वप्नही साकार केले. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी ती भारताची दुसरी महिला वेटलिफ्टर आहे.

मणिपूरच्या चानूने एकूण 202 (87 व 115) किलो वजन उचलत दुसरे स्थान मिळविले आणि 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकमध्ये करणम मल्लेश्वरीच्या कामगिरीला मागे टाकले. मल्लेश्वरीने त्यावेळी कांस्यपदक पटकावले होते. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये चानूला वजन उचलण्याच्या एकाही प्रयत्नात यश मिळाले नव्हते. त्यामुळे ती पूर्ण निराश झाली होती. मात्र यावेळी निर्धाराने प्रदर्शन करीत ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न अखेर साकार केले. ‘गेल्या पाच वर्षापासून पदक जिंकण्याचे स्वप्न बाळगले होते, ते आज साकार करता आले याचा खूप आनंद होतो. मला या कामगिरीचा अभिमानही आहे. सुवर्ण जिंकण्याचाच माझा प्रयत्न होता, पण रौप्यपदकाची कामगिरीही माझ्यासाठी मोठे यश आहे,’ अशा भावना तिने व्यक्त केल्या.

गेल्या काही महिन्यांपासून तिचे अमेरिकेत ट्रेनिंग सुरू होते. पाच वर्षापूर्वीचे अपयश तिच्या मनाला खूपच लागले होते. मोठय़ा स्टेजवर उडालेल्या गोंधळाबद्दल तिने नंतर बोलले होते. यावर तिने मार्गदर्शन घेतले आणि यावेळी पूर्ण विश्वासाने उतरत पदक जिंकण्यात तिने कोणतीही कसर सोडली नाही. भारतासाठी यावेळी पहिले पदक मिळवून दिल्याबद्दलही तिने आनंद व्यक्त केला. मी फक्त मणिपूरची नसून संपूर्ण देशाची आहे, असे तिने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तिच्या चेहऱयावर नेहमी हास्य असते, ते आजही विलसत होते आणि विशेष लक्षवेधी ठरल्या त्या तिच्या ऑलिम्पिक रिंगच्या आकाराच्या इयररिंग्स. तिच्या आईने तिला या इयररिंग्स भेट दिल्या होत्या.

झिहुईला स्पर्धाविक्रमासह सुवर्ण

या क्रीडाप्रकाराचे सुवर्णपदक चीनच्या होऊ झिहुईने पटकावले. तिने एकूण 210 किलो (94 व 116) वजन उचलले. स्नॅच, क्लीन व जर्क, एकूण या तिन्हीमधील हा नवा ऑलिम्पिक विक्रम आहे. इंडोनेशियाच्या ऐसाह विन्डी कान्तिकाने एकूण 194 किलो (84 व 110) वजन उचलत कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेआधी झालेल्या विविध स्पर्धांतील वीकनेस लक्षात घेत चानूने प्रथम 84 किलो वजन उचलले. त्यात यश आल्यावर दुसऱया प्रयत्नात तिने 87 किलो वजन यशस्वीरीत्या उचलल्यानंतर तिने 89 किलोसाठी प्रयत्न केला. तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 88 किलोची होती आणि गेल्या वर्षी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये तिने ती नोंदवली होती. मात्र तिला 89 किलो वजन उचलण्यात यश आले नाही. झिहुईने मात्र 94 किलो वजन उचलत नवा स्पर्धाविक्रम नोंदवला. 96 किलोचा विश्वविक्रमही तिच्याच नावावर आहे.

क्लीन व जर्कमधील विश्वविक्रमधारक असणाऱया चानूने पहिल्या दोन प्रयत्नात 110 व 115 किलो वजन यशस्वीरीत्या उचलले. मात्र शेवटच्या प्रयत्नात तिला 117 किलो वजन उचलण्यात यश आले नाही. यात ती यशस्वी ठरली असती तर नवा ऑलिम्पिक विक्रम नोंद झाला असता. मात्र तिने जी कामगिरी नोंदवली, ती भारताला पदक मिळवून देण्यास पुरेशी ठरली. पदक जिंकल्याचे जाहीर झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांना आलिंगन देत आनंद साजरा केला. नंतर तिने पंजाबी भांगडा डान्स करीत जल्लोषही केला.

पदक स्वीकारताना तिने मास्क घातला असला तरी त्यातूनही तिचे हास्य लपले नव्हते. कोव्हिडमुळे आयोजकांनी स्पर्धकांसाठी प्रोटोकॉल निश्चित केले आहेत. त्यानुसार विजयी स्पर्धकांनी सोशल डिस्टन्स पाळणे आणि गुप फोटो टाळणे आवश्यक होते. पण तीनही विजयी स्पर्धकांना याचा विसर पडला आणि त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले आणि गुप फोटोसाठीही एकत्र उभ्या राहिल्या. एका पदाधिकाऱयाने त्यांना नियमाची आठवण करून दिल्यावर त्या एकमेकीपासून दूर झाल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर चानू फायटर वेटलिफ्टर म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत वर्ल्ड  चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण, राष्ट्रकुलमध्ये दोन पदके (रौप्य व सुवर्ण) आणि आशियाई कांस्यपदक मिळविले आहे. त्यात आता ऑलिम्पिक पदकाची भर पडली आहे.

पंतप्रधान मोदी व मान्यवरांकडून चानूवर अभिनंदनाचा वर्षाव

मिराबाई चानूने पदक जिंकल्यानंतर देशभरात उत्साही वातावरण निर्माण झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक आजी-माजी क्रीडापटूंनी, पदाधिकाऱयांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ‘वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य जिंकल्याबद्दल अभिनंदन! तिच्या या यशाने प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळत राहील,’ असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले. विद्यमान क्रीडामंत्री अनुराग ठाकुर व माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही चानूचे अभिनंदन केले. पहिल्याच दिवशी भारताला पहिले पदक चानूने मिळवून दिले, मिराचा आम्हाला अभिमान वाटतो, असे अनुराग ठाकुर यांनी म्हटले तर रिजिजू यांनीही अशाच भावना व्यक्त करीत तिचे अभिनंदन केले.

Related Stories

अश्रफचे नाबाद अर्धशतक, नॉर्जेचे 5 बळी

Patil_p

पाकचा दक्षिण आफ्रिकेवर मालिका विजय

Patil_p

प्रतिष्ठेची ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप आजपासून

Patil_p

विश्व टेटे संघटनेचे कर्मचारी स्वतःहून कमी वेतन घेणार

Patil_p

अमेरिकन टेनिस स्पर्धेतून हॅलेपची माघार

Patil_p

भालाफेकपटू सुमित अंतिलने जिंकले दुसरे सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!