तरुण भारत

सरकारने सखोल पाहणी करून पूरग्रस्तांना भरपाई द्यावी

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची मागणी, पुरामागच्या कारणांविषयी चौकशी करावी

प्रतिनिधी/ कुडचडे

Advertisements

गेले आठ दिवस पाऊस पडत होता. त्यात गेले दोन दिवस जास्तच पाऊस पडल्यामुळे नदीचे पाणी वर चढले आणि हा पूर आला. त्यात बऱयाच जणांचे विविध प्रकारे नुकसान झालेले दिसून येत आहे. कोणाची झाडे कोसळलेली आहेत. कोणाच्या भिंती मोडलेल्या आहेत, तर कोणाच्या घरांत साठविलेले धान्य पूर्णपणे खराब झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सरकारने वरच्यावर सर्वेक्षण न करता सखोल पाहणी करून ज्या प्रकारे नुकसान झाले आहे त्याप्रमाणे भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

कारण याअगोदर राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते तेव्हा तलाठी व अन्य अधिकाऱयांनी जो अहवाल तयार केला होता त्यात लाखा-लाखाहून जास्त नुकसानाची नोंद करण्यात आली होती. पण शेवटी सदर आपत्तीग्रस्त लोकांच्या खात्यात फक्त सहा हजार रु. जमा करण्यात आले होते. त्यावेळेस आपल्या संपर्कातील व्यक्तींनी यासंबंधी प्रश्न केला होता. यावेळीही तोच प्रकार घडून लोकांना उघडय़ावर टाकू नये, असे कामत पुढे म्हणाले.

धडे, सावर्डे येथे शुक्रवारी अतिवृष्टीमुळे ज्या स्थानिकांची घरे पाण्याने भरून नुकसान झाले होते त्यांच्या घरी शनिवारी कामत तसेच दिल्लीहून आलेल्या गिरीश चोडणकर यांनी थेट जाऊन सदर कुटुंबांची भेट घेतली. सदर अचानक घडलेल्या घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले व माहिती घेतली. यावेळी सावर्डे गटाध्यक्ष श्याम भंडारी, कुडचडेचे गटाध्यक्ष पुष्कल सावंत, अमित पाटकर, प्रतीत प्रभुदेसाई, मनोहर नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

पूर का आला याची चौकशी करावी

ज्या वेळेस जनता संकटात सापडते तेव्हा सर्वांत प्रथम आपण त्यांना मदत करण्यासाठी पाऊल उचलतो. त्याचप्रमाणे युवक काँग्रेसचे सदस्य शुक्रवारी वाळपईला गेले व सर्वांना मदत केली. यापूर्वी अशी स्थिती कधी आली नव्हती अशी माहिती वाळपई येथील काही वृद्ध लोकांनी दिली. त्यामुळे राज्यात विविध भागांत अचानक नद्यांना पूर का आला यावर सरकारने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी चोडणकर यांनी केली. कारण सध्या सरकारतर्फे राज्यात नैसर्गिक सृष्टीचा नाश करून प्रकल्प राबविणे सुरू आहे. त्यामुळे हा पूर आला आहे का यादृष्टीने सर्वेक्षण केले पाहिजे. कारण सावर्डे येथे रेल्वे दुपदरीकरणाच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या पुलासाठी नदीत जो मातीचा भराव टाकण्यात आला होता तो पूल तयार झाला, तरी त्याच स्थितीत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सरकारने सोपस्कारांना प्राधान्य न देता पूरग्रस्तांना ताबडतोब मदत करावी. तसेच आज जी स्थिती आली आहे त्याप्रमाणे पुढे जनतेला त्रास होऊ नये यासाठी निसर्गाला नुकसान पोहोचविणारे प्रकल्प बंद करून टाकावेत, अशी मागणी चोडणकर यांनी केली. आज राज्यात पूरस्थिती आहे, लोक त्रासात पडलेले आहेत. त्यावर लक्ष केंद्रीत न करता भाजप आपल्या केंद्रीय नेत्यांना आणून ज्या प्रकारे उत्सव साजरे करण्यात मग्न आहे त्याचा आपण निषेध करतो, असे ते म्हणाले.

Related Stories

कोरोना सक्रिय रुग्णांवर घरीच उपचार

Amit Kulkarni

बेंगलोरचे खराब प्रदर्शन; आता ईस्ट बंगालकडून झाले पराभूत

Patil_p

ओपा पाणी प्रकल्पाची यंत्रणा निकामी

Omkar B

कचऱयाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे

Patil_p

आंसगावच्या उप-सरपंचपदी अखेर रिया नाईक बिनविरोध

Amit Kulkarni

रितेश, रॉय नाईक बंधूंचा भाजपात प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!