तरुण भारत

सांगलीत पावसाची उसंत, पुराने हाहाकार

सांगली शहरात पाणी घुसले : दीडशे गावांना तडाखा : आज पाणी उतरण्याची शक्यता
लाखावर लोकांचे स्थलांतर : 47 निवारा केंद्रे, दिवसभर पाण्याच्या पातळीत वाढ
पावसाचा पाणलोट क्षेत्रात जोर ओसरला, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ठप्प

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी सांगली शहरांसह वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यातील दीडशे गावांना महापुराने तडाखा दिला. शुक्रवारी रात्रीच कृष्णेचे पाणी सांगली शहरात शिरले. शनिवारी दिवसभरात अर्ध्याहून अधिक सांगली जलमय झाली. तर एनडीआरएफ, महापालिका आणि सेवाभावी संस्थांच्या पथकांमार्फत नागरिकांची महापुरातून सुटका करून सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. शनिवारी रात्रीपर्यंत आयर्विन पुलाची पातळी 53 फुटापर्यंत पोहोचली. आतापर्यंत लाखावर लोकांचे जनावरांसह स्थलांतर करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात 47 निवारा केंद्रातून पूरबाधितांची सोय करण्यात आली आहे. रविवारी सकाळपर्यंत सांगलीतील पाणी ओसरण्यास प्रारंभ होईल, असे सांगण्यात आले.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ठप्प (वाघवाडी फाटा)

लोकप्रतिनिधी, नेते मदतीसाठी रस्त्यावर

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गासह चार तालुक्यातील 74 रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, युवानेते विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जितेश कदम, संग्रामसिंह देशमुख यांच्यासह लोकप्रतिनिधीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

आजपासून पाण्याला उतार

शनिवारी सायंकाळी कोयना आणि वारणा धरणांसह विविध धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. तर अलमट्टी धरणातील विसर्ग शुक्रवारपासून साडेतीन लाख क्युसेक कायम आहे. त्यामुळे शनिवारी दुपारनंतर कृष्णा आणि वारणेच्या पाण्याची पातळी काही अंशी कमी होऊ लागली होती. रविवारी महापुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. महापुराच्या तडाख्याने शेती, जनावरे, बाजारपेठांचे कोटÎवधीचे नुकसान झाले आहे. शनिवारी दिवसभर महापुराच्या वाढत्या पातळीमुळे पूरबाधित गावांमध्ये हाहाकार उडाला आहे.

चार प्रभागासह शेकडो दुकाने पाण्याखाली

सांगली शहरातील चार प्रभागासह शेकडो दुकाने पाण्याखाली गेली आहे. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सकाळी सांगली शहरात पहाणी करून दिवसभर पलूस तालुक्यात महापुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि सुरक्षितस्थळी हलवण्याच्या कामावर लक्ष ठेऊन होते. पालकमंत्री जयंत पाटील यांनीही वाळवा तालुक्यातील अनेक पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. कर्नाटक सरकारशी समन्वय साधत पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्नशिल होते. सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेऊन मदत व पुनर्वसनाच्या सुचना दिल्या.

लाखांवर बाधितांना सुरक्षित स्थळी हलवले, स्वयंस्फूर्तीने मोठे स्थलांतर  

शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभरात प्रशासन, स्वयंसेवी संघटना, एनडीआरएफ यांच्या पथकांनी लाखांवर पूरबाधितांची सुटका करत त्यांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. सांगली शहरात पाच हजारांवर कुटूंबांचे स्थलांतर झाले असून 18 निवारा केंद्रे आाणि जनांवरासाठी दोन छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. वाळवा शिराळा, पलूस आणि मिरज पश्चिम भागातील 17 हजारांवर कुटूंबातील पाऊण लाख लोकांना हलवण्यात आले आहे.

प्रशासनासह विविध संस्था मदतीला

पूरबाधितांच्या सोयीसाठी एकूण 47 निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रशासनाबरोबरच विविध संस्था पूरबाधितांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या 1882 केंदामध्ये आठ हजार, सेवाभावी संस्थांच्या 85 केंद्रामध्ये साडेचारशे लोकांची सोय करण्यात आली आहे. परंतु पाऊण लाखांवर लोकांनी स्वयंस्फूर्तीने नातेवाईकांकडे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. हजारो जनावरेही सुरक्षितस्थळी हलवली आहेत.

 दीडशे गावे तीन दिवसांपासून अंधारात

 महापुराचे पाणी गावात शिरल्याने कृष्णा आणि वारणा काठावरील दीडशे गावे तीन दिवसांपासून अंधारात आहेत. महावितरण कंपनीने महापुराचे पाणी शिरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सांगलीच्या पूरग्रस्त भागासह नऊ उपकेंद्रे बंद केली असून 2100 ट्रान्सफॉर्मर पाण्यात बुडाले आहेत. महापालिका क्षेत्रातील महापुराच्या पाण्यात गेलेले 40 ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. एकूणच महापुराच्या पाण्यात 45 हजार नागरिक अंधारात आहेत. महापुराचे पाणी कमी होताच ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंत धर्मराज पेठकर यांनी दिली.

 25 हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

कृष्णा, वारणा नदीकाठातील दीडशे गावातील 25 हजारांवर शेती महापुराच्या पाण्यात बुडाली आहे. भात, सोयाबीन, ऊस आणि मोठÎा प्रमाणावर भाजीपाल्याचा समावेश आहे. या 25 हजारहून अधिक हेक्टरवरील खरीप हंगाम वाया गेला असून शेतकऱयांचे कोटÎवधीचे नुकसान झाले आहे. महापूर ओसरल्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल, अशी माहिती कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिली.

 दृष्टीक्षेपात दिवसभरातील महापुराची वाढती पाणी पातळी (टेमसी)

वेळ  कोयना पूल कराड   बहे पूल   ताकारी पूल   भिलवडी पूल आयर्विन पूल

स.7  56.03          33.04   64.10      57.05    48.10

स.9   55.06         33.02   65.00     58.00     49.03

दु.12   54.04        32.09    65.00    58.11     50.04

दु.03   52.03         32.06              64.10  59.03      51.01

सा.06  48.06        31.08   64.05    59.11     52.01       

धरणाचे नाव पाणी साठा (टीएमसी)  विसर्ग (क्युसेक)

कोयना 87.45 30240

वारणा 31.99 16840

अलमट्टी 78 350000

धोम 10.77 10420

कण्हेर 7.69 5244

Related Stories

नांद्रेतील शेतकऱ्यांनी लोकवगणीतून सुरू केले रस्त्याचे काम

triratna

सांगली : आ. मानसिंग नाईक यांच्यातर्फे शिराळा उपजिल्हा रुग्णालयास २५ ऑक्सिजनयुक्त बेड

triratna

सांगली : कडेगाव तालुक्यात मनसेमध्ये अनेकांचा पक्ष प्रवेश

triratna

पिकविम्याचा प्रश्न मंत्री जयंत पाटील यांच्या दरबारात

triratna

सांगली : कोविड सेंटरमधून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांचे पलायन

triratna

किसान आत्मनिर्भर यात्रेत सहभागी व्हा : हर्षवर्धन देशमुख

triratna
error: Content is protected !!