तरुण भारत

ओसाका विजयी, बार्टीला पहिल्याच फेरीत धक्का

वृत्तसंस्था/टोकियो

महिला टेनिसमधील जागतिक अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला तर यजमान जपानच्या नाओमी ओसाकाने विजयाने पुनरागमन साजरे केले.

Advertisements

बार्टीला स्पेनच्या जागतिक क्रमवारीत 48 व्या स्थानावर असणाऱया सारा सोरिबेसने 6-4, 6-3 असे सहज नमवित महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. बार्टी ही विम्बल्डनची विद्यमान विजेती असून येथील सामन्यात प्रत्येक सेटमध्ये तिने दोनदा सर्व्हिस गमावली आणि 27 अनियंत्रित चुका तिच्याकडून झाल्या. त्या तुलनेत सोरिबेसने फक्त पाच चुका केल्या. ‘बार्टीवर विजय मिळविला ही भावना अविश्वसनीय असून मला अजूनही ते खरे वाटत नाही,’ असे सोरिबेस म्हणाली. तिची पुढील लढत फ्रान्सच्या फिओना फेरोशी होणार आहे. ‘या स्पर्धेत खेळणे हे माझे स्वप्न होते, ते साकार झाले. मात्र येथे खेळताना बार्टीवर विजय मिळविता आल्याने मी सुपर सुपर आनंदीत झालेय,’ असेही सोरिबेस म्हणाली.

ऑलिम्पिकमध्ये एकेरीचे सुवर्ण मिळविणारी पहिली ऑस्ट्रेलियन टेनिसपटू होण्याचे बार्टीचे स्वप्न भंगले असले तरी महिला दुहेरीत तिने दुसऱया फेरीत स्थान मिळवित पदकाची आशा जिवंत ठेवली आहे. स्टॉर्म सँडर्ससमवेत ती दुहेरीत खेळत आहे. अपेक्षेप्रमाणे निकाल लागत गेल्यास बार्टीला सोरिबेसविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळू शकेल.

ऑलिम्पिक उद्घाटन सोहळय़ातील स्टार नाओमी ओसाकाने मायदेशातच होत असलेल्या स्पर्धेत सुवर्ण पटकावण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना चीनच्या झेंग सायसायवर 6-1, 6-4 असा विजय मिळविला. प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतून मानसिक अस्वास्थ्यामुळे माघार घेतल्यानंतर ओसाका प्रथमच येथे खेळत आहे. मेमधील स्पर्धेनंतर ओसाकाने त्यानंतर एकही सामना खेळलेला नव्हता. शुक्रवारी तिच्या हस्ते ऑलिम्पिक स्टेडियममधील मशाल प्रज्वलित करण्यात आली होती. बार्टीचा पहिल्या फेरीतच अनपेक्षित पराभव झाल्याने दुसऱया मानांकित ओसाकाला आता सुवर्णपदकाची दावेदार मानले जात आहे. जपानची पहिली ऑलिम्पिक टेनिस चॅम्पियन होण्यासाठी प्रयत्न करीत असून तिची पुढील लढत स्वित्झर्लंडच्या व्हिक्टोरिया गोलुबिकशी होणार आहे.

Related Stories

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिका विजय

Patil_p

भारताच्या शॉटगन प्रशिक्षकांना कोरोनाची लागण

Patil_p

विश्रृत टायकर्स, गणेश ज्वेलर्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Omkar B

इगोर स्टीमॅक यांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Patil_p

सानिया मिर्झाचे पहिले जेतेपद

Patil_p

द्रोणाचार्यसाठी ज्युड फेलिक्स यांना व्ही.भास्करन यांचा पाठिंबा

Patil_p
error: Content is protected !!