तरुण भारत

गोवा नेतृत्व बदलण्याचा विचार नाही

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचे स्पष्टीकरण : दोन दिवसीय गोवा दौरा आटोपून दिल्लीला रवाना

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

राज्यात डॉ. प्रमोद सावंत सरकार चांगले कार्य करीत आहे. गेल्या साडेचार वर्षांत भाजपने राज्यात विकासाच्या दृष्टिकोनातून तसेच पक्ष बांधणीसंदर्भात खूप मोठी मजल मारली आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्यातरी नेतृत्व बदलण्याचा विचार नाही. श्रीपाद नाईक केंद्रियमंत्री म्हणून दिल्लीत चांगली कामगिरी बजावित आहेत. राज्यातील नेतृत्वाबाबत अजून कोणताही विचार झालेला नसल्याचेही नड्डा म्हणाले.

 गोवा दौऱयावर आलेल्या नड्डा यांनी परत दिल्लीला रवाना होण्याअगोदर येथील एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना वरील माहिती दिली. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रियमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय भाजप प्रवक्ता सय्यद जाफर इस्लाम उपस्थित होते. गोव्यात आल्यानंतर प्रदेश पदाधिकारी, विविध मोर्चाचे पदाधिकारी, आमदार, मंत्री, यांच्याशी राज्यातील समस्या तसेच पक्षसंघटना बळकट करण्याबाबत आपण चर्चा केली असल्याचेही नड्डा यांनी सांगितले.

भाजपकडून राज्याचा सर्वांगिण विकास

गेली दोन वर्षे कोविडच्या संकटाला सामोरे जात असतानाही राज्यच्या विकासकामाबाबत सरकारने कुठेही तडजोड केलेली नाही. राज्यात साधनसुविधा तसेच रोजगार निर्मितीसाठी विविध प्रकल्प उभारणी करणे सुरु केले आहे. एकूणच भाजपने राज्याचा सर्वांगिण विकास केला आहे. मोपा विमातळ 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे. भाजप सरकारने लोकांसाठी सुरु केलेल्या विविध योजना योग्य तऱहेने सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत योजना गोव्यात स्वयंपूर्ण गोवा म्हणून चांगल्यारितीने राबविली जात आहे. एकंदरीत पंतप्रधानांचा कार्यक्रम गोवा सरकार पुढे नेत असल्याचेही नड्डा म्हणाले.

गोव्याचे आर्थिक व्यवस्थापन चांगले

सरकार राज्याचे आर्थिक व्यवस्थापन योग्यरित्या सांभाळत आहे. देशाच्या क्रमवारीत गोव्याचे दरडोई उत्पन्न चांगले असून गोवा 7 नंबरवर होता तो आता 4 नंबरवर आल्याचे नड्डा यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्याच्या मंत्रिमंडळाच्या कार्याबाबत आपण समाधानी आहे. गोवा मंत्रामंडळ अभिनंदनास पात्र आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदिनिशी उतरेल आणि भरघोस यश संपादन करेल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.

काँग्रेसमधून आलेले भाजपात समाधानी

काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदार, मंत्र्यांशीही आपली विविध विषयांवर चर्चा झाली आहे. भाजपाची कार्यशैली त्यांनी अनुभवली आहे. त्यामुळे ते समाधानी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाची उमेदवारी देताना केवळ कार्यपध्दती आणि कर्तृत्वाच्या आधारेच उमेदवारी दिली जाणार असल्याचे नड्डा म्हणाले. कुटुंबराज ही भाजपची पध्दत नव्हे. भाजपने एकाच कुटुंबाच्या हातात पक्षाची सूत्रे दिली नाही तर विविध कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. असेही ते म्हणाले.

काँग्रेस घोटाळेबाज, विकास बंद पाडणारा पक्ष

केंद्रापासून ते गोव्यापर्यंत काँग्रेस पक्ष भरकटलेल्या स्थितीत आहे. त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने विकासात अडवणूक करण्याचा प्रयत्न करणे हेच काम ते करीत आहेत. काँग्रेस काळात केवळ घोटाळेबाजी झालेली आहे.

गोव्यात वीज फुकट देण्याच्या बतावण्या ‘आप’ करीत आहे. प्रत्यक्षात दिल्लीत काय स्थिती झाली आहे, ते अगोदर पहाण्याची गरज आहे. आप केवळ लोकांत गैरसमज पसरू शकतो, प्रत्यक्षात काहीच करु शकत नाही. भाजपने देशभरात  चौफेर विकास करून दाखविला आहे, असे नड्डा यांनी सांगितले.

लसीकरणात गोवा प्रथम क्रमांकावर

कोविड काळात भाजप सरकारने गोव्यात चांगली कामगिरी बजाविली आहे. देशातील छोटय़ा राज्यांच्या मानांकनात लसीकरणाच्या कामात गोवा राज्य प्रथम क्रमांकावर आहे. 31 जुलैपर्यंत पहिला डोस पूर्ण होणार आहे तर 31 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही डोस पूर्ण होतील. आत्तापर्यंत सुमारे साडेबारा लाख लोकांनी लसीकरण करुन घेतले असल्याचे नड्डा यांनी सांगितले.

पूरग्रस्तांच्याप्रती सहनुभूती

राज्यातील पूरग्रस्तांना प्रत्यक्ष भेटून त्यांना सहकार्य करा, असे भाजपा आमदार, मंत्री तसेच कार्यकर्त्यांना सांगितले असल्याचे जेपी नड्डा म्हणाले. मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला आणि येथील लोकांना मोठय़ाप्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. ज्यांना पूराच्या महासंकटाला समोरे जावे लागले त्यांच्याप्रती सहानुभूती आहे. ज्यांची जिवीत हानी झाली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात भाजप सहभागी आहे. केंद्र सरकारकडून राज्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्याला सहकार्य केले जाईल, असेही नड्डा म्हणाले.

Related Stories

ओशेलात घराला आग लागून दीड लाखांचे नुकसान

Amit Kulkarni

मडगावातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Amit Kulkarni

आरोग्य खाते कोविड रुग्णांची निगा घेण्यास असमर्थ

Patil_p

हरमल, मोरजी परिसरातील सात दिवशीय गणरायाला निरोप

Omkar B

दामदुप्पट दराने फुलांची विक्री

Amit Kulkarni

गुरुवारी तब्बल 95 बाधित, 64 जण मुक्त

Patil_p
error: Content is protected !!