तरुण भारत

पावसामुळे मण्णूर-आंबेवाडी रस्त्याची दुर्दशा

त्वरित दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

वार्ताहर /हिंडलगा

Advertisements

संततधार झालेल्या पावसामुळे मार्कंडेय नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. परिणामी बेळगावपासून मण्णूर व आंबेवाडी गावाला जोडणाऱया रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत गेल्याने दोन्ही गावचे मुख्य रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत. याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून बांधकाम खाते व लोकप्रतिनिधींनी त्वरित पाहणी करून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत
आहे.

सलग तीन वर्षांपासून मार्कंडेय नदीला पूर येत असल्याने या दोन्ही गावाला जोडणारे रस्ते दरवर्षी खराब होत आहेत. मोठय़ा प्रमाणात येणाऱया पाण्याच्या प्रवाहामुळे दोन वर्षापूर्वी मण्णूर व आंबेवाडी गावचा रस्ता पूर्णतः खचला होता. शिवाय रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने वाहनधारकांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

मण्णूर रस्ताकामाकडे दुर्लक्ष

त्यामुळे दोन्ही गावच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार आंबेवाडी गावच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. पण, मण्णूर गावच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर वाहनधारक व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मण्णूर ते उचगावपर्यंतच्या रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्यामधून दीड वर्षापूर्वीच रस्ता डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली. पण कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे सदर रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले होते. त्यातच दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसामुळे सलग तिसऱयांदा रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. ठिकठिकाणचा भराव वाहून गेल्याने आठ इंच ते एक फुटापर्यंत मोठेमोठे खड्डे पडून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

रस्त्यावरील खडी गेली शेतवाडीत

त्यामुळे सध्या येथून वाहतूक करणे मुश्किल बनले असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आजुबाजूच्या शिवारात मोठय़ा प्रमाणात खडी वाहून गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी व बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी त्वरित पाहणी करून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Related Stories

रविवारपेठ येथे चार मटकाबुकींना अटक

Patil_p

नुकसानग्रस्तांसाठी मदतीचे स्वरूप निश्चित

Patil_p

स्वच्छ भारत अभियानांतर्गत भित्तीचित्रे रेखाटण्याची मोहीम

Patil_p

मालाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सकडून ‘सिल्व्हर शो’

Amit Kulkarni

खडा पहारासाठी लष्करी जवानही इच्छुक

Patil_p

बेळगाव सिव्हिल इंजिनियर संघाकडे विश्वेश्वरय्या चषक

Amit Kulkarni
error: Content is protected !!