तरुण भारत

पावसाची विश्रांती, मात्र मोठय़ा प्रमाणात नुकसान

शिवारातील पाणी अद्याप ओसरले नसल्याने भातपिके कुजण्याची भीती : सर्वत्र रस्त्यांचीही झाली दुर्दशा

वार्ताहर /किणये

Advertisements

दोन दिवस पावसाने तालुक्यात अक्षरशः हाहाकार माजविला होता. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नदी नाल्यावरील पुलांवर पाणी येऊन अनेक गावांचे रस्ते बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. तालुका ओल्या दुष्काळाच्या उंबरठय़ावर आला होता. शनिवारी  पावसाने थोडय़ा प्रमाणात विश्रांती घेतली असल्याने साऱयांनाच दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी व शुक्रवारी पावसाने शहरासह तालुक्याला झोडपून काढले. शनिवारीही पावसाचा जोर राहिला असता तर शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असते. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. पावसाचा जोर कमी झाला असल्याने शनिवारी घरातील पाणी बाहेर काढताना शेतकरी दिसत होते.

रस्त्यांचा काही भाग वाहून गेल्याने रस्त्यांची दुरवस्था

झालेल्या मुसळधार पावसामुळे शेत शिवारात पाणी साचून राहिले आहे. पावसाने उघडीप घेतल्याने पश्चिम भागातील मुंगेत्री नदीच्या संतिबस्तवाड जवळील जुन्या पुलावरचे पाणी कमी झाले आहे. तसेच मंडोळी-सावगाव, कर्ले-बेळवट्टी व बेळवट्टी-इनाम बडस या रस्त्यांवर आलेले पाणी कमी झाले आहे. मात्र पावसाने रस्त्यांचा काही भाग वाहून गेला असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

नदी व नाल्यांचे पाणी थेट शिवारात आल्याने शेतांमधील बांध फुटून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मार्कंडेय नदीचे पाणी सोनोली, यळेबैल, बेळगुंदी येथील शेतात आले आहे. या भागातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.

पिरनवाडी रस्त्यावर पाणी आल्याने वाहनधारकांची कोंडी

खादरवाडी डोंगर भागातील पाणी नाल्यातून थेट पिरनवाडी रस्त्यावर आले होते. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील पिरनवाडी रस्त्यावरच पाणी आल्याने शुक्रवारी सकाळी वाहनधारकांची कोंडी झाली होती. सध्या या रस्त्यावरील पाणी पूर्णपणे कमी झाले आहे. मात्र बाजूला असलेला नाला तुडूंब भरून वाहत आहे.

बेळवट्टी-इनामबडस रस्त्यावरील नाल्याच्या पुलावरून शुक्रवारी पाणी वाहत होते. ते पाणी कमी झाले. पण, पुलाच्या बाजूच्या रस्त्याचा बराच भाग पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. मंडोळी-सावगाव रस्त्यावर पाणी आले असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

नदीकाठावरील शेकडो एकर भातपीक पाण्याखाली

मागील चार दिवसांत झालेल्या धुवाधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. नदी-नाले व तलावांच्या पाणीपातळीत वाढ होऊन दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, मार्कंडेय नदीला मोठय़ा प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठचे शेकडो एकर भातपीक जमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

अतिपावसामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन नदीकाठावरील शिवारात पाणी भरले आहे. सर्रास भातशेती पाण्याखाली सापडल्याने भात कुजण्याची भीती व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे रस्त्यावरील पाणी कमी झाले असले तरी नदीकाठावरील पाणीपातळी अद्याप कमी झाली नाही.

नदीकाठावरील शिवारात शेतकऱयांनी भातरोप लागवड केली आहे. या शिवारात पावसाचे पाणी साचले आहे. पावसाने शनिवारी उघडीप दिली असली तरी शिवारातील पाणी कमी झाले नाही. पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.

Related Stories

पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

Patil_p

निपाणी तालुका पंचायतीवर महिला राज

Omkar B

सदाशिवनगरमध्ये वृक्षांची कत्तल सुरूच

Patil_p

कणबर्गी योजनेचे काम लवकरच मार्गी

Amit Kulkarni

नोकरीचे आमिष दाखवून फसविणाऱया युवकास अटक

Patil_p

अटी शिथिल करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा

Rohan_P
error: Content is protected !!