तरुण भारत

जामतारा… सायबर गुन्हेगारांचा ध्रुव तारा

संपूर्ण गावच फसवणुकीच्या धंद्यात : दुर्गम भागातून ‘फिशिंग’च्या कारवाया, लॅपटॉप-मोबाईल अन् अगणित सीमकार्डचा वापर, देशभरातील पोलीस यंत्रणेसमोर आव्हान

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

दहा दिवसांपूर्वी सीईएन पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक प्रकरणी जामतारा (झारखंड) येथील एका दांपत्यासह त्रिकुटाला अटक केली आहे. सायबर क्राईम विभागासमोर आव्हान उभे करणाऱया या दांपत्याच्या कारनाम्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता जामतारा म्हणजे सायबर क्राईमचे हेडक्वॉर्टर असल्याचे निदर्शनास येते. तंत्रज्ञानाचा वापर करीत घाम न गाळता दुसऱयांच्या बँक खात्यातून कोटय़वधी रुपये उकळणाऱया या गुन्हेगारांची कहाणी थक्क करणारी आहे.

गेल्यावषी नेटफ्लिक्सवर ‘जामतारा’ वेबसिरीज रिलीज झाली होती. या सिरीजमध्ये ऑनलाईन फसवणूक कशी चालते? सायबर क्राईम गुन्हेगारांचे हेडक्वॉर्टर किंवा राजधानी ठरलेल्या जामतारा येथील राजकीय, सामाजिक परिस्थिती काय आहे? यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न झाला होता. आर्थिक मागासलेल्या जिल्हय़ातील तरुणाई तंत्रज्ञानाचा वापर करीत कोटय़वधी रुपयांची माया कशी कमावते? यावर अनेक लघुपटही आले आहेत. जामताराची टॅगलाईनच ‘सबका नंबर आएगा’ अशी आहे.

‘नमस्ते साहब! स्टेट बँक इंडियासे बोल रहा हूँ। थोडी देर में आपका एटीएम कार्ड ब्लॉक हो जाएगा। वह शुरू करनेके लिए आपके एटीएम कार्डपर का 16 डिजिट नंबर दिजीए।’ असे सांगत संभाषणाला सुरुवात करणारे व गळाला लागणाऱया सावजाच्या बँक खात्यातून हातोहात रक्कम हडपणाऱया अनेक टोळय़ा कार्यरत आहेत. खासकरून या टोळय़ा जामतारा जिल्हय़ातील दुर्गम अशा जंगल भागातून काम करतात.

एखाद्या झाडाखाली किंवा बांबूच्या बेटाच्या सावलीत एक लॅपटॉप, चार मोबाईल व भरपूर सीमकार्ड घेऊन कामाला लागले तर लाखो रुपये आपल्या खात्यात जमा झाल्यानंतरच ते तेथून उठतात. देशभरातील वीसहून अधिक राज्यांचे पोलीस या गुन्हेगारांच्या मागावर आहेत. हजारो किलोमीटरवर अड्डे थाटून सावजाला गाठणाऱया या सायबर गुन्हेगारांनी मोठय़ा प्रमाणात माया जमविली आहे.

9 जून 2021 रोजी कंग्राळी खुर्द, ता. बेळगाव येथील बीएसएनएलचे निवृत्त कर्मचारी यल्लाप्पा जाधव यांच्या बँक खात्यातून दहा लाख रुपये हडप केले होते. या प्रकरणी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी जामतारा जिल्हय़ातील एका दांपत्यासह तिघा जणांना अटक केली आहे.

बेळगाव जिल्हय़ातही टोळीकडून गुन्हे

गेल्या चार-पाच वर्षांत बेळगाव जिल्हय़ातही या टोळीने मोठय़ा प्रमाणात गुन्हे केले आहेत. एखाद्या बँक ग्राहकाशी संपर्क साधून त्याच्या खात्यातील रक्कम हडप करण्याच्या प्रकाराला सायबर गुन्हेगारांच्या भाषेत ‘फिशिंग’ म्हणतात. मासे पकडण्यासाठी गळ टाकावा लागतो. गळाला माशासाठी खाद्य लावावे लागते. त्या धर्तीवर या गुन्हेगारांचे काम चालते. माणसाची हाव त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. ‘सरजी, आपको पाँच हजार रुपयोंकी बोनस रकम लग गयी है। आपके खाते में ट्रान्स्फर करनेके लिए बँक डिटेल्स दो।’ असे सांगून पाच हजार रुपयांची आशा दाखविली जाते. त्यानंतर फशी पडलेल्या ग्राहकाच्या मोबाईलवरून ओटीपी नंबरची मागणी केली जाते. एकदा का ओटीपी नंबर दिला की त्या नागरिकाच्या खात्यातील रक्कम गायब होते.

आंध्रप्रदेशमधील स्टुअर्टपूरमला दरोडेखोरांचे गाव म्हटले जाते. ब्रिटिश काळापासून दरोडेखोरांच्या अनेक टोळय़ा येथे राहतात. या टोळय़ांचे पुनर्वसन करूनही देशभरात ते दरोडे घालतात. घरात केवळ महिला व वृद्ध राहतात. तरुण दरोडय़ासाठी संपूर्ण देशभर फिरतच असतात. स्टुअर्टपूरम पोलीस स्टेशनबाहेर अनेक राज्यांचे पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी ठाण मांडून असायचे. तशीच परिस्थिती झारखंडमधील या सायबर गुन्हेगारांनी निर्माण केलेली आहे.

कर्माटांड व नारायणपूर या दोन पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात सायबर गुन्हेगारीचे प्रकार चालतात. कामानिमित्त जामताराहून मुंबईला गेलेल्या सीताराम मंडल व विकी मंडल या दोघा जणांनी मुंबईत कॉल सेंटरमध्ये नोकरी धरली. तिथे बँक ग्राहकांना फोन करून कशी माहिती दिली किंवा घेतली जाते, हे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांच्या डोक्मयात आपणच स्वतंत्रपणे कॉल का करू नयेत, असा विचार चमकला. कॉल सेंटरमध्ये काम करता करता शिकलेली विद्या त्यांनी आपल्या गावाकडील तरुणांनाही शिकवली व आज शेकडो तरुणांचा हा उद्योग बनला आहे. दुसऱयांची फसवणूक करणे, त्यांच्या खात्यातील रक्कम हडप करणे हाच त्यांचा उद्योग आहे.

उकळलेली रक्कम राजकीय नेत्यांना

तपास अधिकाऱयांच्या मते या परिसरातील तरुणांनी तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. जंगलात झोपडय़ा बांधून किंवा एखाद्या झाडाखाली लॅपटॉप व मोबाईल घेऊन कामाला लागतात. काही ठिकाणी तर कॉल सेंटरसारखीच स्थिती पहायला मिळते. अशा पद्धतीने उकळलेली रक्कम काही राजकीय नेत्यांनाही दिली जाते. कर्माटांड व नारायणपूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील शेकडो तरुण ‘फिशिंग’मध्ये गुंतले आहेत. जामतारासारख्या मागासलेल्या जिल्हय़ातील तरुणांनी देशभरातील पोलीस यंत्रणेसमोर आव्हान उभे केले आहे.

50 हून अधिक बँक खाती

चंद्रप्रकाश दास (वय 30), त्याची पत्नी आशादेवी दास (वय 25) दोघेही  झारखंड राज्यातील जामतारा जिल्हय़ातील लोकानिया या गावातील राहणारे आहेत. त्यांना मदत करणारा नाशिकचा अन्वर शेख (वय 24) यालाही अटक झाली आहे. त्यांच्या बँक खात्यातून 12 लाख 56 हजार रुपये पोलिसांनी गोठवले आहेत. 48 मोबाईल, 304 सीमकार्डचा वापर करून या दांपत्याने वेगवेगळय़ा बँक खात्यातून ग्राहकांची रक्कम हडप केल्याचे उघडकीस आले आहे. त्यासाठी त्यांची स्वतःची 50 हून अधिक बँक खाती आहेत.

‘सबका नंबर आएगा’

सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर अनेकांना फ्रॉड कॉल येतात, जसे ‘तुमचे बँक खाते बंद झाले आहे.’ ‘तुमचे एटीएम कार्ड बंद होणार आहे.’ ‘तुम्हाला मोठय़ा रकमेचे बक्षीस लागले आहे.’ ‘केवायसी अपटेड करायचे आहे’ असे सांगत ते कॉल करतात. सावजाला कॉल करण्यासाठी त्यांनी रँडम क्रमांक निवडतात. अनेक वेळा लुटली जाणारी रक्कम स्वतःच्या खात्यात हस्तांतरणास अडचण असल्यास लागलीच त्या रकमेतून ऑनलाईन शॉपिंग केले जाते. शॉपिंगची रक्कम जप्त करणे अशक्मय असते. मात्र, वेळेत या भामटय़ांच्या फ्रॉडची माहिती मिळाली तर त्यांची बँक खाती गोठविण्यात येतात. एकंदर इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून हे गुन्हेगार सावजाला लुटतात. म्हणून कोणालाही आपल्या बँक खाते, एटीएम कार्ड, आधारकार्ड आदी माहिती शेअर करताना दहावेळा विचार करावा. अविचाराने गुप्त माहिती शेअर केली तर फसवणूक होते. जामतारा जिल्हय़ात अटक करण्यात आलेल्या दांपत्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. फसवणूक टाळण्यासाठी स्वतः सतर्क राहणे गरजेचे आहे, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी केले आहे.

Related Stories

बाळाने नकळत हाताने चक्क सापाला केला स्पर्श!

Patil_p

शॉटकॉन कराटे डू स्पोर्ट्स अकॅडमीचे सुयश

Amit Kulkarni

हलगा-मच्छे बायपास : आणखी एका शेतकऱयाला स्थगिती

Patil_p

पी.बी.रोड उड्डाणपुलावरील रस्त्याची दुर्दशा

Amit Kulkarni

‘मार्कंडेय’ साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन समारंभ

Patil_p

मतदान जागृतीसाठी कॅन्डल मार्च

Amit Kulkarni
error: Content is protected !!