तरुण भारत

भारतीय महिला संघाचा सलग तिसरा पराभव

विद्यमान चॅम्पियन ग्रेट ब्रिटनची भारतावर 4-1 गोल्सनी मात

वृत्तसंस्था/ टोकियो

Advertisements

भारतीय महिला हॉकी संघाने अनेक संधी वाया घालविल्याने विद्यमान चॅम्पियन गेट ब्रिटनकडून ऑलिम्पिक प्राथमिक फेरीतील लढतीत 1-4 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यांचा हा प्राथमिक फेरीतील सलग तिसरा पराभव असून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशेलाही धक्का बसला आहे.

या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यातही भारताने अनेक संधी वाया घालविल्या होत्या. तीच मालिका त्यांनी या सामन्यातही पुढे चालू ठेवल्याचे दिसून आले. ग्रेट ब्रिटनचे गोल हन्नाह मार्टिन (दुसरे व 19 वे मिनिट), लिली ओस्ली (41 वे मिनिट), गेस बाल्सडन (57 वे मिनिट) यांनी नोंदवले. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे. भारताचा एकमेव गोल शर्मिला देवीने 23 व्या मिनिटाला नोंदवला. भारताला या सामन्यातून किमान एक गुण मिळविण्याची गरज होती, यामुळे ते सुरक्षित झाले असते. मात्र आता बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन सामने त्यांना जिंकावेच लागणार आहेत. याआधी भारताला पहिल्या सामन्यात जागतिक अग्रमानांकित नेदरलँड्सकडून 1-5 असा तर दुसऱया सामन्यात जर्मनीकडून 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. भारताची पुढील लढत आयर्लंडविरुद्ध शुक्रवारी होणार आहे.

गोलफरक मोठा दिसत असला तरी जागतिक अकराव्या मानांकित भारत व पाचव्या मानांकित ग्रेट ब्रिटन यांच्यातील ही लढत अटीतटीची झाली. दोघांतील मुख्य फरक म्हणजे भारताच्या वाटय़ाला जास्त संधी मिळाल्या. मात्र ब्रिटनने मिळालेल्या संधींचा पुरेपूर लाभ उठवण्यात यश मिळविले. भारताने या सामन्यात आठ पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण त्यापैकी एकावरच त्यांना यश मिळाले. ब्रिटनलाही पेनल्टी कॉर्नर्सवर फारसा फायदा उठवता आला नाही. त्यांनी एकूण 6 पेनल्टी कॉर्नर्स मिळविले.

ब्रिटनने प्रारंभापासूनच जोरदार आक्रमणाला सुरुवात करून भारतीय बचावफळीवर दडपण आणले. त्यांनी भारताला अजिबात स्थिरावू दिले नाही आणि दुसऱयाच मिनिटाला गोल नोंदवून आघाडी घेतली. भारतीय बचावातील त्रुटीचा लाभ घेत मार्टिनने हा गोल केला. दबाव कायम राखत ब्रिटनने दहाव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण भारतीय गोलरक्षक सविताने अप्रतिम बचाव केला. हळूहळू स्थिरावल्यावर भारतीय महिलांनीही ब्रिटनच्या हद्दीत धडक मारण्यास सुरुवात केली. मात्र आघाडी फळीचे खेळाडू नेहमीप्रमाणे फिनिशिंगमध्ये कमी पडले. 12 व्या मिनिटाला भारताला पहिली संधी मिळाली. यावेळी त्यांनी दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण गुरजित कौरला अचूक वेध घेता आला नाही. ब्रिटनला आपल्या हद्दित खेळण्याची संधी देत भारताने मोठी चूक केली आणि ब्रिटनने त्याचा अचूक लाभ घेतला. दुसऱया सत्रातील चौथ्या मिनिटाला मार्टिनने संघाचा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला. सविताने सारा जोन्सचा फटका अडवला होता. पण नंतर मार्टिनने रिव्हर्स फ्लिक करीत हा गोल नोंदवला. तिसऱया पेनल्टी कॉर्नरवर भारताला पहिले व एकमेव यश मिळाले. गुरजितने मारलेल्या फटक्यावर शर्मिलाने गोलपोस्टमध्ये चेंडू मारत हा गोल केला. या यशानंतर उत्साहित झालेल्या भारताने अनेकदा चढाया केल्या. पण फिनिशिंगमध्ये कमी पडल्याने यश मिळू शकले नाही. याउलट ब्रिटनने आणखी दोन गोलांची भर घालत मोठा विजय निश्चित केला.

Related Stories

महिला टेनिसपटू मॅडिसन कीज कोरोनाबाधित

Patil_p

संगकाराची आरआरच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती

Patil_p

वॉर्नर, साऊदी, अबीद अली यांचे नामांकन

Patil_p

कोरोना क्वारंटाईनसाठी ईडन गार्डन्सचा वापर

Patil_p

शिखर धवनचे मुंबईत आगमन

Amit Kulkarni

गार्सिया ईस्ट बंगालचे साहायक प्रशिक्षक

Patil_p
error: Content is protected !!